५० वर्षांपूर्वीच्या वूडलँडला टक्कर द्यायला अस्सल भारतीय ब्रँड ‘रेडचीफ’ बाजारात आला….

१९९० नंतरचा काळ हा नव भारताच्या निर्मितीसाठीचा सोनेरी कालखंड मानला जातो. याला १९९१ साली झालेलं जागतिकीकरणाच धोरण हे तर कारणीभूत आहेच, पण त्यासोबत नवीन तंत्रज्ञानांचा उगम, संगणक- मोबाईलचा वापर यामुळे हा काळ सुधारणेच्या दृष्टीने अधिक समृद्ध मानला जातो.

याच काळात देशाची बाजारपेठ खुली झाल्यामुळे भारतात बऱ्याच परदेशी वस्तुंनी आणि ब्रँड्सनी जम बसवला. मोठ्या प्रमाणात वेगाने देशांतर्गत बाजार काबिज केला. यात बूट आणि चप्पलच्या ब्रँड्सचा पण समावेश होता. सगळ्यात मोठा ब्रँड असलेला वुडलँड, त्यासोबतच अदिदास, बाटा, प्यूमा, नाइकी, रिबॉक अशा अनेक ब्रँडनी आपले पाय पसरले होते. भारतीय चामड्यांचे बूट आणि चप्पल क्वचितच कुठे तरी दिसायचे.

अशा काळात एका २२ वर्षाच्या पोरानं या ब्रँडला देशी पर्याय उभं करायचं ठरवलं, आणि सुरु झाला त्याचा प्रवास. या तरुणाचा प्रवास अशासाठी मांडायचा की, त्याकाळी मार्केटवर या नामांकित ब्रँडच असलेलं वर्चस्व पाहिलं तर या ‘मेड इन इंडिया’ ब्रँडच महत्व चटकन लक्षात येईल. 

मनोज ज्ञानचंदानी.

कानपूरमध्ये राहणाऱ्या २० वर्षाच्या पोराने शिक्षण झाल्यावर घरचा उद्योग बघत- बघत थोडं अंबानी टाईप डोकं वापरून भारतातील चामड्याच्या बुटांचं युरोपात मार्केटिंग सुरु केलं, आणि आंतरराष्ट्रीय फुटवेअर ब्रॅण्डच्या बाजारात एंट्री घेतली. तिथं या चामड्यांच्या बूट आणि चप्पलांचं मोठं आप्रूप असायचं.

या बूट आणि चपलांची निर्यात करण्यासाठी मनोज यांनी स्वतःच्या ‘लियान ग्लोबल प्रायवेट लिमिटेड’ची स्थापना केली. पण २ वर्षातच त्यांना जाणवलं की, भारतीय बुटांची बाजारपेठ चामड्याच्या बुटांच्या बाबतीत अजूनही एकसंग नाही. त्यामुळे निर्यातीचा व्यवसाय गुंडाळून त्यांनी भारतीय बाजारपेठांचा अभ्यास सुरु केला. 

त्यावेळी मनोज यांना दिसून आलं की, भारतीय लोकं किमतीच्या बाबतीत पाहिल्यापासूनच कमी सतर्कतेने बघतात. त्यांना किमतीमध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तू हव्या असतात. आणि बाजारात सध्या उपलब्ध असलेला एकही ब्रँड ‘कमी किमतीत दर्जेदार बूट/चप्पल’ देऊ शकत नव्हता. जे उपलब्ध होते ते एकतर महाग होते आणि जे स्वस्त होते त्यांची क्वालिटी चांगली नव्हती.

बाजारपेठेची गरज आणि लोकांना काय हवयं हे ओळखत मनोज यांनी आपली मूळ कंपनी लियान ग्लोबल प्राइवेट लिमिटेडच्या माध्यमातून १९९७ साली रेड चीफ हा बुटाचा ब्रँड लॉन्च केला. 

सुरुवातीला उद्योगात जम बसवण्यासाठी त्यांनी हा ब्रँड कानपुर शहारापुरता मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रेड चीफला शहरातील सगळ्या मल्टी ब्रँड्स आऊटलेट्समध्ये ठेवायला सुरुवात केली.

त्यावेळी त्यांनी विक्रेत्यांना एकच गोष्ट सांगून विश्वास दिला की,

माल विकल्यानंतर महिन्याभरात ग्राहकांची काही तक्रार आली नाही तरच पैसे द्यायचे, आणि तक्रार आली तर मी भरपाई देईन.   

पुढची कमीत कमी १३ वर्ष संयमाने काम करत मनोज यांनी रेड चीफला कानपुर आणि उत्तरप्रदेशमध्ये वाढवलं. तिथल्या ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण केला. यानंतर अखेरीस २०११ साली त्यांनी मोठी उडी मारायची ठरवलं, आणि कानपूरमध्येच रेडचीफच पाहिलं एक्सक्लुझिव्ह आउटलेट सुरु केलं, सोबतच देशाच्या विविध राज्यातील मल्टीब्रँड शोरूम्समध्ये देखील बूट ठेवायला सुरुवात केली.

९ डिसेंबर २०११ रोजी आपल्या कंपनीचं हेड ऑफिस कानपुरमध्ये सुरु केलं. आज देखील इथूनच रेडचीफ ब्रँडच संचलन होतं. 

पाहिलं एक्सक्लुझिव्ह स्टोअर सुरु झाल्याच्या आज १० वर्षानंतर रेडचीफची मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ सहित १६ राज्यांमध्ये १७५ एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आहेत. सोबतच ३ हजार पेक्षा जास्त मल्टीब्रँड आऊटलेटमध्ये देखील रेडचीफ उपलब्ध आहे. बुटांची आणि चपलांची किंमत देखील १२०० रुपयांपासून अगदी ४ हजार रुपयांपर्यंत आहे.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी)च्या फाइलिंग नुसार, कंपनीची स्वतःची वार्षिक उलाढाल ही ३२४ कोटींच्या घरात आहे. तसेच कंपनी ५ हजार ५०० कोटींच्या RSPL या ग्रुपचा एक हिस्सा देखील आहे.

तसेच रेडचीफ जवळ आज स्वतःचा चामड्याचा कारखाना देखील आहे. यात ते बुटांचा आणि बुटासाठी लागणाऱ्या चामड्याच नियंत्रण स्वतः करतात. तसेच हरिद्वार आणि इतर शहरात मिळून ३ उत्पादन कारखाने देखील आहेत.

मनोज यांनी कंपनीसाठी ठरवलेल्या धोरणानुसार, ते रेडचीफ मधून मिळालेल्या कलेक्शनच्या २० टक्के हिस्सा क्वालिटी कंट्रोलसाठी खर्च करतात, यासाठी मोठ्या शहरांमध्ये सर्वे करणं, ग्राहकाला ठराविक दिवसानंतर फोनकरून खरेदी केलेल्या बुटाविषयी काही तक्रार आहे का? याची विचारणा करणं अशा गोष्टी केल्या जातात.

आणि विशेष म्हणजे हे सर्व काम कंपनी मार्फत किंवा स्टोअर्स मार्फत न करता तिसऱ्या व्यक्तीकडून केलं जातं, त्यामुळे त्यात सत्यता अधिक राहत असल्याचं सांगितलं जात.

रेड चीफने आता स्वतःला एसेसरीज सेक्टरमध्ये देखील उतरवलं आहे. यात त्यांनी जीन्स, बेल्ट, पैशांचं पाकीट अशा गोष्टींच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. कंपनीची स्वतःची फ्यूरो बाय रेड चीफ नावाची स्पोर्ट्स रेंज देखील आहे. ज्याची सुरुवात १ हजार ८०० रुपयांपासून होते.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.