बायकोचं अफेअर, गंडलेला फॉर्म, गेलेली जागा… दिनेश कार्तिकला कुणीच संपवू शकलं नाही

यावर्षीची आयपीएल सुरु होण्याआधीच समस्त क्रिकेट चाहत्यांना एक धक्का बसला. सुपरमॅन एबी डिव्हिलिअर्सनं आपण आता आयपीएल खेळणार नाय असं जाहीर केलं. याचं सगळ्यात जास्त टेन्शन कुणाला आलं असेल, तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमला.

कारण आधीच त्यांचे कप जिंकायचे वांदे आणि त्यात एबीडीसारखा एक्का नाही म्हणल्यावर विषय आणखीनच कठीण.

मेगा ऑक्शनमध्ये बँगलोर कुणाला घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतंच आणि त्यांनी घेतलं दिनेश कार्तिकला. लोकं म्हणाली, हा थकलाय, याच्यात काय दम नाय, कोलकात्यानं काय उगाच याला काढून नव्हतं टाकलं…

लोकं काय लाख बोलतील, पण दिनेश कार्तिक हे असं नाव आहे जे पुसायचं कितीही प्रयत्न केला तरी मिटायचं नाय. आरसीबी आतापर्यंत चार मॅचेस खेळली, या चारही मॅचेसमध्ये बॅटिंग करुनही दिनेश कार्तिक काय आऊट झाला नाही. संघाला जिंकवून देण्यात त्याच्या डेथ ओव्हर्समधल्या हाणमारीचा लय मोठा रोल ए.

थोडक्यात काय, तर यंदाच्या आयपीएलमध्ये दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा हिरो ठरलाय.

आयपीएल सुरू असतानाच, कोलकाता नाईट रायडर्सनं त्याचं कर्णधारपद काढून घेतलं होतं. मेगा ऑक्शनआधी त्याला रिटेनही केलं नाही. त्यामुळं आरसीबीनं दिलेला चान्स हा दिनेश कार्तिकसाठी शेवटचा होता आणि त्यानं तो गाजवलाही तसाच.

पण दिनेश कार्तिक कुठल्याही मोठ्या प्रॉब्लेमला जसा हसतखेळत सामोरा जातो आणि त्यानंतर अगदी बाप कमबॅक करतो, हा लय भारी विषय ए.

म्हणजे बघा दिनेश कार्तिकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा आपल्यातल्या कित्येकांना क्रिकेटचं स्पेलिंगपण येत नव्हतं. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये किपर कार्तिकनं मायकेल वॉनचं असं काही स्टम्पिंग केलं की सगळी दुनिया पागल झाली. विकेटकिपर शोधण्यासाठी सातत्यानं चाचणी परीक्षा घेणाऱ्या भारताला कार्तिकच्या रुपानं एकदम चपळ कार्यकर्ता घावला.

कार्तिकची किपींग तर भारी होतीच, पण सोबतच बॅटिंगही. कार्तिक भारतासाठी लॉंग टर्म खेळणार हे जवळपास नक्की झालं होतं, मात्र तेवढ्यात महेंद्रसिंह धोनीची एंट्री झाली आणि लांब केसांच्या धोनीनं कार्तिकचं मार्केट खाल्लं.

कार्तिकला संधी मिळणं तसं कमी झालं कारण धोनी आता फर्स्ट चॉईस किपर होता. टेस्टमध्ये ओपनिंगची जागा गेल्यावर कार्तिकनं खचून न जाता वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये उपयोगी येतील अशा बॅटिंग स्टाईलवर आणि शॉट्सवर काम केलं. संघात स्थान मिळू लागलं, पण त्यात सातत्य नव्हतं.

पूर्णवेळ संधी कधी मिळणार याचं टेन्शन असतानाच कार्तिकच्या आयुष्याला आणखी एक हादरा बसला.

२०१२ मध्ये त्याला आपली बायको निकिताचं आपलाच टीममेट मुरली विजयशी अफेअर असल्याचं समजलं. कुणाच्याही आयुष्यात यापेक्षा डेंजर सेटबॅक बसणं अवघड ए. या घटनेनंतर लोकांना फिक्स वाटलं की, आता काय कार्तिक पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही.

पण आयपीएलमध्ये मात्र कार्तिकचा धमाका सुरू होताच. भारतीय संघातही त्याला अधेमध्ये संधी मिळायची. पण चाहत्यांना वाटायचं इंजिन थकलं, याच्यात काय दम नाही.

२०१८ मध्येही सगळ्यांना असंच वाटलं, तेही अगदी मनापासून…

पण आपल्याला असं वाटू लागलं की कार्तिक एखादा धक्का फिक्स देतो. निदाहस ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्यानं बांगलादेशला असा काही तडाखा दिला, की बत्त्या डीम झाल्या. त्याची ती इनिंग पुन्हा अनुभवायची असेल, तर बोल भिडूनं त्यावर लिहून ठेवलंय… क्लिक करुन वाचा

कार्तिकच्या त्या एका सिक्सनंतर बांगलादेशच्या टीमनं अजून नागीन डान्स केला नाही…

२०१९ च्या वर्ल्डकपवेळीही त्याला संघात स्थान मिळालं. भारताचा कार्यक्रम जिथं गंडला, त्या सेमीफायनलमध्ये कार्तिकचा लय बाप कॅच काढला गेला आणि तो आऊट झाला. जडेजा, धोनीच्या जोडीला तो जर क्रीझवर टिकला असता, तर सगळंच चित्र वेगळं असतं.

त्या सेमीफायनल नंतर कार्तिक भारतीय संघाकडून खेळताना दिसला नाही. 

२०२१ मध्ये भारतीय संघ टेस्ट सिरीजसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला. तेव्हा कार्तिकनं चक्क कॉमेंटेटरची भूमिका बजावली. त्यातही उगा माझ्या काळात असं होतं, मी एवढा बाप प्लेअर होतो असले बोलबच्चन नाहीत. तर प्रॉपर इंग्लिशमध्ये अभ्यासू बोलणार. शर्ट पण असले भारी घालायचा की इंग्लंडमध्ये जाऊन एखादा इंडियन क्रिकेटर अशी हवा करतोय बघून आपल्याला भारी वाटायचं.

कोलकाता नाईट रायडर्सनं जेव्हा त्याला कर्णधारपदावरुन काढलं, तेव्हाच त्याची आयपीएल कारकीर्द संपली असं वाटत होतं. 

पण बँगलोरकडून खेळताना भावानं सगळ्यांची बोटं घशात घातली. अशक्य वाटणारे विजय खेचून आणत त्यानं, ‘ई साला कप नामदे’ असं वाटायचा थोडा तरी चान्स ठेवलाय. यावर्षी जर बँगलोरनं आपला कप जिंकायचा दुष्काळ संपवलाच, तर तिकडच्या एखाद्या चौकात त्याचा सत्कार केला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा गॅप पडला असला, स्पर्धात्मक क्रिकेट तो मोठ्या कालावधीनंतर खेळत असला, तरी डीकेचा गेम सेन्स, मॅच फिरववण्याची ताकद आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास या गोष्टी खरंच शिकण्यासारख्या आहेत.

जे चाहते कधीकाळी म्हणत होते की डीके संपला, तेच आता म्हणतायत की त्याला येणाऱ्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघात घ्यायला हवं. आता घ्यायचं की नाही, हे निवड समिती ठरवेल.

पण दिनेश कार्तिकचा फोटो आणि ‘शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.’ हे कॉम्बिनेशन करुन विकलं, तर विकणारा फिक्स मालामाल होऊ शकतोय

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.