पोलीसांची बंदुक शोभेची गोष्ट आहे का असा प्रश्न पडला तेव्हा ते म्हणाले, बुलेट फॉर बुलेट

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. खलिस्तानवादी शीख अतिरेक्यांनी संपूर्ण पंजाब पेटवला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. रोज दहशतवादी हल्ले सुरू होते आणि त्यासाठी सीमेपलीकडच्या पाकिस्तानची मदत सुरू होती.

परिस्थिती काबूत आणण्यासाठी एका मुंबईच्या सुपरकॉपची पंजाबचा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

ज्युलिओ फ्रान्सिस रिबेरो.

रिबेरो हे तडफदार पोलीस अधिकारी म्हणून फेमस होते. ते नुकतेच पंजाबमध्ये दाखल झाले होते. एकदा सुखा सिपाही नावाच्या हवालदाराला पंजाब पोलिसने छुपी दहशतवादी कारवाई केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

त्याला न्यायालयात नेत असताना बब्बर खालसाच्या अतिरेक्यांनी हल्ला केला, ६ पोलीस शिपाई या हल्ल्यात मारले गेले. देशभर खळबळ उडाली. पंजाब पोलिसांचे मनोधैर्य ढासळत चालले होते. अखेर रिबेरो यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली असल्याचे ठणकावून सांगितले.

यातूनच एक वाक्य फेमस झालं, “बुलेट फॉर बुलेट”

त्या काळात पोलीस एन्काऊंटर होत नव्हते. पोलिसांवर अनेक कडक नियम असायचे. त्यांची बंदूक शोभेपुरती उरली आहे की काय अशी शंका वाटू लागली होती. अशा वेळी गोळीला गोळीनेच उत्तर दिले जाणार असल्याची गर्जना हे अनेकांना चकित करून सोडणारे होते.

आपल्या तिखट स्पष्टवक्तेपणा साठी प्रसिद्ध असलेले रिबेरो यांची ओळख बुलेट फॉर बुलेट या वाक्यामुळे झाली होती.

ज्यूलिओ रिबेरो यांचे घराणे मूळ गोव्यातले. त्यांच्या घरात उच्चशिक्षणाची परंपरा होती. त्यांच्या आजोबांनी त्याकाळी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते तर वडिलांनीही मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात शिक्षण घेतले होते. अशा कुटुंबात रिबेरो यांचा जन्म  झाला.

मुळात रिबेरो यांना पोलिस व्हायचं नव्हतं. पण यूपीएससी परीक्षेत त्यांची आयपीएस पदी निवड झाली व त्याकाळी आयोग दुसरा पर्याय निवडण्याची मुभा देत नसे. ऑक्टोबर १९५३ मध्ये ते प्रशिक्षणासाठी दाखल झाले.

प्रशिक्षण संपल्यावर त्यांची पहिली नेमणूक कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये झाली होती.

१९५६ साली नाशिकमध्ये त्यांना प्रथमच दंगल काळातील स्थिती हाताळण्याचा अनुभव मिळाला. जून १९५८ मध्ये रिबेरो यांनी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याचा पोलिस अधिक्षक म्हणून सूत्रे हाती घेतली. पुण्याचे पोलीस अधीक्षक म्हणून देखील त्यांनी काम पहिलं.

सुमारे १५ वर्षे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी काम केल्यानंतर १९६८ साली त्यांची मुंबईला नेमणूक झाली.

मुंबईतील त्यांची कारकीर्द गाजली. तेथील नेमणूकींच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखताना राजकीय पक्ष व कामगार नेते यांच्याशी कठोरपणे वागणेही भाग पडले. विशेषतः शिवसेनेशी त्यांचा संघर्ष झाला. मुंबई कोणाची या प्रश्नावर बाळासाहेबांशी त्यांचा उडालेला खटका तर जगप्रसिद्ध आहे.

कोणताही राजकीय दबाव न स्वीकारता त्यांनी कर्तव्यतत्परतेने आपलं काम केलं.

त्यांच्याच काळात मुंबईतील अंडरवर्ल्डच्या टोळीयुद्धावर कारवाईस सुरवात झाली. महिलांसाठी त्यांनी स्वतंत्र कक्ष उभारला. कठोर पावले उचलून विद्यार्थ्यांमध्ये पसरणाऱ्या अंमली पदार्थांच्या व्यसनालाही आळा घातला. भिवंडी दंगल, पोलिसांची दंगल अशा स्फोटक विषयांची त्यांनी नाजूकपणे हाताळणी केली.

त्यांचे नाव देशभर गाजत होते.

म्हणूनच तत्कालीन पंतप्रधानांनी मुंबईतून थेट केंद्रीय राखीव पोलिसदलाचे महासंचालक म्हणून रिबेरो यांची नियुक्ती केली.

जेव्हा पंजाब प्रश्न चिघळला तेव्हा रिबेरो यांचेकडे तिथले पोलीस महासंचालक म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. या काळात त्यांनी ऑपरेशन ब्लॅक थंडर नावाने अमृतसर येथे कारवाई केली.

सुवर्णमंदिरात लपलेल्या २०० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. दहशतवाद्यांच्या कचाट्यातून सुवर्णमंदिर मुक्त करून शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या ताब्यात देण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.

रिबेरो यांचे बुलेट फॉर बुलेट हे वाक्य याच काळात गाजले. मात्र त्यांच्या दाव्यानुसार

हे वाक्य तत्कालीन मंत्री व राजीव गांधी यांचे सल्लागार अरुण नेहरू यांचे होते. मी फक्त आदेशानुसार कारवाई केली होती.

रिबेरो यांच्या धडाकेबाज कामाची जगभरातील वृत्तपत्रातून प्रशंसा झाली.

त्यांच्यावर अनेकवेळा आत्मघाती हल्ले करण्यात आले होते. १९८६ साली झालेल्या हल्ल्यात त्यांची पत्नी जबर जखमी झाली होती तर अंगरक्षक मारला गेला होता.

पण रिबेरो डगमगले नाहीत. पुढे रोमानिया देशाचे राजदूत म्हणून त्यांची नेमणूक झाल्यावर तेथे देखील शीख अतिरेक्यांनी हल्ला केला होता. मात्र रिबेरो आश्चर्यकारकरित्या बचावले.

निवृत्तीनंतर काही काळ रिबेरो यांचेकडे मिझोरामचे राज्यपालपद सोपविण्यात आले.

ते राजकीय क्षेत्रात सक्रिय होतील अशी शक्यता अनेकदा वर्तवली जात होती मात्र रिबेरो यांनी त्यापासून दूर अंतर राखलं. पण राजकीय स्थितीवर टीकाटिप्पणी त्यांनी जरूर केली. एकदा एका मुलाखतीत ते म्हणाले होते,

It has been a role reversal for me… from fighting militants to fighting the corrupt administration

त्यांचे बुलेट फॉर बुलेट हे आत्मचरित्र देखील प्रचंड गाजलं.

सध्या ९१ वर्षांचे असलेले माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो पुन्हा चर्चेत आले आहेत.  मध्यंतरी दिल्ली दंगल असो किंवा सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासाठीची सीबीआय चौकशी रिबेरो यांनी केंद्रातल्या सरकारवर टीकेची झोड उठवली.

काल जेव्हा परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रिबेरो यांच्या नावाची मागणी शरद पवारांनी केली तेव्हा या चौकशीत आपल्याला कोणतंही स्वारस्य नाही अशी भूमिका रिबेरो यांनी जाहीर केली. त्यांच्या या रोखठोक भूमिकेचं आजही अनेकांना आश्चर्यवाटत राहतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.