हाच तो माणूस ज्याच्यामुळे अमेरिकेत गेल्यावर पोलिसांपुढे शूज काढावे लागतात.

२२ डिसेंबर २००१, पॅरीसहून अमेरिकेच्या मियामी ला जाणारी फ्लाईट ६३.

विमानाने पॅरीस हून टेक ऑफ घेतलं होत. हवाईसुंदरीनी सर्व्ह केलेलं चविष्ट भोजन खाऊन प्रवासी पेंगायला सुरु केले होते. विमानातले अटेंडंटसुद्धा आता थोडा वेळ तरी कोणी हाक मारणार नाही याची निश्चिती झाली म्हणून आपल्या केबिनमध्ये विश्रांती घेत होते. इतक्यात त्यांना बाहेर कसलासा गोंधळ ऐकू येऊ लागला. 

काय झालंय ते पाहायला हर्मीस मोर्टाडियर नावाची हवाईसुंदरी इकोनॉमी क्लासच्या दिशेने गेली. काही प्रवासी आपल्या जागेवरून उठून इकडे तिकडे पाहात होते.

 “काही तरी जळल्याचा वास येतोय “

हर्मीसने त्यांना शांत केले. तिलाही तो वास येऊ लागला. तिला वाटलं कोणीतरी खोडसाळ पणे विमानात सिगरेट ओढतोय. एकएक रो मध्ये चेक करत ती पाठीमागच्या बाजूला गेली. तिथे एक प्रवासी एकटाच खिडकीपाशी बसला होता. त्याच्या हातात काडेपेटी होती. त्या काडेपेटीमधून काड्या पेटवून तो टाकत होता. हर्मिसने त्याला आपल्या आवाजात शक्य तेवढा नम्रपणा आणत सांगितले,

“सर विमानात सिगरेट ओढण्यास मनाई आहे.”

पण विचित्र केस, दाढीमिशा वाढवलेला तो प्रवासी आपले पिवळे दात दाखवत विक्षिप्तपणे हसला आणि त्याने मान डोलावली. हर्मिस आपल्या जागेवर जाण्यासाठी वळली इतक्यात परत काडेपेटीची काडी ओढल्याचा आवाज आला.

मगाशी तिने त्या वेडपट माणसाच्या जवळ जायचं टाळल होतं पण आता पर्याय नव्हता. त्याच्या हातातली सिगरेट आणि काडेपेटी काढून घेऊन त्याला चांगलंचं खडसावयाचं म्हणून ती पुढे सरकली. तेव्हा तिला दिसले हा विचित्र प्राणी सिगरेट ओढत नव्हता तर त्याच्या मांडीवर एक शूज होता आणि तो पेटवण्याचा प्रयत्न चालला होता.

तिने त्याला थांबवायचा प्रयत्न केला. त्यावेळी सव्वा सहा फुट उंची असलेल्या त्या प्रवाशाने तिला जोरात ढकलून दिले. हर्मिस जोरात किंचाळली,

“हेल्प हेल्प !!”

काय झाले हे पाहायला दुसरी हवाई सुंदरी क्रिस्टीना जोन्स तिथे धावत आली. त्या हातात शूज असलेल्या वेड्या प्रवाशाने तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या बोटाचा चावा घेतला. मग मात्र इतर प्रवाश्यांनी मिळून त्याला पकडले. त्याला सीटबेल्टने बांधण्यात आलं. विमानाच्या फर्स्ट एड कीट मध्ये असलेल्या औषधाचा वापर करून त्याला बेशुद्ध करण्यात आलं. त्याच्या त्या शूजमध्ये बॉम्ब सापडला.

पायलटनी अनाउन्स केलं विमान इमर्जन्सीच्या कारणाने बोस्टन इथे उतरवण्यात येत आहे. 

काही वेळातच अमेरिकन फायटर प्लेन F-१५च्या संरक्षणामध्ये विमान बोस्टनमध्ये लँड केलं गेलं. तिथे एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्या अतिरेक्याला ताब्यात घेतलं. त्याच्या जवळचा बॉम्ब डिफ्युज करण्यात आला. चौकशीची चक्र फिरली.

 नंतर कळालं त्या अतिरेक्याचं नाव रिचर्ड रेड. तो मुळचा ब्रिटीश.

रिचर्डचे वडील जमैकन तर आई इंग्लिश होती. त्याचे वडीलसुद्धा मोठे क्रिमिनल होते. ते कायम तुरंुगात  असायचे. आईने एकटीने रिचर्डला वाढवल पण पोरगा बापच्या वळणावरच गेला. छोटे मोठे गुन्हे करू लागला. त्याला  रिमांड होम मध्ये ठेवण्यात आलं. पुढे ३ वर्षाची जेल झाली. तिथे त्याची ओळख काही इस्लामिक कट्टरवाद्यांशी झाली. जेल मधून बाहेर येताच तो मुसलमान झाला.

पुढे त्याची ओळख अल कायदाच्या अतिरेक्यांशी झाली. त्यांनी रिचर्डला पाकिस्तानला ट्रेनिंग साठी पाठवलं. तिथे आणि अफगाणिस्तानमध्ये रिचर्ड दोन वर्षे होता. यावेळात तो बॉम्ब बनवायला शिकला. त्याच रुपांतर एका कट्टर जिहादी अतिरेक्यामध्ये झालेलं.

याच काळात अमेरिकेवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. ओसामा बिन लादेनच्या आदेशावर अमेरिकन विमाने अपहरण करून ती न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर आदळ्वण्यात आली. हजारो लोकांचा मृत्यू झाला. रिचर्डसुद्धा असच काहीस करायचं म्हणून पॅरीसला आला. त्याने साजिद बदात या आपल्या मित्राच्या मदतीने बॉम्ब बनवून तो आपल्या बुटामध्ये फिट केला.

२१ डिसेंबरला त्याने मियामीच तिकीट काढलं. पण त्या दिवशी त्याला पॅरीस एयरपोर्टवर अडवण्यात आलं. विचित्र वाढवलेली दाढी, त्याचा अवतार, एवढ्या मोठ्या प्रवासासाठी जात असूनही जवळ बॅग नसणे या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटल्या. फ्रेंच पोलिसांनी त्याची कसून तपासणी केली पण त्याच्या जवळ काही सापडलं नाही. त्यांना काय माहित त्याच्या बुटामध्ये बॉम्ब आहे ते.

दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटमध्ये रिचर्डला जाऊ दिल. त्याच्या पायाला आलेल्या घामामुळे त्याच्या शूजमधला बॉम्ब निकामी झाला होता नाही तर त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर ९/११ सारखी आणखी एक मोठी घटना अमेरिकेत झाली असती.

रिचर्ड रेड वर बरेच केस टाकण्यात आले. त्याला ३ जन्मठेप आणि ११० वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली. तो कोर्टात शेवटपर्यंत स्वतःला अल्लाचा सैनिक म्हणवून घेत होता. काही वर्षातच  त्याच्या मित्रालाही अटक केली गेली.

रिचर्डच्या शूज बॉम्बमुळे एक झाले. अमेरिकेत विमानात चढण्यापूर्वी तपासणीचे नियम आणखी कडक करण्यात आले. प्रत्येक प्रवाशाला सिक्युरिटी स्कॅन साठी शूज काढणे कम्प्लसरी करण्यात आले होते. पुढे अनेक वर्षांनी म्हणजेच २०११ मध्ये हे नियम शिथिल करण्यात आले. आता १२ वर्षाखालील लहान मुले आणि पंचाहत्तर वर्षावरील वृद्ध व्यक्ती यांना विमानात चढण्यापूर्वी आपले बूट सिक्युरिटी स्कॅन साठी शूज काढणे गरजेचे नाही.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.