या निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही !

मी कवठेमहाकाळ चा परिसर फिरलो असून विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे मला माहित आहे. मला बालिश म्हणायचं आणि शहरातल्या नेत्यांनी फक्त माझ्यावरच बोलत राहायचं ही वेळ त्यांच्यावर आलीय.

या निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही !

असं म्हणून आपला शब्द खरा करणाऱ्या रोहित पाटलांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १० जागांवर दणदणीत विजय मिळवलाय. या निवडणुकीत रोहित पाटलांनी भल्या भल्याना चितपट करून आर. आर. आबांची आठवण करून दिलीय असं परिसरात म्हंटल जातंय.

मागच्या वेळी नगरपंचायतीत स्वाभिमानी विकास आघाडीची सत्ता होती. 

या स्वाभिमानी विकास आघाडीत अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या आमदार  सुमन पाटील, अनिता सगरे, गजानन कोठावळे होत्या. या स्वाभिमानी विकास आघाडीच्या विरोधात खासदार संजयकाका पाटील यांनी भूमिका बजावली होती. त्यावेळी नगरपंचायतच्या सत्तासिंहासनावर स्वाभिमानी आघाडी १७ पैकी १३ जागा जिंकत आली होती. तर विरोधात असणाऱ्या संजयकाका पाटील गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले होते. 

कवठेमहांकाळ शहराच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्येच सगरे गट आणि कोठावळे यांची वेगळी राजकीय चूल आहे. सुमन पाटील यांची नगरपंचायतमधील राजकीय मदार ही अनिता सगरे आणि कोठावळे यांच्यावरच अवलंबून होती. आजही कोठावळे आणि सगरे यांच्यामधून विस्तव जात नाही. या पाच वर्षांच्या काळात नगरपंचायतच्या राजकारणात बरेच पुलाखालून पाणी गेले. संजयकाका पाटील यांनी राजकीय चाली खेळत नगरसेवकांची संख्या सहावर पोहोचवली व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पद ही पदरात पाडून घेतली. 

आताच्या झालेल्या निवडणुकीत कवठेमहांकाळ नगरपंचायतच्या राजकीय युत्या ह्या स्थानिक पातळीवर न होता, या वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी ठरवणार असल्याचं चित्र होत. त्यामुळेच यंदाची नगरपंचायत निवडणूक ही अनेक बाबींनी महत्त्वपूर्ण होती. 

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये रोहित पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली होती. माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते मंत्री अजित घोरपडे, राष्ट्रवादीचा एक गट (सगरे गट) आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटील यांच्या विरोधात होती. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आणि कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला.

रोहित पाटलांनी या निवडणुकीमध्ये स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती. 21 डिसेंबरला कवठेमहाकाळ नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 जागांसाठी मतदान झालं होतं. त्याचा निकाल आज लागला. रोहित पाटलांना हरवण्यासाठी सगळे रथी-महारथी एकवटले होते. पण रोहित पाटील म्हटले त्याप्रमाणे,

माझं वय 23 वर्षे आहे 25 होईपर्यंत यातल्या एकाला सुद्धा शिल्लक ठेवत नाही.

प्रचाराची सांगता सुरु असतानाच त्यांचे हे भाषण चर्चेत आलं होतं. याला पलटवार करताना खासदार संजय काका पाटील या वक्तव्यावर बोलताना म्हणाले, 

ही भाषा पुन्हा वापरली तर संघर्ष अटळ आहे.

 कवठेमहाकाळच्या या निवडणुकीत रोहित पाटलांना एकटं पडल्याचं स्थानिक कार्यकर्त्यांकडून बोललं जात होत. तर सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट पक्षाच्या उमेदवाराविरोधात प्रचारात सक्रिय असल्याचं स्थानिक पत्रकारांकडून सांगितलं जातं होतं. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले होते, 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो. पण असं कोणी कोणाला एकटं पाडेल असं मला वाटत नाही.

त्यामुळे या निवडणुकीत लोकांची सहानुभूती हा फॅक्टर असेल का ? या निवडणुकीत नक्की काय काय झालं या प्रश्नासाठी आम्ही सांगली लोकमत आवृत्तीचे प्रमुख श्रीनिवास नागे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हंटले, 

निश्चितच, रोहित पाटलांच्या त्या सभेमुळे सहानुभूती निर्माण झाली. सगळे विरोधक माझ्या विरोधात उभे ठाकले आहेत आणि त्यांनी मला एकटं पाडलं आहे असं चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. आणि याचा परिणाम लोकांनी भावनिक होऊन मतदान केल्याचं दिसत.

रोहित पाटलांना आर आर आबांसारखी लोकांची नेमकी नस सापडली आहे. आर आर आबांच बोलणं आणि चारित्र्य हे भांडवल होत. आणि रोहित पाटलांची पाटी तर अगदीच कोरी आहे. एकट्यानं निवडणूक लढवल्यासारखं त्यांनी दाखवलं.

सुमन ताई असणाऱ्या स्वाभिमानी विकास आघाडीत फूट कशी पडली या प्रश्नावर नागे सांगतात, 

रोहित पाटील यांच्या गटाला यावेळी जास्त जागा हव्या होत्या. आणि तसं घडलं नाही यामुळे पाटील गटाकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शिवाय मागच्या वेळी स्वाभिमानी विकास आघाडीत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या सगरे आणि कोठावळे या दोन्ही गटांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक न लढवता खासदार संजय काका पाटील यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. तो सुद्धा रोहित पाटलांच्या पथ्यावर पडला. 

यावेळी रोहित पाटील गटाला १० जागा मिळाल्या आहेत तर संजयकाका पाटील गटाला ६ जागा मिळाल्या आहेत. यात संजयकाका पाटील गटाच्या ४, अजित घोरपडे गटाची १ आणि सगरे गटाचे १ असा निकाल आहे. 

आर आर पाटील यांच्या निधनानंतर रोहित पाटील यांच्याकडे पहिल्यांदाच पक्षाकडून स्वतंत्र राजकीय जबाबदारी देण्यात आली होती. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही जबाबदारी रोहित पाटलांनी समर्थपणे पेलवली असल्याचं या  निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आलं आहे.

हि निवडणूक रोहित पाटलांच्या राजकीय करिअरच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.