फक्त राज ठाकरेच नाही तर इतर नेत्यांनी देखील वारंवार भूमिका बदलल्या आहेत

“राजसाहेबांचं कळतच नाही, ईडीमध्ये बोलावल्यानंतर इंजिन वेगळ्या ट्रॅकवर गेलं. या आधी राज ठाकरेंनी कडवा विरोध भाजपला केला होता. पण काल त्यांनी अचानक टर्न घेतला, राज ठाकरेंनी माझ्यावर पण टीका केली पण मी मोदींवर टीका करतच होतो, असा ट्रॅक कधी बदलला नाही” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंवर केलीय.

ही काही पहिली वेळ नाहीये जेव्हा एखाद्या राजकीय नेत्याने राज ठाकरेंवर भूमिका बदलल्याची टीका केलीये. त्यांच्यावर नेहमीच याप्रकारचे शाब्दिक प्रहार केले जातात. मात्र राज ठाकरे एकटेच आहेत का जे अशी भूमिका बदलतात?

तर ‘नाही’. हे राजकारण आहे. इथे केव्हा काय फ्लिप बसेल सांगता येत नाही. म्हणून राज ठाकरे यांच्या सोबतच्या इतर नेत्यांनी अशी भूमिका बदलण्याची खेळी केव्हा केव्हा खेळली आहे, बघू…

बाळासाहेब ठाकरे

१) १९६६ ला शिवसेनेची स्थापना केल्यापासून कट्टर काँग्रेसविरोधी पक्ष अशी शिवसेनेची ओळख होती. मात्र १९६९ ला काँग्रेसमध्ये फूट पडली. तेव्हा बाळासाहेबांनी काँग्रेसच्या दुसऱ्या गटासोबत हात मिळवला होता. १९७१ मध्ये बाळासाहेबांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तीन उमेदवार उभे केले. पण तीनही उमेदवारांचा पराभव झाला.

२) १९७० च्या दशकात सेनेने मुंबई महापालिकेतील महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मुस्लिम लीगची मदत घेतली होती. १९७२ मध्ये शिवसेना नेते सुधीर जोशी मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर मुंबईचे महापौर झाले होते असं सांगण्यात येतं. इतकंच नाही तर आणीबाणीनंतर मुस्लिम लीगचे नेते जी एम बनातवाला यांच्याबरोबर ठाकरे यांनी मस्तान तलावावर जाहीर सभाही घेतली होती. १९७९ मध्ये झालेली ही युती फार काळ टिकली नव्हती.

३)  बाळासाहेब त्यांच्या व्यंगचित्रातून इंदिरा गांधी सरकारवर हल्लाबोल करायचे. तरीही १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. बाळासाहेबांनी १९७७ च्या निवडणुकीतही काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यानंतर १९८० च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला.

४) मराठी भाषा आणि मराठी माणसाचे प्रश्न हा अजेंडा घेऊन शिवसेना स्थापन झाली. मात्र निवडणुकीत वारंवार येणारा पराभव बघता जनतेची नस पकडण्यासाठी येत्या काळात हिंदुत्व मुद्द्याची कास धरावी लागेल, हे बाळासाहेबांनी ओळखल. १९८७ च्या विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीवेळी पहिल्यांदाच अधिकृतरीत्या शिवसेनेने हिंदुत्वाची शाल पांघरली. शिवसेनेचा विजय झाला.

तेव्हा भाजपने युतीचा प्रस्ताव मांडला. प्रमोद महाजन मातोश्रीवर आले. बाळासाहेबांनी एका साध्या कागदावर काही तरी आकडा लिहून दिला आणि महाजनांना तो कोणतीही खळखळ न करता मान्य करावा लागला. अशाप्रकारे मराठीची कास सोडून हिंदुत्वाच्या जोरावर सेना-भाजपची युती झाली.

शरद पवार

१) १९६७ साली शरद पवारांची राजकीय सुरुवात झाली यशवंतराव चव्हाणांसोबत काँग्रेसमध्ये. आणीबाणीनंतरच्या मतभेदावरून काँग्रेसचे दोन तुकडे झाले. तेव्हा १९७८ साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादांचे सर्वात विश्वासू सहकारी शरद पवार विरोधी बाकावर जाऊन बसले. पवारांनी दादांचं सरकार तर पाडलंच शिवाय जनता दलाची मदत घेऊन समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. १९७८ साली महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुलोदचं बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आले होते. 

२) १९९६ साली नरसिंहराव यांच्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सिताराम केसरी या पदावर आले. मात्र त्यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे कॉंग्रेस फुटून जाण्याची चिन्हे होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी सोनिया गांधी राजकारणात सक्रिय होणं गरजेचं होतं. त्यानुसार १९९७ ला पवारांनी सोनियांना राजकारणात आणले पण पुढे त्यांच्या मूळ इटालीन वंशाचा मुद्दा घेऊन नेतृत्वाला विरोध केला. काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादीची स्थापना केली.

३) पुढे स्थापनेनंतर १९९९ च्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी परत काँग्रेसशी आघाडी केली. ज्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून पवार बाहेर पडले होते त्याच्याशी त्यांनी ऍडजस्टमेन्ट केली. पवार आणि सोनिया गांधी याचे लगेच मतभेद मिटले. 

उद्धव ठाकरे 

१) महाराष्ट्रात नेहमी शिवसेनेचा दरारा राहिला. मात्र २०१४ मध्ये देशात मोदी लाट आली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद झाले. यावेळी शिवसेनेने ६२ तर भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला. बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या झाल्या. भाजपने बहुमताच्या जवळपास जागा जिंकल्या होत्या. म्हणून अखेर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. 

२) २०१९ च्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने भाजपशी युती केली. निवडणुकीत भाजपने १०५ तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. यामुळे शिवसेनेने आपली बार्गेनिंग पावर वाढवत सत्तेत समसमान वाटा आणि मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्ष अशी मागणी केली. पण भाजपने सेनेची मागणी फेटाळली आणि सत्तास्थापनेसही नकार दिला. 

तेव्हा शिवसेनेने लगेच विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीची मदत घेतली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना झाली. 

राज ठाकरे

१) उद्धव ठाकरेंमुळे राज यांचा भ्रमनिरास झाला होता. त्यांना पक्षात आपलं भविष्य दिसतं नव्हतं. शिवाय शिवसेनेचा हिंदुत्वाकडे वाढता कल आणि मराठी भाषेचा सुटत चाललेला मुद्दा यावर ते नाराज असल्याचं सांगितलं जातं. तेव्हा त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत २००६ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं त्यांनी तेव्हा जाहीर केलं होतं.

२) २०१४ चं वारं ओळखत राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा मागे सारत हिंदुत्वाचं समर्थन करणाऱ्या पक्षाला म्हणजेच भाजपला समर्थ दिलं. त्यासाठी २०११ मध्ये गुजरात दौरा करत मोदींची स्तुती केली. २०१२ ला आझाद मैदान मोर्चात ‘सॉफ्ट हिंदुत्ववादी’ भूमिका घेतली. मात्र त्यांच्या या स्टॅण्डचा ना त्यांना लोकसभेत फायदा झाला ना विधानसभेत.

३) यानंतर २०१९ च्या निवडणुकीत मग राज ठाकरेंनी बरोबर विरोधी भूमिका घेतली. त्यांनी मोदींचा कडाडून विरोध करण्याची खेळी खेळली. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पहिल्याच सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींची काही वर्षांपूर्वीची आणि २०१९ पर्यंतच्या विधानांचे व्हिडिओ दाखवले. मोदींनी दिलेली आश्वासने किती फसवी आहेत यासंदर्भात भाषण केले.

४) २०२० पासून परत एकदा भाजपच्या जवळ जाण्याची चिंन्ह राज ठाकरेंकडून दिसत आहेत. गेल्या अडीच वर्षात भाजपने ज्या मुद्द्यांना लावून धरलंय त्याच मुद्द्यांना राज ठाकरेंनीही हात घातलाय. 

काल झालेल्या पाडवा मेळाव्यातून भाषण करताना पवारांपासून ते ठाकरेंपर्यंत सर्वांचा समाचार राज ठाकरेंनी घेतला. मात्र भाजपच्या नेत्यांचा नामोच्चार केला नाही. म्हणून राज यांनी परत भूमिका बदलल्याची चर्चा होतेय.

मात्र एकदंरीत जर बघितलं तर, राज यांना विरोध जे आज करताय त्यांनी देखील भूमिका बदलल्याचं इतिहास सांगतो…

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.