नेते म्हणतायेत, ‘तुम हमे वोट दो, हम तुम्हे ५० रुपये में दारू देंगे’
निवडणूका जवळ आल्या कि, नेतेमंडळीचं आपल्या जनतेवर लयं प्रेम उफाळून येत. मग कोणी त्यांच्यात येऊन गप्पा मारतं, शेतात जाणून काम करतं, नाहीतर त्या त्या भागात जे काही फेमस असले तिथं जाऊन आपली नाळ कशी मातीशी जोडलीये, हे दाखवण्याचा प्रयत्न करत.
हे बघून जनतेचं मन भारावत नाही तर आपल्या प्रचार सभांमधून आश्वासनांचा पाऊस पाडतात. वोटिंगच्या बदल्यात हे एकशे एक आश्वासन…. कोणी म्हणत अख्खे डांबराचे रस्ते करू… कोणी म्हणत फुकट वीज देऊ.. स्वस्त धान्य देऊ… हेलिकॉप्टरची राईड देऊ.. अमुक तमुक., अशी नवनवीन आश्वासन पाहायला मिळतात. पण भिडू बैठकीतल्या लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मुद्द्यावर अजूनतरी खुलेआम कोणी बोललेलं पहायला नव्हतं. पण आता नेतेमंडळींच्या आश्वासनांच्या यादीत त्याचा सुद्धा समावेश झालाय.
आता बैठकीतल्या लोकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न म्हणजे “दारू”. तस बऱ्याच निवडणुकीच्या टायमाला उमेदवारांकडून तशी खाण्या- पिण्याची सोया असतेच. पण ते खुल्लमखुल्ला कोणी बोलत नाही. पण एका नेत्यानं थेट सामोरासमोर आपल्या जनतेची ती ख्वाईश सुद्धा पूर्ण करणार असल्याच म्हंटलंय.
“तुम हमे वोट दो, हम तुम्हे ५० रुपये में दारू देंगे”
असलं आश्वासन ऐकून आपल्या बैठकीतल्या लोकांचे कान टवकारले असतील. रात्रीची अजून उतरलेली नसेल तर दोन मिनिट डोळे चोळून परत वाचतील कि, हे खरचं हाय का? …तर भिडू हो हे खरचे.
आंध्र प्रदेशातल्या एका भाजप नेत्यानं आपल्या जनतेनला हे आश्वासन दिलंय. विजयवाडा येथे एका कार्यक्रमादरम्यान आंध्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष सोमू वीरराजू म्हणाले,
भारतीय जनता पक्षाला एक कोटी मतं द्या. आम्ही फक्त ७० रुपयांत दारू देऊ. आणि जर आमच्याकडे आणखी महसूल शिल्लक राहिला तर त्यात २० रुपये आणखी डिस्काउंट देऊन ती दारू फक्त ५० रुपयाला देऊ. आणि ती पण बेस्ट क्वालिटी.
वीरराजू यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत म्हंटल कि, “राज्यात बनावट ब्रँडची दारू एक्सट्रा पैसे घेऊन विकली जातेय. म्हणजे एक क्वाटर पार २०० रुपयांना विकली जातेय आणि तसही आपल्या इथं चांगल्या ब्रँडची दारूचं नाही ओ. सरकारच्या लोकांचे दारूचे कारखाने आहेत, ते राज्यात एकदम बेकार क्वालिटीची दारू देतात. त्यामुळं तुम्ही आपल्या भाजपला मतदान करा, बघा दारू स्वस्त होऊनच जाईल.”
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील प्रत्येक व्यक्ती दारूवर महिन्याला अंदाजे १२ हजार रुपये खर्च करते. आणि राज्यात दारू पिणाऱ्यांची संख्या एक कोटीच्या आसपास आहे. पण राज्यातली दारू इतकी महाग आहे कि प्रत्यकाला परवडेलच असं नाही. त्यामुळे या एक कोटी लोकांनी भाजपला मतदान करावं, अस मला वाटत.
भाजपचं सरकार निवडून आलं कि त्यांना ७५ रुपयांना एकदम क्वालिटी दारूची बाटली दिली जाईल. आणि जर आपला महसूल चांगला असेल तर ५० रुपयाला सुद्धा बाटलीही विकली जाईल. असंही ते यावेळी म्हणाले.
Cast one crore votes to Bharatiya Janata Party…we will provide liquor for just Rs 70. If we have more revenue left, then, will provide liquor for just Rs 50: Andhra Pradesh BJP president Somu Veerraju in Vijayawada yesterday pic.twitter.com/U9F1V8vly7
— ANI (@ANI) December 29, 2021
आता भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या ऑफरमुळे अनेक भिडू लोक खुश असतील. अस्सल बैठकीतली मंडळी त्यांचं म्हणणं मनावर सुद्धा घेतील, पण यामुळं भाजपची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. कारण एकीकडे भाजपच्या बाकीच्या राज्यांमध्ये जिथं दारुबंदीसाठी बोलबाला सुरुये. तिथंच आंध्र प्रदेशात एका भाजप नेत्याचं निवडून आल्यावर राज्यात दारू स्वस्त करणार वक्तव्य म्हणजे लोक बुचकळ्यात पडलीत.
पण हीच संधी विरोधी पक्षातली मंडळी उचलतील, आरोप – प्रत्यारोप करतील आणि यामुळं भाजप चांगलाच गोत्यात सापडणार एवढं मात्र नक्की.
हे ही वाच भिडू :
- घाबरलेल्या वेंकैय्या नायडूंना आश्वासन दिलेलं, जिथं इंदिराजी सभा घेतील तिथं मी सुद्धा घेईन
- फारूख अब्दुल्लांनी जाहीर सभेत काश्मिरी पंडितांची माफी मागून राजकारणाला नवीन वळण दिलंय
- आधी लय राज्यात वापरलेली स्कीम, केजरीवाल पंजाबमध्ये आणू पाहतायत