रोहित शर्माच्या हॅट्रिकने सचिनच्या मुंबई इंडियन्सला रडवल होतं….

भारतातीलचं नव्हे तर जगातील लोकप्रिय लीग असलेल्या आयपीलमध्ये सर्वोत्तम कॅप्टन कोण, बेस्ट बॉलर , फिल्डर कोण अशा अनेक रेकॉर्ड्सची चर्चा होत असते, अनेक चमत्कारिक रेकॉर्ड पाहायला मिळतात. आजचा असाच एक चमत्कारिक किस्सा रोहित शर्माबद्दलचा.

तब्बल पाच वेळा आयपीएल टायटल जिंकलेला मुंबई इंडियन्स संघाचा रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातला सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून गणला जातो.

महेंद्रसिंग धोनीच्या सर्वोच्च आयपीएल करंडकाचं रेकॉर्ड रोहितने मोडीत काढलं होतं. रोहित शर्मा २०१३ साली कर्णधार असताना मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला. रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर मात्र मुंबई इंडियन्स चांगल्या फॉर्मात खेळू लागली आणि विजयी होत राहिली.

ज्या टीमचा सगळ्यात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्मा खेळत होता त्याच टिमविरुद्ध एकेकाळी रोहित शर्माने आपल्या बॉलिंगने बाजार उठवला होता.

या सगळ्यात लोकप्रिय लीगमध्ये सुरवातीला रोहित शर्मा डेक्कन चार्जेस हैद्राबाद या संघाकडून खेळत होता. २००९ साली रोहित शर्माने चांगली कामगिरी करत डेक्कन चार्जेसला आयपीएल चषकावर आपलं नाव कोरायला मदत केली होती.

२००९ साली आयपीएल स्पर्धा हि काही कारणास्तव साऊथ आफ्रिकेत खेळवण्यात आली होती. या लीगच्या ३२ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जेस हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या सामन्यात रोहित शर्माने आपल्या खेळाने सगळ्या सामन्याच चित्र पालटवलं होतं.

मुंबईला विजयासाठी १४६ धावांचा पाठलाग करायचा होता. डेक्कन चार्जर्स संघाकडून रोहित शर्माने ३६ चेंडूत ३८ धावांची महत्वाची खेळी साकारली होती. १०० धावांवर मुंबई इंडियन्स संघाचे ४ खेळाडू बाद झाले होते आणि मुंबईला जिंकण्यासाठी पाच षटकांत फक्त ४६ धावांची गरज होती. मुंबईच्या दृष्टीने हे आव्हान किरकोळ होते आणि मुंबई हा सामना सहज जिंकेल असं चित्र दिसत होतं.

डेक्कनचा कर्णधार असलेल्या गिलख्रिस्टने थेट रोहित शर्माला चेंडू सोपवला. रोहित शर्माने या आधी आयपीएलमध्ये जास्त बॉलिंग केलेली नव्हती. पण रोहितने पार्टटाइम बॉलर म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी गोलंदाजीचं आव्हान स्वीकारलं.

पहिल्या ओव्हरच्या सलग दोन चेंडूंवर रोहितने अभिषेक नायर आणि हरभजन बाद केलं. या षटकात रोहितने दोन महत्वपूर्ण बळी घेऊन केवळ दोन रन दिले. यामुळे सामन्यात प्रचंड रंगत वाढली. या सामन्यात जे पी ड्युमिनी खतरनाक खेळत होता, त्याने मुंबईकडे सामना खेचून आणला होता आणि आता ड्युमिनीच मुंबईला जिंकून देईल अशी आशा वाटत होती.

१८ व्या षटकाची सुरवात पुन्हा एकदा रोहित शर्माकडून करण्यात आली. आणि चमत्कारिकरीत्या रोहित शर्माने ड्युमिनीला पहिल्याच चेंडूवर बाद केलं आणि सामना पूर्णतः डेक्कन चार्जर्सच्या बाजूने फिरवला. रोहित शर्माने हॅट्ट्रिक केली होती. ड्युमिनीने ५२ धावा करून मुंबईच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण केले  मात्र रोहित शर्माच्या हॅट्ट्रीकने मुंबई पराभूत झाली.

फक्त हॅट्ट्रिक घेऊनच रोहित शर्मा थांबला नाही तर त्याने त्याच ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सौरभ तिवारीला सुद्धा आउट केलं. दोन षटकात केवळ सहा धावा देऊन तब्बल ४ बळी रोहित शर्माने मिळवले होते. मुंबईला १९ धावांनी पराभूत करून डेक्कन चार्जर्स विजयी ठरली.

या सामन्यात केलेल्या अष्टपैलू खेळीने रोहित शर्माला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता.

२००९ च्या पूर्ण हंगामात रोहित शर्माने आपला फॉर्म कायम ठेवला आणि अष्टपैलू खेळी करत ३६२ धावा आणि ११ बळी मिळवले होते.

२००९ च्या करंडक विजेत्या डेक्कन चार्जेस संघात रोहित शर्माने महत्वपूर्ण कामगिरी केली होती. या वर्षी मात्र मुंबईची कामगिरी तितकी चांगली नव्हती. गुणतालिकेत तळाला ७ व्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावा लागलं होतं. या हंगामात मुंबईला तब्बल ८ पराभव सहन करावे लागले होते.

रोहित शर्माची हि मॅच मात्र अनेक रसिकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.