सचिनचा ऑटोग्राफ घेण्यासाठी हॅरी पॉटर रांगेत उभा होता.

भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश आहे यात काही शंका नाही. आपल्या लाडक्या खेळाडूंना एकदा पाहण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे महाभागही आपल्या इथे आहेत.

त्यात ज्याला देव मानलय अशा सचिन तेंडुलकरची क्रेझ तर विचारू नका.

सचिनचे फॅन्स हा एक वेगळा अभ्यास करण्यासारखा विषय आहे. सचिन खेळत असताना अख्ख्या भारतातले रस्ते लॉकडाऊन व्हायचे. त्याने मैदानात पाऊल टाकल्यापासून सचिन सचिन या नामस्मरणाचा गजर स्टेडियमभर व्यापून राहायचा.

एक काळ असा होता भारतातल्या पंतप्रधानापेक्षा जास्त वलय सचिनभोवती होत. आजही निवृत्तीनंतर यात खूप मोठा फरक पडला आहे असं नाही.

क्रिकेट वेड हे आपल्याला मिळालेली ब्रिटिशांची देणगी आहे.

तिथेही क्रिकेट मॅचच्या दिवशी लोक आजारी पडल्याचा बहाणा करून सुट्टी घेतात. क्रिकेट तिथेही एखाद्या धर्माप्रमाणे नसानसात भिनला आहे.

पण तिथल्या वेडेपणात एक सोफेस्टिकेटेडपणा आहे. आपल्या सारखं मॅच जिंकल्यानंतर कपडे फाडून आनंद साजरा करत नाहीत. तिथे टाळ्या वाजवतात. मॅच हरल्यानंतर खेळाडूंच्या घरावर दगडफेक करत नाहीत.

पण याचा अर्थ तिथे क्रिकेट आणि क्रिकेटपटू बद्दल प्रेम कमी आहे असं नाही.

गोष्ट आहे जुलै 2007 सालची. भारतीय टीम इग्लंड दौऱ्यासाठी गेली होती.

तीन सामन्यांच्या कसोटी सिरीजच नाव होतं पतौडी ट्रॉफी.

भारताचा कप्तान होता राहुल द्रविड आणि इंग्लंड मायकल वॉनच्या नेतृत्वाखाली खेळत होती. पहिली कसोटी क्रिकेट पंढरी लॉर्ड्स वर खेळवली गेली.

अत्यन्त अटीतटीचा झालेला हा सामना तुफान रंगला. भारताचे सचिन द्रविड गांगुली लक्ष्मण हे सगळे महत्वाचे खेळाडू मोठी कामगिरी करू शकले नव्हते. पहिल्या इनिंग मध्ये जाफर आणि दुसऱ्या इनिंगमध्ये धोनीने इनिंग सावरली.

तरीही शेवटच्या दिवशी भारताच्या 9 विकेट पडल्या, इंग्लंड अगदी विजयाच्या दारात उभी होती

तरीही पाऊस आपल्या मदतीला आला आणि मॅच ड्रॉ झाली.

इंग्लंडच्या फॅन्सच्या आनंदावर विरजण सांडलं. मॅच संपली, पावसातच पोस्ट मॅच प्रेझेन्टेशन सेरेमनी उरकला.

केविन पीटरसन मॅन ऑफ द मॅच ठरला.

मॅच नंतर खेळाडूंच्या ऑटोग्राफ साठी गर्दी सुरू झाली. विशेष म्हणजे ही गर्दी पिटर्सन किंवा दुसऱ्या एखाद्या इंग्लिश खेळाडूंसाठी नव्हती,

ही गर्दी होती सचिनच्या सहीसाठी.

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक पॅव्हेलियन मध्ये ब्रिटिश फॅन्स शांतपणे ओळीत उभे होते, एकेक करून प्रत्येकाला सचिनची सही घेण्यासाठी पाठवण्यात येत होतं. अनेकजण सह्या घेऊन गेले.

दुसऱ्या दिवशी एका मुलाखती मध्ये हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध सिरीजचा में लीड हिरो डॅनियल रॅडक्लिफने सांगितले की

सचिनची सही घेण्याऱ्याच्या ओळीत मी सुद्धा होतो पण त्याने मला ओळखले नाही.

हॅरी पॉटर तेव्हा ऐन भरात होता, त्याच्या जादूने जगभरातल्या बच्चेकंपनीला भारावून टाकलं होतं. अगदी कमी वयातच त्याची तुलना जगातला सर्वात मोठ्या सेलिब्रिटी फिल्मस्टारमध्ये होत होती.

असा हा डॅनीयल रॅडक्लिफ उर्फ हॅरी मात्र टिपिकल इंग्लिशमन प्रमाणे क्रिकेटचा फॅन होता. आपल्या खास अठराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो मित्रांसोबत भारत इंग्लंड मॅच बघायला आला होता.

आणि त्याला बड्डे गिफ्ट म्हणून आपल्या सर्वात फेव्हरेट सचिन तेंडुलकरची सही हवी होती.

मॅच संपल्यानंतर सर्वसामान्य पब्लिकप्रमाणे तोही ओळीत उभा राहिला. पण सचिनला पाहिल्यावर तो एवढा भारावून गेला की आज आपला वाढदिवस आहे वगैरे बोलायची शुद्ध देखील त्याला राहिली नाही.

सचिन एकाग्रपणे खाली मान घालून ऑटोग्राफ देत होता, डॅनियल रॅडक्लिफ सही घेऊन गेलेलं त्याच्या लक्षात देखील आलं नाही.

सचिनच्या मुलांना मात्र याच वाईट वाटलं. ते हॅरी पॉटरचे भक्त होते.

अशी होती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जादू ज्यातून जगातला सर्वश्रेष्ठ जादूगार हॅरी पॉटर देखील सुटला नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.