औरंगजेबाच्या मुलाला फोडून दिल्ली ताब्यात घ्यायची योजना शंभूराजांनी आखली होती.

शहजादा अकबर हा औरंगजेबाचा चवथा मुलगा. त्याचीही आई लहानपणीच वारली. असं म्हणतात की हा औरंगजेबाचा लाडका मुलगा होता. तो जन्मला औरंगाबाद मध्येच.

मोगल सल्तनतीचा सर्वात महान बादशाह अकबर याच्या नावावरून याच नाव ठेवण्यात आलं होतं.

औरंगजेबाने अकबराला आठ हजारी मनसब दिलेली होती. १६७६ साली त्याला माळव्याचा सुभेदार म्हणून नेमले होते. राजपूत राजांना काबूत ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली होती. तो पराक्रमी देखील होता.

पण जोधपुरचे बंड शमवण्यात त्याला अपयश आले आणि त्यावरून आलमगिर औरंगजेबाची त्याच्यावर खप्पामर्जी झाली. बादशाहने शहजाद्याला खडे बोल सुनावले.

संतापलेल्या अकबराने औरंगजेबा विरुद्ध बंड करायचं ठरवलं.

मुघलांच्या इतिहासात बाप मुलाचा संघर्ष जुना आहे. औरंगजेबाने देखील शहाजहानला कैदेत टाकून सत्ता मिळवली होती.

शहजादा अकबराने देखील ही परंपरा चालवली. त्याला राजपूत राजांनी मदत करायचे आश्वासन दिले. यात प्रमुख होते दुर्गादास राठोड व मिर्झा राजे जयसिंगपुत्र राजा रामसिंग.

११ जानेवारी १६८१ रोजी अकबराने स्वत:ला बादशहा घोषित केले. स्वतःच्या नावाची नाणी देखील पाडली.

शहजाद्याचं बंड ठेचून काढण्यासाठी खुद्द औरंगजेब युद्धात उतरला. पण अकबराच्या ताकदीचा त्याचा अंदाज चुकला. अजमेरजवळ त्याच्या तळावर औरंगजेबापेक्षा किती तर पटीने जास्त सैन्य होत.

तेव्हा जर युद्ध झालं असतं तर औरंगजेबाला पराभव पत्करायची नामुष्की आली असती.

पण बादशहा प्रचंड हुशार होता, युद्धात अपयश येणार हे दिसू लागल्यावर त्याने कुटनीति वापरली. त्याने अकबराच्या नावाचे एक खोटे पत्र लिहिले व ते रजपुतांच्या हाती लदेल याची व्यवस्था केली.

ज्याच्यासाठी आपण लढतोय तोच परत बापाला मिळतोय असा गैरसमज होऊन अनेक रजपूत सरदार अकबरापासून फुटले. मधल्या काळात अकबराने देखील औरंगजेबावर हल्ला केला नाही.

अकबराने हाताशी आलेली बाजी गमावली.

केवळ दुर्गादास राठोड सोडून इतर सगळे साथीदार औरंगजेबाला सामील झाले. अकबरासमोरचे सगळे दरवाजे बंद झाले. आता एकच आशा त्याच्या समोर होती.

छत्रपती संभाजी महाराज.

संभाजी महाराज व शहजादा अकबर समवयस्क होते. योगायोगाने संभाजी महाराजांचा विधीवत राज्याभिषेक अकबराने स्वतःला बादशाह घोषित केलं त्याच काळात म्हणजेच १६ जानेवारी १६८१ रोजी झाला होता.

औरंगजेबाच्या उभ्या आयुष्यात धडकी बसवणारे शत्रू म्हणजे शिवरायांचे मराठे हेच होते.

तेच आपल्याला वाचवू शकतील याची अकबराला खात्री होती. त्याने ११ मे १६८१ शंभुराजांना पत्र पाठवले. त्यात तो स्पष्टपणे म्हणतो की

तुमचा व माझा शत्रू एकच आहे तो म्हणजे आलमगिर. आपण दोघे मिळून त्याला हरवू शकतो.

त्याने राजांना अनेक पत्रे पाठवली , महाराजांनी त्याच्या पत्रांना काही उत्तर पाठविले नाही. पण त्याच्या आधीच अकबराने उत्तरेतून दक्षिणेकडे प्रवास चालू केला.

अकबर मराठ्यांच्या आश्रयास जातो , हे पाहून औरंगजेब खवळला. त्याने अकबरास परत येण्याबाबत दोन पत्रे लिहीली , परंतु त्याने बापाचा थेट अवमान केला.

पुढे औरंजेबाने त्याच्या पत्नीला अटक केली. बहादूरखानाला अकबराला अटक करण्याचे फर्मान पाठवले, पण खानाला फर्मान मिळेपर्यंत अकबर दक्षिणेत पोहोचला.

संभाजी महाराजांनी अकबराला पालीजवळील सुधागडावर ठेवले.

त्यांची योजना होती की अकबराला दिल्लीत पाठवायचं व राजपुतांच्या सहाय्याने त्याला शाही तख्तावर बसवायचं. एकदा अकबर बादशहा बनला की त्याच्यामार्फत , औरंगजेबाला अटक करण्याचं शाही फर्मान पाठवायच.

अशाप्रकारे शाही मदतीनेच पुढे दिल्ली ताब्यात घ्यायची अशी प्रमाणबद्ध योजना राजांनी आखली .

अकबर संभाजी महाराजांना जाऊन मिळालेले कळताच औरंगजेबाचे धाबे दणाणले. अकबराकडे युद्धात लागणारे चातुर्य नाही पण संभाजीराजांची एकत्रित शक्ती आपल्याला संपवू शकते हे त्याला ठाऊक होतं.

संभाजी महाराज शिवशाहीला संपूर्ण भारतभर पसरवण्याच स्वप्न पाहत होते.

पण हे स्वप्न भंग करण्यासाठी स्वकीयांपैकीच काहीजण प्रयत्नशील होते. अण्णाजी दत्तो , सोमाजी दत्तो , हिरोजी फर्जंद आणि इतर मंडळी यांनी शंभूराजांवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी अकबरालासुद्धा ह्या कटात गोवायला पाहिलं, त्याला पत्रे पाठवली. पण तो खाल्ल्या मिठाला जागला. अकबराने ही पत्रे शंभुराजांना पाठवली.

याच पुराव्याचा आधार घेऊन गद्दाराना महाराजांनी हत्तीच्या पायाशी दिलं.

अकबर बराच काळ संभाजी महाराजांच्या आश्रयाखाली होता. त्याला दिल्लीला पाठवून मुघल साम्राज्य ताब्यात घेण्याचा महाराजांनी दोन वेळा प्रयत्न केला पण योगायोगाने या दोन्ही योजना फसल्या. अकबराला परत फिरावे लागले.

पुढे छत्रपती संभाजी महाराज मुघल , पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी, डच यांविरुद्ध आघाडीवर होते , त्यामुळे त्यांना अकबराकडे लक्ष देता आले नाही.

अकबराचे बंड मोडून काढायच्या नावाखाली औरंगजेब बादशाह दक्षिणेत उतरला.

त्याने मराठ्यांना संपवण्यासाठी शक्ती पणाला लावली. संभाजी महाराजांनी उत्तरेत राजपुतांची आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला पण राजपुतांनी ऐनवेळी कच खाल्ली.

शेवटी निरुपाय झाल्यावर अकबराला १६८७ साली राजापूरच्या बंदरातून ५० माणसांच्या सोबत बरोबर इराणला धाडण्यात आलं.

तिथून ३० हजारांच सैन्य गोळा करून संभाजी महाराजांच्या मदती साठी अकबर भारताच्या दिशेने निघाला.

पण अफगाणिस्तानमध्ये पोहचल्यावर त्याला दुर्दैवी बातमी कळाली.

छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती सापडले आहेत व बादशहाने क्रूरपणे हालहाल करून त्यांची हत्या केली आहे.

अकबराच अवसान गळाल व तो परत फिरला.

पुढचा पूर्ण काळ त्याने इराणमध्ये रोज बापाच्या मृत्यूची प्रार्थना करत घालवला. अस सांगतात की औरंगजेबने त्याला उद्देशून म्हटलेलं,

आधी तू मरतोस की मी हेच मला पाहायचंय.

खरोखर घडलंही तसंच. अकबर हा औरंगजेबाच्या आधी एक वर्ष मेला.

पण याच औरंगजेबाला मराठयांनी चिकाटीने लढा दिला व त्याला मराठी मातीत गाडून टाकले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.