दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडवायला एक तरणाबांड शिपाई एकटा गेला होता…
२६/११ चा हल्ला हा भारतीय नागरिकांसाठी एक दुःखद जखम मानली जाते. या हल्ल्यात अनेक शूरवीर ऑफिसर शहीद झाले; पण आपल्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी जीव धोक्यात घालून कित्येकांचे प्राण वाचवले. याच हल्ल्यात एक तरणाबांड सैनिक होता, ज्यानं आपल्या तुकडीचं नेतृत्व करत स्वतः एकटा भिडला होता. आपल्या टीममधल्या लोकांना सांगितलं होतं की, कोणी वर येऊ नका मी सगळं सांभाळतो…त्यांचं नाव संदीप मेजर उन्नीकृष्णन.
आपण जाणून घेणार आहोत शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्याबद्दल. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मेजर उन्नीकृष्णन शहीद झाले होते.
मेजर उन्नीकृष्णन यांचे हौतात्म्य त्यांच्या पालकांसाठी दुःखापेक्षा अभिमानाची भावना आहे.
मेजर उन्नीकृष्णन यांनीही कारगिल युद्धात भाग घेतला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की १२ जुलै १९९९ रोजी जेव्हा कारगिल युद्ध सुरू होते, तेव्हा मेजर उन्नीकृष्णन सैन्यात भरती झाले होते.
मेजर उन्नीकृष्णन लेफ्टनंट म्हणून कारगिलला पोहोचले आणि ऑपरेशन विजयचा भाग बनले. मेजर उन्नीकृष्णन हे ७ बिहार रेजिमेंटमध्ये होते. त्यांचे साथीदार त्यांना आजतागायत विसरलेले नाहीत. काही वर्षे लष्कराचा भाग राहिल्यानंतर २००७ साली ते राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) मध्ये कमांडो म्हणून रुजू झाले.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मेजर संदीप अवघे ३१ वर्षांचे होते. मुंबई हल्ल्यादरम्यान लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी हॉटेल ताजमहाल पॅलेसमध्ये लपत काही लोकांना ओलीस ठेवलं होतं.
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आणि ओलिसांचे संकट संपवण्यासाठी, ५१ स्पेशल अॅक्शन ग्रुप (SAG) ने ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो सुरू केले. SAG हा NSG चा भाग आहे. या ऑपरेशनमध्ये मेजर उन्नीकृष्णन १० कमांडोच्या तुकडीचे नेतृत्व करत होते.
मेजरच्या नेतृत्वाखाली धाडसी कमांडो २८ नोव्हेंबर रोजी हॉटेल ताज येथे दाखल झाले. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर काही महिलांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते आणि खोली आतून बंद केली होती. दरवाजा तोडल्यानंतर मेजर संदीप आपला सहकारी कमांडो सुनील यादवसोबत आतमध्ये जात असतानाच यादव यांना गोळी लागली. मेजर संदीप यांनी दहशतवाद्यांना गोळीबार करण्यात व्यस्त ठेवले आणि यादव यांना तेथून बाहेर काढले.
यानंतर, चकमकी दरम्यान ते दुसऱ्या मजल्यावर पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांनी त्याच्या पाठीवर गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतरही मेजर संदीप आपल्या सोबत्यांना म्हणाले, ‘वर येऊ नका, मी त्यांना सांभाळून घेईन.’
१५ मार्च १९७७ रोजी केरळमधील कोझिकोड येथे त्यांचा जन्म झाला. ते त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते आणि पण ते कधीही देशसेवेपासून मागे हटले नाहीत. त्यांना लहानपणापासूनच आर्मी ऑफिसर बनायचे होते. ते शाळेत नेहमी मिलिटरी कट हेअरस्टाइल ठेवायचे. त्यांचे वडील के. उन्नीकृष्णन हे इस्रोचे निवृत्त अधिकारी आहेत आणि त्यांच्या आई गृहिणी आहे. मेजर संदीपने फ्रँक अँथनी पब्लिक स्कूल, बेंगळुरू येथून आपले शिक्षण पूर्ण केले होते.
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी १९९५ साली पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) प्रवेश घेतला. NDA च्या ऑस्कर स्क्वाड्रनमध्ये सामील झाले आणि ९४ व्या कोर्समधून उत्तीर्ण झाले आणि 7 बिहारमध्ये कमिशन झाले. आजही त्यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लाखोंचा जनसमुदाय जमला होता आणि त्यांच्या साथीदारांना ते दृश्य अजूनही आठवते.
मेजर उन्नीकृष्णन त्यांच्या एका कोर्समेटच्या लग्नासाठी निघणार होते, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. रिझर्व्हेशन तिकीट असतानाही ते आपल्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाही आणि देशासाठी शहीद झाले. मेजर उन्नीकृष्णन यांना ऑपरेशन टॉर्नेडोमध्ये अतुलनीय धैर्य दाखवल्याबद्दल अशोक चक्र प्रदान करण्यात आले.
कारगिल मध्ये संदीप यांनी काय केले होते ?
मेजर उन्नीकृष्णन यांना कारगिल युद्धात पाठवण्यात आले तेव्हा त्यांना फॉरवर्ड पोस्टवर तैनात करण्यात आले होते. येथे शत्रूकडून जोरदार तोफखाना गोळीबार केला जात होता. पाकिस्तानी सैनिक भारतीय जवानांवर छोट्या शस्त्रांनी सतत हल्ले करत होते. या युद्धानंतर ३१ डिसेंबर १९९९ रोजी मेजर उन्नीकृष्णन यांनी सहा सैनिकांच्या तुकडीच्या मदतीने नियंत्रण रेषेवर २०० मीटर अंतरावरील पोस्ट पुन्हा ताब्यात घेतली, ज्यावर पाकिस्तानी सैनिक येऊन जबरदस्तीने बसले होते.
अश्या या तरण्याबांड अधिकाऱ्याने दहशतवादी लोकांची सुद्धा गाळण उडवली होती. आजही त्यांचं शौर्य आणि धैर्य लोकांच्या चिरकाल स्मरणात राहील.
हे ही वाच भिडू :
- 26/11 च्या हल्ल्याची दाहकता जगासमोर आणणारा फोटोग्राफर मात्र शेवटपर्यंत उपेक्षितच राहिला
- २६/११ नंतर अंबानींना ईमेल मिळाला, ताज के बाद अब तुम्हारी बारी है..
- २६/११ मुळे आबांवर टिका करता पण त्यांनीच शहिदांच्या मुलांना सन्मानाच्या नोकऱ्या दिल्या..