पाटलांनी एका ओव्हरमध्ये ६ चौकार मारून इंग्लंडच्या बत्त्या गुल केल्या होत्या….

क्रिकेटमध्ये अनेक विक्रम घडतात,मोडतात,पुन्हा नवे नवे विक्रम रचले जातात. जस जस क्रिकेटचं स्वरूप बदलत गेलं तस तसं त्याच ग्लॅमर सुद्धा वाढत गेलं. काही क्रिकेटपटू तर सिनेमसुद्धा करू लागले होते. सेलिब्रिटी क्रश असलेला भारताचा क्रिकेटपटू म्हणजे संदीप पाटील.

संदीप पाटील हे आजवर भारतीय संघाला लाभलेले सर्वोत्कृष्ट निवड समिती अधिकारी मानले जातात. पण आपल्या क्रिकेट करिअरमध्ये जबरदस्त बॅटिंग संदीप पाटील करायचे. बॉब विलीसला त्याच्या घरच्या मैदानावर जाऊन त्याची बॉलिंग संदीप पाटलांनी फोडून काढली होती.

संदीप पाटील हे अस्सल मराठमोळे खेळाडू. १८ ऑगस्ट १९५६ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. लहानपणासुनच क्रिकेटचं वेड त्यांना होतं. भारतीय संघात आल्यावर त्यांनी आपला जलवा दाखवून अनेक क्रिकेट फॅन्स कमावले. १९८३ वर्ल्डकप विजेत्या संघाचे संदीप पाटील सदस्य होते. आक्रमक बॅटिंग करून जास्तीत जास्त धावा करणे आणि मिडीयम पेस बॉलिंग करणे हे अत्यंत कौशल्याने संदीप पाटील करायचे. संदीप पाटील हे असे खेळाडू होते ज्यांनी घरच्या मैदानात कमी पण परदेशातल्या खेळपट्ट्यांवर आपली ताकद दाखवून दिली.

भारतीय संघात पदार्पण करण्यापूर्वी संदीप पाटलांनी एक भन्नाट इनिंग खेळली होती ती सौराष्ट्र विरुद्ध. २०५ बॉलमध्ये १९ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने २१० धावांची जबरदस्त खेळी केली होती. या मॅचमध्ये पाटलांनी एक सिक्सर इतका लांब मारला होता की तो थेट बाजूच्या हॉकीच्या स्टेडियम मध्ये जाऊन पडला होता.

१९८१ सालचा ऑस्ट्रेलिया दौरा हा संदीप पाटील यांच्या करियरचा पीक पॉईंट मानला जातो. यातल्या एका सामन्यात विना हेल्मेट खेळताना कानाजवळ बॉल लागल्याने पाटील मैदानातच कोसळले. रिटायर्ड हर्ट होऊन ते पुन्हा मैदानाटनाळे तेव्हा त्यानी १७४ धावांची खतरनाक खेळी केली होती. डेनिस लिली आणि लेन पेस्को सारख्या दिग्गज गोलंदाजांना पळता भुई थोडी संदीप पाटलांनी केली होती.

१९८२ चा इंग्लंड दौरा. हा दौरा प्रत्येक जुन्या क्रिकेट फॅन्सच्या लक्षात राहणारा आहे. ओल्ड ट्रेटफोर्डच्या टेस्टमध्ये वादळी १२९ धावा संदीप पाटलांनी बनवल्या होत्या. इंग्लंडचा बॉलिंग बादशहा असलेल्या बॉब विलीसला पाटलांनी अक्षरशः झोडपून काढलं होतं.

बॉब विलीसच्या एका ओव्हरमध्ये ६ चौकार पाटलांनी लगावले होते.

४,४,४,०,४,४,४

यातला एक बॉल हा नोबॉल होता. हे प्रकरण तेव्हा भरपूर गाजलं होतं. त्यावेळी संदीप पाटील यांच करियर ऐन जोमात होतं. विलीसची मात्र हवा टाईट झाली होती. त्या मॅचचे हिरो संदीप पाटील होते.

१९९२-९३ नंतर संदीप पाटील यांनी क्रिकेटला राम राम ठोकला आणि ते थेट सिनेमाकडे वळले. कभी अजनबी थे या सिनेमात संदीप पाटलांनी आणि सय्यद किरमानी यांनी काम केलं होतं. नंतर पुन्हा पाटील क्रिकेट कोचिंगकडे आले. केनिया आणि ओमान या दोन देशांसाठी त्यांनी यशस्वी कोचिंग केली. २०१२ साली ते भारतीय संघाचे चीफ सेलेक्टर बनले.

संदीप पाटील यांच्या करियरचं आकर्षण होतं ते बॉब विलीसला इंग्लंडमध्ये जाऊन ६ चौकार मारणे. मराठी हिसका ट्रेटफोर्डच्या मैदानावर संदीप पाटलांनी दाखवला होता. १९८३ च्या संघात सदस्य राहिलेले संदीप पाटील यांनी पुढे निवड समिती अधिकारी झाल्यावर अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली. आजवरचे सगळ्यात यशस्वी सिलेक्टर म्हणून संदीप पाटलांचं नाव घेतलं जातं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.