चिडलेले सरदार पटेल नेहरूंना म्हणाले होते, “लोकशाहीमध्ये पंतप्रधान सर्वात मोठे नसतात, तर…”

पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर भारताच्या जडणघडणीत फार महत्वाचं योगदान असणारे व्यक्तिमत्व.

भारतीय स्वातंत्र्याची लढाई दोघांनी खांद्याला खांदा देऊन लढली आणि त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनुक्रमे पंतप्रधान आणि उपपंतप्रधान म्हणून देशाचा कारभार हाकला.

नेहरू-पटेल संबंध आजकाल बरेचदा चर्चिले जातात. दोघांनाही एकमेकांचे विरोधक असल्याचं चित्र सामान्य जनतेसमोर उभा केलं जातं. दोघांमध्ये अनेक मुद्यांवर राजकीय मतभेद होते, याबद्दल दुमतच नाही पण त्याचवेळी दोघांमध्ये परास्परांविषयी असलेला आदरभाव आणि आत्मियतेची भावना याबद्दल या गोष्टीकडे  मात्र जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो.

आजचा किस्सा असाच दोघांमधील टोकाला गेलेल्या संघर्षाचा आणि एका दुखदायक घटनेनंतर परत समंजसपणातून सर्व मतभेद विसरून देशहितासाठी काम करायला एकत्र येण्याचा.

किस्सा आहे डिसेंबर १९४७ सालचा.

देश स्वातंत्र्य होऊन काही महिनेच उलटली होती. देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक दंगली उसळल्या होत्या. राजस्थानमधील अजमेर देखील अशाच दंगलीमध्ये सापडलं होतं. अनेक प्रयत्न करून देखील अजमेर मधील परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती.

गृहमंत्री असलेल्या सरदार पटेल यांनी गृहमंत्रालयाचं एक शिष्टमंडळ अजमेरला पाठवलं होतं. अशा परिस्थितीत नेहरूंनी घोषणा केली की डिसेंबर अखेरीस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण अजमेरचा दौरा करू.

नेहरूंची ही घोषणा पटेलांना आवडली नाही पण पंतप्रधान नेहरू यांच्याविषयी असलेल्या आदरामुळे त्यावेळी ते गप्प राहिले. पण अजमेर दौरा अगदी तोंडावर आलेला असताना नेहरूंनी घोषणा केली की ‘ते अजमेरला जाणार नसून, त्यांच्याऐवजी त्यांचे पर्सनल सेक्रेटरी अजमेरचा दौरा करतील आणि परिस्थितीचा आढावा घेतील’

नेहरूंच्या या घोषनेनंतर मात्र नाराज झालेल्या पटेलांनी आपली नाराजी नेहरूंसमोर स्पष्टपणे जाहीर केली. नेहरूंची अजमेर दौऱ्याची घोषणा गृहमंत्रालयाने पाठविलेल्या शिष्टमंडळावर अविश्वास दाखवणारी असल्याचं पटेलांनी नेहरूंना सांगितलं. एकवेळा स्वतः नेहरू अजमेर दौऱ्यावर जाणार होते तिथपर्यंत ठीक होतं, पण पर्सनल सेक्रेटरीला पाठविण्याच्या   घोषणेला त्यांनी विरोध केला.

नेहरूंच्या मनात देखील पटेलांविषयी आदर होता. त्यामुळे त्यांनी पटेलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आपण स्वतःच अजमेरला जाणार होतो परंतू नातेवाईकांपैकी कुणीतरी दगावल्याने आपल्याला ते शक्य नसल्याचं त्यांनी पटेलांना सांगितलं. आधी घोषणा केल्यामुळे अजमेरमध्ये आपली वाट बघणाऱ्या जनतेसाठी आपला प्रतिनिधी म्हणून पर्सनल सेक्रेटरीला पाठविण्यात येतंय, असंही ते पटेलांना म्हणाले.

नेहरूंकडून आलेले हे स्पष्टीकरण पटेलांना कदाचित पटलं देखील असतं पण बोलताना नेहरू पुढे म्हणाले,

“पंतप्रधान सरकारचे प्रमुख असतात. या नात्याने ते देशात कुठेही जाऊ शकतात आणि कुणालाही कुठेही पाठवू शकतात”

नेहरूंचं हे बोलणं मात्र सरदार पटेलांना खटकलं आणि चिडलेले सरदार पटेल नेहरूंना म्हणाले,

“लोकशाही व्यवस्थेत पंतप्रधान पदावरील व्यक्ती सर्वात मोठी नसते तर ती ‘फर्स्ट अमंग द इक्वल्स’ म्हणजेच समान लोकांमध्ये पहिली असते. लोकशाहीमध्ये पंतप्रधानांकडून ही देखील अपेक्षा असते की त्यांनी आपल्या मंत्र्यांना मनमानी हुकुम देऊ नयेत”

दोघांमधील या संवादानंतर प्रकरण आणि विवाद मोठ्या प्रमाणात वाढला. मग शेवटी हे प्रकरण गांधीजींकडे गेलं. दोघांनीही गांधीजींना सांगितलं की ते दोघे एकमेकांसोबत काम करू शकत नसल्याने आपला राजीनामा देऊ इच्छितात.

गांधीजींनी दोघांनाही सांगितलं की या प्रकरणावर हे दोघांशीही बोलतील आणि मग निर्णय घेतील पण सध्या दोघांनीही आपापलं काम करणं सुरूच ठेवावं कारण देशाला दोघांचीही गरज आहे.

त्यानंतर पुढच्या काही दिवसात तिघांनाही एकत्र बसून चर्चा करता येईल अशी संधीच मिळत नव्हती. शेवटी ३० जानेवारी १९४८ रोजी तो दिवस आला. गांधीजींनी पटेलांना भेटायला बोलावून त्यांना समजावून सांगितलं की देशासमोरील आव्हाने फार मोठी आहेत नि अशा परिस्थितीत देशाला दोघांचीही गरज आहे.

दुसऱ्या दिवशी नेहरूंना भेटायला बोलावून याविषयावर त्यांच्याशी देखील चर्चा केली जाईल आणि दोघांमधील वाद-विवादाचे  मुद्दे चर्चेतून कायमस्वरूपी चर्चेतून निकाली काढले जातील. पण गांधीजींसाठी दुसरा दिवस उगवलाच नाही. त्याच दिवशीच्या प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे या माथेफिरुने गांधीजींची हत्या केली.

गांधीजींची हत्या हा मात्र जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल या दोघांनाही प्रचंड मोठा धक्का होता. यातून सावरण्यासाठीही आणि गांधीजींच्या इच्छेसाठीही दोघांना एकमेकांची गरज होती.

अशा वेळी जवाहरलाल नेहरूंनी पुढाकार घेतला आणि सरदार पटेलांना पत्र लिहिलं. गांधीजींच्या हत्येने सगळं काही बदललं असून आता पूर्वीचे मतभेद विसरून देशाच्या उभारणीसाठी एकत्र काम करणं आवश्यक आहे.

नेहरूंच्या या पत्रानंतर सरदार पटेलांनी देखील मोठ्या मनाने त्यांच्या प्रस्तावाचा स्वीकार करण्याचं ठरवलं. त्यांनी देखील नेहरूंना पत्र लिहून गांधीजींच्या हत्येनंतर बदललेल्या परिस्थितीत एकमेकांसोबत काम करण्याची तयारी दाखवली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.