एकदा मराठी महिला खासदाराने संसदेत विरोधी पक्ष नेत्याचा शर्ट फाडला होता..

भारतातील जेष्ठांचं सभागृह म्हणजे राज्यसभा काल एका वेगळ्याच कारणांनी गाजली. संसदेत  मोदी सरकारने विमा दुरुस्ती विधेयक आणलं होतं. राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना विरोधी पक्षाने घोषणाबाजी केली. मात्र या विरोधी पक्षाच्या खासदारांना आवरण्यासाठी सुरक्षा मार्शलना पाचारण करण्यात आले. त्या वेळी अभूतपूर्व असा गोंधळ झाला. मार्शल आणि खासदार यांच्यात मारामारीचे प्रसंग देखील घडल्याचं बोललं गेलं.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, 

राज्यसभेत पहिल्यांदा खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांना मारहाण करण्यात आली.

शरद पवारांच्या सारख्या जेष्ठ नेत्याने देखील गेल्या पन्नास वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत असा प्रसंग पहिल्यांदाच पाहिल्याचं सांगितलं. पण सरकारकडून बोलताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, 

“उलट विरोधी सदस्यांनी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली”

सत्ताधारी विरोधकांचे आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. पण असे छोटे मोठे प्रसंग यापूर्वी देखील संसदेत घडून गेलेत. महिलांवरचे अत्याचार वगैरे बरोबर आहे पण एकदा तर एका महिला खासदाराने थेट विरोधातल्या खासदाराचा शर्टच फाडून टाकला होता.

त्या खासदार होत्या महाराष्ट्राच्या सरोज खापर्डे 

१९८३ सालचे पावसाळी अधिवेशन सुरु होते. शेवटचा दिवस होता. भाजपचे खासदार जगदीश प्रसाद माथूर यांनी स्वराज पॉल यांच्या प्रकरणाचा प्रश्न उपस्थितीत केला. सत्तेत असलेल्या काँग्रेसला हा अडचणीत आणणारा विषय होता. सभागृहात हा विषय आला कि त्याला प्रखर विरोध करायचा असं सत्ताधाऱ्यांचं ठरलं होतं. तशा सूचना खासदारांना देण्यात आल्या होत्या. 

स्वराज्य पॉल यांचा विषय निघाला कि चुकीची माहिती म्हणून ओरडायचं असा चंग काँग्रेसच्या खासदारांनी बांधला होता.

तसेच घडलं. विरोधी पक्षाचे कोणीही खासदार पॉल यांच्या बद्दल बोलायला निघाले कि काँग्रेसचे तरुण खासदार गोंधळ घालून हा विषय बंद पाडायला बघायचे. त्या दिवशी राज्यसभेची बैठक रात्री पावणे अकरा पर्यंत चालली. संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री कल्पनाथ राय व लोकदलाचे सत्यपाल मलिक यांची सभागृहात चांगलीच जुंपली. 

विषय वाढला. मलिक यांनी मंत्रीमहोदय कल्पनाथ राय यांना उद्देशून काही आक्षेपार्ह शब्द वापरले. एवढंच नाही तर त्यांना चप्पल देखील दाखवली.

राज्यसभेतील वातावरण तंग बनले. कशीबशी बैठक आवरण्यात आली. संतप्त वातावरणात बैठक संपली व सभासद बाहेर पडू लागले. सभागृहाला लागून असलेल्या लॉबीतून मंडळी बाहेर पडली. अशातच एक संतप्त खासदार या सदस्यांच्या सामोऱ्या आल्या.     

त्या होत्या नागपूरच्या सरोज खापर्डे.  पंतप्रधान इंदिरा गांधींच्या लाडक्या खासदारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जायचं. संजय गांधींच्या यंग ब्रिगेडमधील एक आक्रमक नेत्या म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आपल्या कणखर आवाजात त्यांनी कित्येकदा इंदिरा गांधींविरुद्ध बोलणाऱ्या विरोधकांची बोलती बंद केली होती.

सरोज खापर्डे या खूपच संतापलेल्या होत्या. सभागृहात चप्पल दाखवणाऱ्या सत्यपाल यांना जवाब विचारायचं ठरवूनच त्या आल्या होत्या. पण ते अगदी काहीच वेळापूर्वी सभागृहातून बाहेर पडले होते. सरोज खापर्डे यांना  काढायचाच होता. योगायोगाने समोर लोकदलाचेच रामेश्वर सिंग दिसले. खापर्डे त्यांच्यावरच उखडल्या. बोलाचाली झाली. आवाज चढले. पार्लमेंट लॉबीत गडबड उडाली.  

या वादावादीचा परिणाम सरोज खापर्डे यांनी थेट रामेश्वरसिंग यांच्या शर्टची कॉलरच पकडली. विषय वाढला. त्या वेळी हजर असलेले खासदार सांगतात या बाचाबाचीत खापर्डे यांनी रामेश्वरसिंग यांचा शर्ट फाडला. 

रामेश्वरसिंग एरव्ही तापट आणि आक्रमक स्वभावाचे म्हणून ओळखले जायचे. पण सरोज खापर्डे यांचा अवतार पाहून ते देखील स्तंभित झाले. त्यांनी काही प्रतिकार केला नाही.खापर्डे या तणतणतच होत्या इतक्यात राज्यसभेचे सभागृहातील नेते असलेले प्रणब मुखर्जी मध्ये पडले आणि त्यांनी खापर्डे यांना बाजूला नेले.

संसदेच्या लॉबीत एका महिला खासदाराने दुसऱ्या एका पुरुष खासदाराला असे खडसवण्याचा हा पहिलाच प्रसंग. या भांडणाची हकीकत थेट पंतप्रधानांच्या पर्यंत पोचली.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी सरोज खापर्डे आणि इडनीरा काँग्रेसचे काही खासदार लोकदलाचे अध्यक्ष चरणसिंग यांच्याकडे गेले आणि तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेलं हे वर्तन शोभतं का अशी विचारणा केली. 

अखेर हा वाद सोडवण्यासाठी प्रणब मुखर्जी यांनाच पुढाकार घ्यावा लागला.

त्यांच्या निवासस्थानी सरोज खापर्डे, सत्यपाल मलिक, रामेश्वरसिंग या सगळ्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली. त्यांनी सगळ्यांची समजूत काढली. हे प्रकरण मिटलं असं सांगून बंगाली मिठाई वाटली आणि सगळ्यांचं तोंड गोड करण्यात आलं. 

हा किस्सा जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी आपल्या राजधानीतून या पुस्तकात सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.