पोरगं ‘ढ’ आहे म्हणून सांगितलेलं, पण मोठे झाल्यावर ते सेक्सॉलॉजिस्ट डॉ. विठ्ठल प्रभू बनले
कामशास्त्र या विषयावर वाचणारे बरेच लोकं भेटतील पण त्यावर बोलणारे अभावानेच आहेत. आपल्याच देशात कामशास्त्रावर विपुल प्रमाणावर लिहिण्यात आलं पण त्याविषयी लोकं घाबरतात. जुन्या, प्राचीन मंदिरावर, लेण्यांवर कोरलेल्या स्त्री पुरुष समागमाच्या आकृत्या बघूनसुद्धा काही लोकं विचलित होतात. स्त्री पुरुष समागम, आणि कामजीवनाबद्दल असणाऱ्या समस्या यावर फक्त स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतीशास्त्र यांमध्येच लिहिलेलं असतं.
आपल्या देशात सेक्स या विषयावर बोलणं म्हणजे काहीतरी अपराध करतोय अशी नजर लोकांची असते. पण डॉ. विठ्ठल प्रभू यांनी या विषयाला वाचा फोडली आणि कामशास्त्र या विषयाचा अभ्यास केला. फक्त अभ्यासच नाही केला तर त्या विषयाला कामविज्ञानशास्त्र अशी ओळखही मिळवून दिली. तारुण्यात येणाऱ्या समस्या, स्त्री पुरुष लैंगिक समस्या अशा अनेक गोष्टींवर त्यांनी पुस्तक लिहून अश्लील समजल्या जाणाऱ्या कामजीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला.
डॉ. विठ्ठल प्रभू सेक्सॉलॉजी या विषयाकडे कसे वळले याविषयी एक रंजक गोष्ट आहे. एकदा त्यांच्या घरी चार भावांची मुंज असताना ज्योतिषाने विठ्ठल प्रभूंची कुंडली बघून सांगितलं होतं कि,
हा मुलगा ढ आहे, मोठेपणी धूळ साफ करण्यापलीकडे हा दुसरं कुठलंही काम करू शकणार नाही.
याचा धसका आईवडिलांनी जास्त घेण्यापेक्षा लहानग्या विठ्ठल प्रभुंनीच जास्त घेतला.
त्यांनी पुढे जोरदार अभ्यास सुरु केला. ते इतका अभ्यास करायचे कि परीक्षेच्या आणि आणि परीक्षेच्या नंतर असे दोनदा ते आजारी पडत असे. तेव्हा डॉक्टर व्हावं असं त्यांच्या मनातही नव्हतं. मोठ्या भावाच्या सांगण्यावरून त्यांनी कारकून हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आणि टायपिंगचा क्लास लावला. भावामुळेच मॅट्रिकनंतर सिद्धार्थ कॉलेजला जाऊ लागले.
इंटरला ५०% मिळाल्यावर त्यांनी बराच विचार करून मेडिकल शाखेला प्रवेश घेतला. परळच्या जीएस मेडिकल कॉलेजला ते जाऊ लागले.
कठोर परिश्रम घेऊन ते डॉक्टर बनले आणि ज्या ज्योतिषांनी त्यांच्या बाबतीत भविष्यवाणी केली होती कि हा धूळ साफ करण्यापलीकडे जास्त काही करू शकणार नाही त्या ज्योतिषालाच हॉस्पिटलचं उदघाटन करायला घेऊन आले.
पुढे एमबीबीएस पदवी मिळवून त्यांनी कामविज्ञानशास्त्र विषयाचा अभ्यास करायला सुरवात केली. या काळात त्यांना एक बातमी ऐकण्यात आली कि एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केली आणि तिच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी मिळाली त्यात लिहिलं होतं कि
माझ्या नव-याने माझ्यावर बलात्कार केला आहे. आता हे शरीर अपवित्र झालं आहे. त्यामुळे जगण्यात काही अर्थ नाही. म्हणून मी माझं आयुष्य संपवत आहे….
या बातमीमुळे डॉ. विठ्ठल प्रभू अवाक झाले कारण आधीच्या काळात लग्न झाल्यावर लैंगिक संबंधावर उघडपणे बोललं जात नव्हतं आणि वडिलधाऱ्यांचा धाक हा वेगळा असायचा. यावर त्यांनी बराच विचार केला आणि कामविज्ञानशास्त्र विषय पुढे आणण्याच ठरवलं.
स्त्री आणि पुरुषाचं खासगी आयुष्य हे कामविज्ञानशास्त्राशी संबंधित आहे. याविषयी जागृती होणं गरजेचं आहे. कामविज्ञानशास्त्रावर वैवाहिक जीवन, कुटुंब, मुलं, नवरा-बायकोचे नातेसंबंध आधारित आहेत.’ या वाक्यांशी त्या मुलीच्या आत्महत्येचा संबंध असू शकतो काय, यावर त्यांनी अभ्यास सुरू केला.
एका दारूच्या दुकानात त्यांना कामशास्त्रावर पुस्तक मिळालं कारण दुसरीकडे कुठे अशी पुस्तक मिळत नसायची. दुकानदाराने ती पुस्तक रद्दीच्या भावात डॉ. विठ्ठल प्रभुना देऊन टाकली. पण या रद्दीच्या भावात मिळालेल्या पुस्तकातून त्यांनी सखोल संशोधन केलं. काम (सेक्स) याचा संबंध हा फक्त वैद्यकीय शाखेशी नाही तर मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र यांच्याशी आहे. यावर त्यांनी भरपूर अभ्यास केला.
कामसूत्र या विषयावर त्यांनी जितकी पुस्तक मिळतील अशा सगळ्यावर अभ्यास केला. त्यांनी लिहिलेलं कामविज्ञानशास्त्र हे पुस्तक त्यांच्या एका मित्राने थेट देव्हाऱ्यात ठेवलं होतं, तेव्हा त्या मित्राच्या बायकोने चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. पुलं देशपांडे यांनीसुद्धा डॉ.विठ्ठल प्रभूंचं या विषयाबद्दल कौतुक केलं होतं. सचिन तेंडुलकर यांचे वडील रमेश तेंडुलकर यांनी लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून तीन व्याख्यानं ठेवली होती पण त्याला सगळे पुरुष उपस्थित होते. यामुळे त्यांचा हिरमोड झाला.
एकदा ते पुस्तक विक्रेत्याकडे गेले आणि विचारलं कि मी लिहिलेल्या पुस्तकाला रिस्पॉन्स कसा आहे तेव्हा तो दुकानदार त्यांच्याकडे बघत म्हणला काय राव या वयात असं लिहिणं शोभतं का तुम्हाला.
कुटुंबनियोजन, वासनाकांडं, एड्स, वाढणारे घटस्फोट, समलैंगिकता यामुळे लैंगिक शिक्षणाचं महत्त्व त्यांनी इतकं डिटेलमध्ये मांडलं होतं कि ते पुस्तक चांगलचं गाजलं होतं.
निरामय कामजीवन, उमलत्या कळ्यांचे प्रश्न, प्रश्नोत्तरी कामजीवन, तारुण्याच्या उंबरठ्यावर, माझं बाळ, विवाहेच्छू आणि नवविवाहितांसाठी विवाह मार्गदर्शन, प्राथमिक उपचार, लैंगिकता शिक्षण, यौवन विवाह आणि कामजीवन, आरोग्य दक्षता अशी त्यांची पुस्तके गाजली.
लैंगिक शिक्षणाबद्दल माहिती दिली गेली तर समाजात बलात्कार आणि इतर गंभीर गुन्हे घडणार नाही. कामशास्त्रविज्ञान हा लपवण्याचा विषय नाही तर जागृती करण्याचा विषय आहे असं डॉ. विठ्ठल प्रभुंना प्रामाणिकपणे वाटतं. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांचं निधन झालं. पण कामजीवनाचा सगळ्यात मोठा भाष्यकार म्हणून त्यांची ओळख आजही आहे.
हे हि वाच भिडू :
- जगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण खातात !
- देशातील पहिले सेक्सॉलॉजिस्ट जे गांधी आणि जिन्नांच्या जवळचे होते
- भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता
- सोसायटीवाल्यांच्या त्रासाला वैतागून त्या म्हणाल्या, “मी सेक्स रॅकेट चालवत नाही.”