फक्त सलमानचा नाही तर आमच्या अख्ख्या पिढीचा तो रोमँटिक आवाज होता.

गोष्ट आहे साठच्या दशकातली. हैद्राबादच्या गोल्डन रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एका गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं.

जेष्ठ व नावाजलेले संगीतकार सत्यम यांचं हे गाणं होत.

त्याकाळची तेलगू मधली सर्वात दिग्गज गायिका एल आर ईश्वरी गाणं म्हणायला होती तर तिच्या सोबत गाणारा एक न्यू कमर होता. ईश्वरी पट्टीची गायिका होती. कर्नाटक संगीतावर तिची पकड होती. तिच्या गाण्याशी मॅच करणे या नव्या मुलाला जमत नव्हते.

अनेक वेळा टेक घेऊन ही तो मुलगा वारंवार चुकतोय हे बघितल्यावर कडक शिस्तीच्या सत्यम यांचं डोकं सटकल. त्यांनी त्या गायकाला प्रचंड शिव्या दिल्या.

वाममूर्ती असलेले किरकोळ शरीरयष्टीचे सत्यम अंगाने धिप्पाड असलेल्या त्या गायकाला अक्षरशः झापत होते.

“कसले कसले फालतू सिंगर आता इंडस्ट्री मध्ये येत आहेत.”

सगळ्या ऑर्केस्ट्राच्या समोर सत्यम गारूनी केलेला अपमान त्या मुलाला सहन झाला नाही. स्टुडिओ बाहेरच्या झाडाखाली बसून तो रडू लागला. सिनेमाच्या निर्माता व दिगदर्शकाने कसबस त्याला समजावून सांगितलं व परत घेऊन आले. निर्माता सत्यमला म्हणाला,

” हा गायक नवीन आहे. तुम्ही त्याला काय चुकतंय ते सांगा, तो शिकेल पण त्याचा असा अपमान करू नका.”

सगळयांना वाटलं की निर्मात्याने सांगितलं आहे म्हटल्यावर सत्यम माफी मागतील.

पण झालं उलटं. सत्यमनी त्या निर्मात्यालाच रागवल. कोणाही सिंगरला उचलून आणून माझा वेळ वाया घालवायचा नाही अशी तंबी दिली.

पण त्या दिवशी ते गाणं त्या मुलाच्याच आवाजात रेकॉर्ड झालं. गंमत म्हणजे ते गाणं प्रचंड सुपरहिट झालं. सत्यम यांनी पुढील काळात त्या सिंगर शिवाय कामच केलं नाही.

तो सिंगर म्हणजे श्रीपती पंडितराद्युला बालसुब्रमण्यम उर्फ एस पी बाला.

खरं तर त्या दिवशी सत्यम यांचं बरोबर होतं. एस पी बालसुब्रमण्यम यांचं कोणतंही सांगीतिक शिक्षण झालेलं नव्हतं. शास्त्रीय संगीतातले राग वगैरे याची काहीही ओळख नव्हती. सहज गंमत म्हणून ते गायचे आणि आवाज गोड आहे म्हणून लोकांना ते आवडूनही जायचं.

शिक्षणाने ते इंजिनियर. कॉलेजमध्ये असताना गॅदरिंग मध्ये वगैरे गाताना त्यांना पोरांनी डोक्यावर घेतल आणि इंजिनियर बनता बनता हा मुलगा याच आत्मविश्वासात
म्युजिकच्या क्षेत्रात आला.

कॉलेजच्या काळात त्याने व त्याच्या मित्रांनी एक म्युजिक ग्रुप बनवला होता. त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या, पारितोषिके मिळवली. या म्युजिक ग्रुपमध्ये गिटार वाजवायला एक मुलगा होता, तो म्हणजे इलिया राजा.

पुढे जाऊन या दोघांनी मिळून अख्ख साऊथ इंडियन सिनेमा हलवून सोडला.

तेलगू फिल्मइंडस्ट्रीचा हा संक्रमनाचा काळ होता. फक्त पौराणिक व ऐतिहासिक विषयावर बनणारे तेलगू सिनेमे आता कात टाकत होते. तरुणांना आवडेल असे मारधाड रोमँटिक सिनेमाची निर्मिती होऊ लागली होती.

बालाचा गोड दमदार आवाज अशा वातावरणात परफेक्ट बसला.

हिंदी मध्ये किशोर कुमार यांचं जस युग सुरू झालं तसं दक्षिणेत बालसुब्रमण्यम उदयास आला. खर तर हिंदीतल्या रफी प्रमाणेच दक्षिणेत येसूदास हे पट्टीचे तगडे गायक होते, शिवाय प्रचंड पॉप्युलर देखील होते.

पण बालाची वेव्हलेंग्थ तरुणांशी जोडली गेली होती.

त्याने कधी येसूदास व इतर गायकांशी स्पर्धा केली नाही, उलट त्यांना गुरू मानून एकलव्याप्रमाणे त्यांची गाणी ऐकत शिकतच गेले. ही मेहनत कधी वाया गेली नाही.

काही दिवसातच तेलगू,तामिळ, कन्नड, मल्ल्याळम अशा सगळ्या दाक्षिणात्य सिनेमामध्ये त्यांचाच आवाज घुमू लागला.

बालाचा साधा सुटसुटीत पण खोल जाणारा आवाज ऐकणार्या प्रत्येकाला भावत होता, गुणगुणायला भाग पाडत होता. कमल हसन सोबत त्याची जोडी खास जमली. त्याच्या प्रत्येक गाण्याला बालाचाच आवाज असू लागला.

फक्त एवढंच नाही तर कमल हसन च्या तामिळ सिनेमाचं तेलगू मध्ये डबिंग करताना सिनेमातला आवाज म्हणून सुद्धा एस पी बालसुब्रमण्यमला वापरण्यात येऊ लागलं.

जसं किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन हे दोन शरीर एक आवाज म्हणून ओळखले जात होते तसंच दक्षिणेत सुपरस्टार कमल हसन आणि बालसुब्रमण्यम यांच्या जोडीला ओळखलं जाऊ लागलं.

किशोर कुमार यांच्या प्रमाणेच बालसुब्रमण्यम यांनी देखील acting केली, संगीत दिग्दर्शन केलं, सिनेमाची निर्मितीदेखील केली.

कमल हसन जेव्हा हिंदीत गेला तेव्हा त्याच्या एक दुजे के लिए साठी सुद्धा गायला बालाच होता. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन गाताना त्याने घातलेली आर्त साद पाहून लता मंगेशकर यांच्या देखील डोळ्यात पाणी उभं राहिलं.

हम बने तुम बने या गाण्याने भारताच्या कानाकोपऱ्यात बालाचा आवाज जाऊन पोहचला.

याच सिनेमासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला.

सगळीकडे एस पी बालसुब्रमण्यम या नावाची हवा सुरू होती. प्रत्येक साऊथ सिनेमात ते असायचेच पण हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये देखील त्यांची हवा झाली.

एक वेळ अशी आली होती की चेन्नईहुन सकाळी फ्लाईट पकडून बालसुब्रमण्यम मुंबईला यायचे. एका दिवसात वीस वीस गाणी गायचे व संध्याकाळी परत जाणारी फ्लाईट पकडून चेन्नई गाठायचे.

१९८९ साली आलेला सूरज बडजात्या यांचा मैने प्यार किया हा देखील बालसुब्रमण्यम यांच्या साठी माईलस्टोन ठरला.

तरुण कोवळ्या दिसणाऱ्या सलमान खानला बालाचा भारदस्त आवाज सूट होईल का अशी शंका सूरज बडजात्याच्या वडिलांनी विचारली होती मात्र सूरज बालसुब्रमण्यमसाठीच आग्रही होता.

एक निरागस शुद्ध टीनेजर रोमँटिक लव्ह स्टोरी असलेल्या मैने प्यार कियाला पब्लिकने प्रचंड पसंत केलं. सलमान भाग्यश्री ची जोडी त्यांना आवडलीच मात्र

सिनेमातली गाणी देखील रेकॉर्डब्रेक फेमस झाली.

आजा शाम होणे आई पासून ते कबुतर जा जा पर्यंत प्रत्येक गाणं सुपरहिट होतं. इथून सलमानचा आवाज म्हणून बालाच नाव फिक्स झालं.

साजन मधलं जिये तो जिये कैसे पासून ते हम आपके है कोन च्या धिक ताना धिक ताना पर्यंत प्रत्येक प्रकारची गाणी बालाने गायली आणि पब्लिकने त्याला डोक्यावर घेतलं.

हिंदी उच्चाराचा प्रश्न असल्यामुळे दक्षिणेतुन कोणी गायक सहसा बॉलिवूडमध्ये गायला उत्सुक नसायचा, गायला तरी ते गाणं प्रेक्षकांना तितकंसं भावत नव्हतं.

पण बालाने हा गैरसमज मोडून काढला होता.

ए आर रहमानच्या पहिल्याच सिनेमात रोजा मध्ये बालसुब्रमण्यमनी गायलेली गाणी त्यांच्या आवाजाची ताकद जाणवून देतात. पुढे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांचा आवाज हिंदीमधून विरळ होत गेला.

सलमानचा आवाज हा शिक्का त्यांच्या साठी घातक ठरला. लॉबिंग करण्याचा धुर्तपणा नसल्यामुळे बाला हिंदीत मागे पडले.

अनेक संगीतकार सलमानसाठी सुद्धा उदित नारायण, सोनू निगम असे गायक घेऊ लागले. दोन हजार च्या नंतर तर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रचंड बदल झाले. त्या वेगवान स्पर्धेमध्ये बालसुब्रमण्यम टिकले नाहीत. ते दक्षिणेतच रमले.

काही वर्षांपूर्वी रोहित शेट्टीने त्याना चेन्नई एक्स्प्रेसच्या निमित्ताने परत हिंदी मध्ये आणलं. यावेळी सलमान नाही तर शाहरुख साठी त्यांनी आवाज दिला.

हा सिनेमात गाणं गाण्याच्या लायकीचा नाही अस म्हटलं होतं त्या एसपी बालसुब्रमण्यम यांना फिल्म इंडस्ट्री मध्ये येऊन पन्नास वर्षे झाली.

त्यांनी आजवर 6 नॅशनल अवॉर्ड मिळवले आहेत. बाकीच्या अवॉर्डसच तर मोजमाप नाही. 40 हजारच्या वर गाणी गाणाऱ्या एस पीचं नाव गिनीज बुकात नोंद आहे.

आजही कधी कुठे त्यांच्या व चित्राच्या आवजातलं साथीयां ये तुने क्या किया सारख हळवं गाणं लागलं तर आपलं मन भुर्र दिशी नव्वद च्या काळातल्या निरागस आठवणी मध्ये नेऊन पोहचत.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.