अक्षरशः विमानतळावर उमेदवारी बदलली आणि जालन्यात पहिल्या महिला आमदार निवडून आल्या

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणजे भारतीय नारी शक्तीची संपूर्ण जगभराला झालेली ओळख. चूल आणि मूल मध्ये अडकलेल्या अबला समजल्या जाणाऱ्या भारतीय महिला राजकारणात देखील यशस्वी होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांना खाली खेचण्यासाठी कित्येक दिग्गज नेते धडाडीने प्रयत्न करत होते.
आणीबाणीनंतर इंदिरा गांधी संपल्या असं म्हटलं जाऊ लागलं पण त्यांनी झोकात पुनरागमन केलं आणि जनतेच्या हृदयस्थानावर आपण राज्य करतो हे सिद्ध केलं.
इंदिरा गांधी यांनी महिला सबलीकरण फक्त स्वतः पुरतं ठेवलं नाही तर त्यांनी राजकारणात आल्यापासून अनेक महिला कार्यकर्त्यांना देखील निवडणुका लढवण्याची संधी दिली. महाराष्ट्रात तर त्यांनी फतवा काढला होता की प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एका महिलेला आमदारकीचं तिकीट दिलं जावं.
इंदिरा गांधींमुळे कित्येक महिला नेत्या घडल्या. विशेषतः १९७८ ते १९८० सालच्या दरम्यान महाराष्ट्रात जेव्हा काँग्रेसचे मोठमोठे नेते पक्ष सोडून गेले होते तेव्हा विरोधी पक्ष नेतृत्व, प्रदेशाध्यक्षपद इत्यादी पदे प्रतिभाताई पाटील, प्रेमला काकी चव्हाण यांसारख्या नेत्यांकडे सोपवण्यात आली होती.
१९८० सालच्या विधानसभा निवडणुकीची गोष्ट.
इंदिरा गांधी या काळात मराठवाड्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. प्रचारसभांचा धडाका सुरु होता. त्याकाळात मराठवाड्यात काँग्रेसचे दोन गट होते. एक बाबूराव काळे यांचा तर दुसरा लोकनेते बाळासाहेब पवार यांचा. औरंगाबाद जालना भागाच्या विकासासाठी थेट यशवंतराव चव्हाण यांना धडक देणारे नेते म्हणून बाळासाहेब पवार यांना ओळखलं जायचं. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून देखील त्यांची चर्चा असायची.
मराठवाड्याच्या विकासासाठी बाळासाहेब पवार यांनी अनेक आंदोलने केली आणि त्यातून कित्येक नेते घडवले. यातच होत्या शकुंतला शर्मा.
मूळच्या राजस्थानच्या असल्यातरी जालना भागात त्यांचं मोठं काम होतं. काँग्रेस सेवादल, अल्पसंख्याक सेल, महिला काँग्रेस अशा विविध आघाड्यांच्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना कामाचा अनुभव होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे १९७७ साली त्यांनी लोकसभेसाठीही दावा केला होता.
थेट इंदिरा गांधींशी संपर्क असणाऱ्या शकुंतला शर्मा यांची दावेदारी प्रबळ आहे असं मानलं जायचं. पण त्यांचं तिकीट कापण्यात आलं. शकुंतला शर्मा यांची तेव्हा खुद्द इंदिरा गांधी यांनी समजूत काढली आणि येत्या विधानसभा निवडणुकीवेळी संधी देण्याचा शब्द दिला.
पण १९८० सालच्या विधानसभा आल्या. शकुंतला यांनी जालना जवळच्या बदनापूर इथे उमेदवारीची मागणी केली. पण काँग्रेसच्या स्थानिक गटबाजीमुळे त्यांना तिकीट मिळालं नाही.
लोकनेते बाळासाहेब पवार यांनी शकुंतला यांना इंदिरा गांधी जेव्हा औरंगाबाद दौऱ्यावर येतील तेव्हा त्यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. अजून उमेदवारी दाखल करण्यास दोन दिवसांची मुदत होती. शकुंतलाबाई लगबगीने औरंगाबादला आल्या. तिथे थेट विमानतळावर त्यांची इंदिरा गांधींशी भेट झाली.
त्यांना पाहताच इंदिरा गांधी यांनी प्रश्न केला, ‘आपका प्रचार कैसा शुुरू है?’
तेव्हा शर्मा यांनी आपल्याला उमेदवारीच मिळाली नसल्याचे सांगितले. इंदिरा गांधी यांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केले व तेव्हाच्या काँग्रेसच्या नेत्या प्रेमला चव्हाण, सरोज खापर्डे, प्रतिभाताई पाटील यांना सूचना करून शर्मा यांना उमेदवारी देण्याची सूचना केली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शर्मा यांना बदनापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. मात्र अगोदरच्या यादीत नाव असल्याने ज्ञानेश्वर भांदरगे यांनी अर्ज दाखल करून प्रचारही सुरू केला होता. परंतु खुद्द इंदिरा गांधी यांच्या सूचनेनुसारच शर्मा यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे भांदरगे यांनी आपला अर्ज मागे घेतला यात त्यांचे आमदारकीचे स्वप्न भंगले तर शर्मा जिल्ह्यातल्या पहिल्या महिला आमदार ठरल्या.
संदर्भ- दिव्यमराठी
हे ही वाच भिडू.
- पक्षाने त्यांचं तिकीट कापलं पण निकालानंतर त्यांना थेट मुख्यमंत्रीच केलं.
- एका रात्रीत खेळ झाला आणि एस.एम. जोशींच संभाव्य मुख्यमंत्रीपद गेलं.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लग्नाच्या बेडीत अडकायचं नव्हतं.