शालिनीताई पाटलांनी पंढरपुरच्या विठोबाला नवस बोललेला की..

महाराष्ट्राच्या आजवरील राजकारणात ज्या महिला वरच्या वरच्या फळीत पोहचल्या व मुख्यमंत्रीपदावर आपला अधिकार सांगितला यात प्रमुख नाव येतं शालिनीताई पाटील यांचं.

पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर जबरदस्त पकड असणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या त्या द्वितीय पत्नी. दोघांचे लग्न होण्यापूर्वीच त्या राजकारणात आल्या होत्या. खर तर राजकारणात असल्यामुळेच त्यांची दादांशी ओळख झाली होती. त्यांच्या पतींच निधन झालं होत. उच्चशिक्षित, हुशार, राजकारणातील खाचाखोचा समजणाऱ्या, प्रशासनात मदत करणाऱ्या शालिनीताईशी दादांनी लग्न केले.

दादांच्या पत्नी म्हणून सगळ्यांना त्यांची ओळख झाली पण वसंतदादांच्या सावलीशिवाय शालिनीताई यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व होतं. 

१९८० साली जेव्हा वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात संघर्ष सुरु होता तेव्हा सातारा लोकसभेत यशवंतरावांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस शालिनीताई पाटलांनी दाखवलं होतं. फक्त इतकंच नाही तर त्यांच्या विरोधात दीडलाख मते घेतली. शालिनीताई या निवडणुकीत पराभूत झाल्या पण एरव्ही २ लाखांच्या मतांनी विजयी होणाऱ्या यशवंतरावांचं बहुमत साधारण पन्नास हजारांपर्यंत खाली आणलं.

खुद्द इंदिरा गांधींच्या दरबारात त्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यावर्षी जेव्हा इंदिरा गांधींनी शरद पवारांचं पुलोद सरकार खाली खेचलं आणि राष्ट्रपती राजवट लावली. त्यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शालिनीताई पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र त्यांचाच आरोप आहे की वसंतदादा पाटलांनी त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिल नाही.

त्याकाळी वसंतदादा पाटील हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेते होते, मुख्यमंत्रीपद त्यांचा हक्क होता. पण केंद्रातल्या श्रेष्ठींनी महाराष्ट्रावर आपला वचक राहावा म्हणून बॅरिस्टर अंतुलेंना मुख्यमंत्री केलं. अंतुले हे संजय गांधींच्या अगदी जवळचे नेते होते, काँग्रेसच्या वाईट काळात त्यांनी पक्षाला साथ दिली होती याचे फळ म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं.

अंतुलेंच्या मंत्रिमंडळात वसंतदादा सहभागी झाले नाहीत पण शालिनीताई पाटील यांना महसूल मंत्रिपद देण्यात आलं. एकअर्थे त्यांचं स्थान अंतुलेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाप्रमाणे होतं. अंतुलेंच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीचं नेतृत्व शालिनीताईच करायच्या.

पण अंतुले आणि वसंतदादा पाटील यांच्यातील स्पर्धा शिगेला पोहचली होती. अंतुले पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी चळवळ व साखर कारखाने यांचे खच्चीकरण करून वसंतदादांचे पंख कापण्याच्या उद्योगाला लागले होते. तर वसंतदादा पाटलांनी हा अंतुले किती दिवस मुख्यमंत्रीपद राहतो तेच बघतो असं जाहीर वक्तव्य केलं होतं.

अंतुलेंचा मुख्यमंत्रीपदाच्या कामाचा धडाका प्रचंड मोठा होता. जाग्यावर निर्णय घेण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांच्या या धडाकेबाज कारभारात हुकूमशाहीची झाक होती. मंत्रिमंडळात देखील त्यांचा धाक मोठा होता. वसंतदादांनी आपल्या प्रमुख अनुयायांपैकी काहींना अंतुलेविरुद्ध आवाज करायला सांगितले, पण धाकामुळे कोणीही धजावत नव्हता.

त्यापैकी एक दादांना म्हणाला,

‘‘शालिनीताई मंत्रिमंडळात असताना आम्हाला तुम्ही हे काम सांगणे न पटणारे आहे.’’

मग शालिनीताईंनीच ही गोष्ट मनावर घेतली. त्यांनी कोल्हापूरला त्यावेळचे ‘लोकसत्ता’चे तेथील प्रतिनिधी बी. आर. पाटील यांना खास मुलाखत दिली. त्याची बातमी ‘सुलतान अंतुले, शेतकऱ्यांचे पैसे परत करा’ या मथळ्याखाली ठळकपणे प्रसिद्ध झाली.

तेव्हा कायदेमंत्री असणाऱ्या बाबासाहेब भोसले यांनी शालिनीताईंना या वक्तव्याचा ‘इन्कार करा’ असे सांगितले. पण त्या ठाम राहिल्या.

रागावलेल्या अंतुलेंनी शालिनीताईंचा राजीनामा मागितला नाही तर त्यांना थेट मंत्रिमंडळातून काढून टाकले. त्यासाठी त्यांनी श्रेष्ठींची परवानगीसुद्धा घेतली नव्हती. ज्या आत्मविश्वासाने शालिनीताई पाटलांना अंतुलेंनी बाहेरचा रस्ता दाखवला तो त्यांचा अतिआत्मविश्वास ठरला.

वसंतदादांनी पायाने गाठ मारली तर कोणाला ती हाताने सोडविता येणार नाही असे त्यांच्याबद्दल सांगितले जात असे.

मुख्यमंत्र्यानी केलेली शालिनीताई पाटलांवर केलेली कारवाई अनेक नेत्यांना पसंत पडली नव्हती. अंतुले हटाव मोहीम तीव्र झाली. अशातच त्यांचे इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान या ट्रस्टखाली सुरु असलेले गैरव्यवहार बाहेर काढण्यात आले. संपूर्ण देशात हा सिमेंट खरेदीचा घोटाळा प्रचंड गाजला. वसंतदादा आणि शालिनीताई पाटलांनी केलेल्या मोहिमेला यश आले. इंदिरा गांधींनी बॅरिस्टर अंतुलेंची मुख्यमंत्रीपदावरून गच्छंती केली.

पण त्यानंतर देखील वसंतदादा पाटलांना मुख्यमंत्री केलं गेलं नाही. तर अंतुलेंचे समर्थक असलेल्या बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली.

त्यावेळी शालिनीताई पाटलांनी पंढरपुरात येऊन विठ्ठल रखुमाईला नवस केला होता,

‘आमच्या भोळ्या दादांना पक्षातील लोकांनीच दगाफटका केला, पण दादा पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत, मी तुला पाच तोळ्यांचे मंगळसूत्र वाहीन!’

चमत्कार म्हणा, श्रद्धा म्हणा, दादा खरंच परत मुख्यमंत्री झाले आणि शालिनीताईंनी तो नवस फेडला. पण, त्यानंतर नवस करूनही त्या स्वत: मात्र कधी मुख्यमंत्री झाल्या नाहीत. पुढे वसंतदादा पाटलांशी त्यांचे मतभेद झाले. दादांच्या समर्थकांनी त्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला.

वसंतदादांच्या मृत्यूनंतरही शालिनीताई महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय राहिल्या. पण क्षमता असूनही मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांना पुन्हा गवसणी घालता आलं नाही. पुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला. मराठा समाजाला आरक्षणाची पहिली मागणी करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.

शाहू फुले आंबेडकरांचा वारसा असणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचल्या नाहीत हे दुर्दैव. अशी प्रतिभा व संधी असलेल्या ज्या नेत्या होऊन गेल्या त्यात शालिनी ताई पाटलांचं नाव मात्र कायम घेतलं जाईल.

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.