पाणी अडवा, पाणी जिरवा ही शंकररावांनी दिलेली घोषणा पुढे बोधवाक्य म्हणून वापरात आली..

कृषिप्रधान अशी ओळख असलेला आपला भारत देश जगभरात ओळखला जातो. शेतीसाठी लागणारं मुबलक पाणी आणि त्या भोवती फिरणारं राजकारण, याच पाण्यावरून विधानसभा, लोकसभा अशा ठिकाणी तापणारी भांडणं हे आपण नेहमीच ऐकत पाहत असतो. पण महाराष्ट्राच्या एका व्यक्तीने हे पाण्याचं राजकारण महाराष्ट्रात अशा पद्धतीने अंमलात आणलं कि जलक्रांतीचे जनक म्हणून ते ओळखले जाऊ लागले.

शंकरराव भाऊराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री. १४ जुलै १९२० रोजी शेतकरी कुटुंबात पैठण येथे त्यांचा जन्म झाला. कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना शंकररावजींनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वाची कमान सदैव चढती- वाढती राहिली.

१९४८-४९ मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. १९५२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (१९५६), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बॅंकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली.

महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जो ठसा महाराष्ट्राच्या पाटबंधारे क्षेत्रावर उमटविला, तो काळालाही मिटविता येण्यासारखा नाही. शंकररावजींनी विविध लघु, मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून कोरडवाहू शेतीत रात्रंदिवस राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविली.

शंकरराव चव्हाण हे मराठवाड्याचे नेते होते. दुष्काळाची झळा त्यांनी आयुष्यभर सोसली होती. यातूनच त्यांनी शेतकऱ्यांचे नशीब बदल घडवण्यासाठी कंबर कसली. राज्याचे जलसंधारण मंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी भरपूर काम केलं.

विष्णुपुरी प्रकल्प योजना आणि जायकवाडी प्रकल्प योजना या दोन्ही योजना यशस्वी करण्यामागे शंकरराव चव्हाणांचा मोठा वाटा होता. हे प्रकल्प त्यांच्या अगदी जवळचे होते. अनेक अडचणींवर मात करून शंकररावांनी कोयना, वारणा, कन्हेर, दूधगंगा, काळमावाडी, गिरणा, घोड, सुखी इ. पाटबंधारे प्रकल्प उभारले.

या अनेक पाटबंधारे प्रकल्पांमुळे त्यांना महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ असे म्हटले जाई.

महाराष्ट्रात कृष्णा, गोदावरी, नर्मदा,भीमा या नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात त्याचे पाणी समुद्राला जाऊन मिळते मात्र इतर काळात यापैकी बहुतांश नद्या कोरड्याच असतात. हे चित्र बदललं तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा विकास मार्गी लागेल हे इथल्या राज्यकर्त्यांनी खूप आधीच ओळखलं होतं.

या नद्यांचे पाणी अडवून ते धरणात साठवायचे व जलसिंचनातून अख्ख राज्य सुजलाम सुफलाम करायचे ध्येय घेऊन एखाद्या जलसंशोधकापेक्षाही जास्त अभ्यास करणारा नेता म्हणजे शंकरराव चव्हाण.

पैठणचा जायकवाडी प्रकल्प होऊ नये, यासाठी विरोधकांनी अगदी रान पेटविले होते. त्यांचा विरोध पत्करून शंकररावजींनी ‘नाथसागर’ साकार केला. जीवावर बेतलेल्या प्रसंगातूनही शंकररावांनी जायकवाडीचं बांधकाम पूर्ण करून दाखवलं.

शंकरराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द गाजली ती जलक्रांतीमुळे. अनेक शेतकऱ्यांनी शंकरराव चव्हाण यांच्याबद्दल गौरोवोद्गार काढले होते. कोणताही राजकीय प्रश्न ते समझोत्याने सोडवायचे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे १९७५ मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने हाताळला, त्यावरून ते किती मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणी होते हे सिद्ध होते.

लोकप्रियतेच्या भानगडीत न पडता त्यांनी कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं होतं. जलसंधारण आणि इतर प्रकल्पासाठी त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा हि घोषणा दिली होती. हि घोषणा पुढे प्रत्येक जलसंधारण काम असो किंवा पाण्याच्या रिलेटेड कुठलीही मोहीम असो त्यात बोधवाक्य म्हणून हि घोषणा वापरली जाते.

शंकरराव चव्हाण केंद्रीय मंत्री असताना भाजपाचे नेते सिकंदर बख्त राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. कविवृत्तीच्या सिकंदर बख्त यांनी एकदा म्हटले,

”सरत चाललेल्या पिढीतील शंकरराव चव्हाण हा आशेचा किरण आहे. राज्यसभेत आमची नजरभेट होत नाही, तर आमची हृदयं एकमेकांना भेटतात.”

केंद्रात असताना सुद्धा त्यांनी राजकीय मैत्री आणि जलसंधारण कार्य दोन्ही गोष्टी वाढवल्या. सामान्य माणूस होऊन आणि पाय जमिनीवर ठेवून मोठमोठी काम करणे हा शंकररावांचा हातखंडा होता.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.