जीवावर बेतणारा हल्ला झाला तरीही शंकररावांनी जायकवाडी बांधून दाखवलं..

शंकरराव चव्हाण. महाराष्ट्रातील जल क्रांतीचे जनक. विकासाचे व्हिजन आणि शिस्तप्रिय वर्तन यांचा वस्तुपाठच. राजकारणातील व्यासपीठावर दूरदृष्टी बाळगणारा नेता म्हणून त्यांचा उल्लेख करावाच लागतो.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री म्हणून राज्याच्या जडणघडणीत त्यांचं योगदान अमूल्य आहे.

विशेषतः राज्याला सिंचनाच्या बाबतीत सक्षम आणि मराठवाडा पाण्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम कारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पिढ्यानपिढ्यासाठी लक्षात राहण्यासारखे आहेत.

मराठवाडा हा वर्षानुवर्ष दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे इथली शेती संपुर्णतः निसर्गावर अवलंबून. त्यात नफा कमी न तोटाच जास्त अशी अवस्था. पण शेतकऱ्यांच्या या दुरवस्थेला पावसाचा लहरीपणा नव्हे तर पाण्याच्या नियोजनाचा अभाव हे आहे, हे शंकररांवानी ताडलं. आणि सुरुवात झाली मराठवाडय़ातील जलक्रांतीला.

शंकररांनी प्रथम धरणं बांधण्याची योजना तयार केली व अंमलात आणायला सुरुवात केली. यातूनच गोदावरीचं पाणी आडवुन गोदाकाठच्या शेतकऱ्यांना हिरवाई दाखवण्याच काम त्यांनी केलं.

पैठणचा जायकवाडी प्रकल्प हे मातीकामाचे आशिया खंडातील पहिले धरण म्हणुन पुढे आले. हा प्रकल्प तर शंकररावांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि नेमका त्यालाच अनेकांचा विरोधही होता. त्यावरून अनेकदा झालेल्या आरोपांना शंकररावांनी त्या-त्या वेळी प्रत्युत्तर दिले. वेगवेगळे आक्षेपही वेळोवेळी सप्रमाण खोडून काढले.

अखेर अनेक विरोधानंतर १८ ऑक्टोबर १९६५ रोजी जायकवाडी प्रकल्पाचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते काम सुरु करण्यात आले. १९७६ मध्ये प्रकल्प पुर्ण होवून उद्घाटनही झाले.

मात्र प्रकल्प चालू असताच घडलेला एक जीवघेणा प्रसंग १९९० नंतर स. मा. गर्गे, सुधीर भोंगळे यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये शंकरररावांनी सांगितला आहे.

जायकवाडीला केंद्राकडून त्यांनी आणलेली मंजुरी त्यावेळच्या प्रस्थापितांना रुचली नव्हती. यातुन त्या काळातील विरोधकांनी शंकररावांना संपविण्याचाच अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यांनी थेट कोणाचे नाव घेतले नाही; पण बडय़ा मंडळींना धरण मंजुरीचा आनंद झाला नाही, असे मुलाखतीत म्हटले होते.

‘मात्र, हाती घेतलेला प्रकल्प पूर्ण करत असताना हौतात्म्य पत्करावे लागले तरी बेहत्तर, पण जायकवाडीची योजना सोडणार नाही’, असा निर्धारच त्यांनी केला होता. प्रकल्पाच्या विरोधकांकडून शंकररावांचे बरे-वाईट होणार, अशा गुप्त बातम्या तेव्हा दबक्या आवाजात चर्चिल्या जात होत्या.

अशातच एक दिवस त्या बातम्या खऱ्या ठरणारा प्रसंग घडला.

शेवगाव येथे मोटारीतून एका कार्यक्रमास जात असताना एका डोंगराच्या पायथ्यापासून जाणाऱ्या रस्त्यावर डोंगरावरून एकापाठोपाठ एक अजस्त्र दगड गडगडत खाली आले.

ते दगड शंकररावांच्या गाडीवर पडावेत, असाच तो कट होता. पण त्यांची गाडी काही फूट पुढे गेली, मग दगड रस्त्यावर आदळले.

या जीवघेण्या प्रसंगानंतरही शंकरराव डगमगले नाहीत वा विचलित झाले नाहीत. नियोजित कार्यक्रमाला ते वेळेवर उपस्थित झाले. ‘जाको राखे साईयाँ, मार सखे ना कोय!’ असेच काहीसे या प्रसंगाचे वर्णन केले गेले.

जीवावर बेतून ही शंकररावांनी जायकवाडीच बांधकाम पुर्ण करुन दाखवले. २,९०९ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या या जलसिंचन प्रकल्पामुळे संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, नगर या जिल्हयांतील २ लाख ७८ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली.

आज ही औरंगाबाद परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्याबरोबरच औरंगाबाद शहराला पिण्याचे पाणी आणि औद्योगिक क्षेत्रासाठीही पाणी याच नाथसागरातून पुरविले जाते. आज या शहराचा जो औद्योगिक चेहरामोहरा बदलून गेला आहे, त्या विकासाचे आद्य शिल्पकार खर्या अर्थाने शंकररावजीच ठरतात.

तदनंतर अनेक धरणांची उभारणी मराठवाड्यात झाली.

विष्णुपुरी हा आशिया खंडातील सर्वात उपसा जलसिंचन प्रकल्प. याशिवाय उजनी, इसापूर, पैनगंगा, अप्पर मांजरा, येलदरी, मानार, सिद्धेश्वर, पूर्णा, निम्न तेरणा, नांदुर मधमेश्वर, लेंडी अशी प्रकल्पांची मालिकाच निर्माण करण्यात आली.

पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन करण्याकरीता सिंचन आयोग स्थापण्यात आला. बागायती पिकांना पाटाचे पाणी फक्त आठ महिने देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील ओलिताखालील जमिनीचे क्षेत्र वाढले.

(राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्र मालिकेत शंकररावांवर ओढवलेल्या ‘या’ प्रसंगाचा उल्लेख लेखक डॉ. सुरेश सावंत यांनी केला आहे.)

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.