मायावतींच्याही आधी देशभरात दलित राजकारणाचं नेतृत्व शांताबाईंनी गाजवलं होतं

शांताबाई धनाजी दाणी हे आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातलं नाव आज अनेकांच्या विस्मरणात गेलेलं आहे. आज आंबेडकरांचा वारसा सर्वप्रथम उचलून देशाच्या राजकारणात मुसंडी मारणाऱ्या नेत्या म्हणून आपण मायावतींना ओळखतो.

पण त्याच्या कित्येक दशके आधी शांताबाई धनाजी दाणी यांनी आसेतुहिमालय भारत हादरवून सोडला होता.

एकेकाळी नेहरूंपासून-गांधीजींपर्यंत या नावाची चर्चा होती. अनेक काँग्रेस नेत्यांनी या नावाचा धसका घेतला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताखाली जडणघडण होऊन दलितांचे स्वतंत्र राजकारण उभारणाऱ्या नेत्यांमध्ये असणाऱ्या एकमेव महिला नेत्या त्या होत्या.

देशभरात झंझावात निर्माण करणारी ही दलित स्त्री महाराष्ट्रातील एका सामान्य घरातली पोर होती. पण आपल्या नेतृत्वाने देशातील चौथ्या क्रमांकाच्या पक्षाची शिलेदार बनली होती.

शांताबाई यांचा जन्म नाशिकच्या मध्यवर्ती भागातील खडकाळी नावाच्या एका वस्तीत झाला. आज हा परिसर ‘रमाबाई आंबेडकर नगर’ असला तरी गावाच्या बाहेर खडकावर राहणारी लोकं हीच येथल्या दलितांची ओळख होती. १९१९ साली पोरगा हवा असताना दाणी कुटुंबाच्या झोपडीत मुलगी जन्मली. सगळ्यांची घोर निराशा झाली. बाप धनाजी वाघाजी फुंदाबाईंवर चिडले.

“ह्या पोरीने माझ्या सगळ्या शांती केली” असं म्हणू लागले. बाराव्या दिवशी तिचं हेच नाव ठेवण्यात आलं – शांता!

वडील इंग्रजी शाळेत चौथी शिकलेले होते. त्यामुळं पोरींच्या शिक्षणात त्यांनी आडकाठी केली नाही. आई निरक्षर असूनही तिनं याला प्रोत्साहन दिलं.

“गरीबाच्या पोरीला शिक्शान एवढी एकच आशा असती…”

असं त्यांची आई म्हणायची. जातीमुळं दर जागी त्यांना अपमान आणि विषमतेचा सामना करायला लागायचा. पण पोरीला शिवून मोठी मॅडम करायची हे सगळ्या कुटुंबाचं स्वप्न होतं.

चौथी ते सातवीपर्यंत त्यांना दाणी आडनावाचे एक ब्राह्मण शिक्षक भेटले. त्यांनी शांताबाईंना पुण्याच्या वूमन्स गव्हर्मेंट कॉलेजात प्रवेश मिळवून दिला. इथेही त्यांना जातीयतेचे चटके बसले.

जुनी सातवी केल्यानंतर त्या काळी दोन वर्षांचा कोर्स करून मास्तरकी करता येत असे. हा कोर्स पूर्ण करून त्यांना नाशिक जिल्ह्यात विंचूर गावी शिक्षिकेची नोकरी मिळाली. निफाड तालुक्यात असणारी हि नोकर त्यांना सर्वच दृष्टीने सोयीची होती. त्यांच्या घरात एवढं शिकून मोठ्या हुद्द्यावर लागणारी शांताबाई ही पहिलीच पोर.

पण त्यांच्या मनात अजून शिकण्याची ओढ होती. शिक्षणच आपल्याला सगळ्या जाचातून बाहेर काढेल यावर त्यांचा विश्वास होता, अजून शिकता यावं म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. डॉ. श्रीमती लोंढे यांनी त्यांना कॅनडा हॉस्पिटलमधये आपल्यासोबत ठेवून घेतलं. लोंढे यांची जिथं बदली होई तिथं त्या जात. सौराष्ट्रातील वडवणला गेल्यावर तर त्यांनी पुन्हा हायस्कुलमध्ये ऍडमिशन घेतलं. एक शिक्षिका असतानाही पुन्हा वर्गात बसून शिकण्याची इच्छाशक्ती त्यांनी दाखवली.

इथंच त्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषा शिकल्या. वासदा रियासतीच्या राजानेही त्यांना याकामी मदत केली.

याकाळातच त्यांची आई वारली. वडील दारूच्या आहारी गेले. पण तरीही आपल्या आईच्या इच्छेखातर, तिला खरी श्रद्धांजली म्हणून शांताबाईंनी अभ्यास सुरु ठेवला. त्या ग्रॅज्युएट झाल्या.

तेव्हाच त्यांचा परिचय दादासाहेब गायकवाड यांच्याशी झाला. शांताबाईंची एक दूरची बहीण त्यांना दिलेली होती. शांताबाईंनी त्यांची भेट घेतली तेव्हा आपले जीवन आपण कशासाठी सार्थकी लावले हे त्यांना समजून चुकले. आपल्याप्रमाणे अनेक वंचित घटक समाजात आहेत, त्यांच्यासाठी आपण आपल्या विद्येचा उपयोग केला पाहिजे. दलितांच्या  आपण आयुष्य वेचलं पाहिजे असं त्यांनी ठरवलं.

आंबेडकरी चळवळ आणि राजकारणाशी त्यांना परिचय झाला.

शांताबाईंनी दासाहेबांच्या मागदर्शनाखाली काम सुरु केलं. महार समाजातील गरीब घटकांमध्ये जागृती करणे, त्यांना समाजभान आणून देऊन मोठ्या लढ्यासाठी चेतवणे अशी कामे करायला त्यांनी प्रारंभ केला.

१९४२ साली त्यांच्या कॉलेजमध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सगळं देश जेव्हा गांधीजींचा फॅन होता तेव्हा दलितांमध्ये आंबेडकरांच्या नावाची चर्चा होती. त्यावेळी शांताबाईंनी आंबेडकरांना पहिल्यांदा ऐकले. आंबेडकरांच्या भाषणाचा उपस्थित सर्वांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.

हे भाषण त्यांच्या आयुष्याची ज्योत पेटवणारी मशाल बनले. त्यांच्या सर्व शंका गळून पडल्या. इथून पुढे दलितांच्या राजकीय हक्कांसाठी आपण लढायचे हे त्यांनी ठरवले.

शांताबाईंनी दादासाहेबांच्या घरी आंबेडकरांची छोटीशी भेट घेतली. बाबासाहेबांशी बोलून शांताबाई भारावून गेल्या.

सामान्य माणसांशी जवळीक साधण्याची, त्यांच्याशी एकरूप होऊन माणसाच्या मुक्तीचे तत्त्वज्ञान सांगण्याची बाबासाहेबांची शैली त्यांना भावली. त्यांच्या मनावर आंबेडकरी विचारांचा पगडा बसला आणि त्यांनी आपले सगळे आयुष्य त्यासाठीच वेचले.

आपले स्वतंत्र राजकारण सुरु करावे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. दादासाहेबांनी स्वतःला या कामात पूणर्पणे झोकून दिले होते. शांताबाईंनी या पक्षाची धुरा सांभाळली. काँग्रेस हि समाजातील वरच्या गटांसाठी, मूठभर लोकांसाठी काम करते असा दलितांचा सर्वमान्य समज होता. मुस्लिम लीग हि फक्त इस्लामी राष्ट्रवादाकडे वळलेला पक्ष बनला. अशा वेळी दलितांना कोणतेही स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध नव्हते.

शेकाफे पक्षमार्फत पहिल्यांदा दलितांना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी येण्याची संधी मिळाली.

शांताबाई दाणी यांनी आपल्या अफाट कार्यशक्तीच्या जोरावर तत्कालीन राजकारण गाजवले. दादासाहेब गायकवाड व इतर पुरूष नेत्यांच्या बरोबरीने काम करणे सोपे नव्हते. काँग्रेस किंवा लीगसारखे मोठमोठे दान देणारे लोक शेकाफेकडे नव्हते. कार्यकर्ते स्वतः स्वतःचे पोट भरत.

१९४५ मध्ये त्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेकाफेच्या शाखेचे अध्यक्ष म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. पक्षाच्या कानपुर मध्ये झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंस मध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या परिषदेत शेकाफेच्या धोरणांवर अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली होती. त्यामुळे ही जोखमीची जबादारी होती. या प्रेस कॉन्फ्रेंसचे अध्यक्षपद त्यांनी स्वतःकडे घेतले.

देशभरातील पत्रकारांना आपल्या पक्षाचे नेमके धोरण समजावून सांगितले. महिलेने देशव्यापी पक्षाची धुरा सांभाळण्याची हि भारतातील पहिलीच घटना होती. शांताबाई दाणी यांचे नाव देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेला आले.

१९४६ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने महिला संमेलन आयोजित केले  होते.या महिला संमेलनाचे अध्यक्षपद शांताबाई दाणी यांनी भूषवले. देशभरातून तळागाळातील दलित महिला यासाठी आल्या होत्या. त्यांच्या प्रश्नांची सविस्तर मांडणी करून त्यांना न्याय कसा देता येईल याची योजना त्यांनी बनवली. या काळात त्यांनी देशभर प्रवासही केला. देशातील स्त्रियांचे आणि दलितांचे प्रश्न समजून घेण्याचा आणि सोडवण्याचा प्रयत्न त्या वैयक्तिक आणि राजकीय पातळीवरही करत असत.

याच वर्षी त्यांनी मुंबई विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतला. त्या अपक्ष म्हणून हि निवडणूक लढल्या होत्या.

१९४६ साली बाबासाहेबांनी असेम्ब्लीमध्ये दलितांना राखीव जागा मिळाव्यात म्हणून सत्याग्रह पुकारला.

या वेळी शांताबाईंच्या परीक्षा सुरु होत्या. पण या कामासाठी त्यांनी आपल्या परीक्षा बुडवल्या. राजकारणापासून दूर राहून परीक्षा देणे त्यांना मानवणारे नव्हते.

त्यांनी सर्व शक्तीनिशी या चळवळीत उडी घेतली. बीएची परीक्षा देण्यात त्यांना यामुळे अपयश आले. त्या काळात देशातील क्रमांक चारचा पक्ष असलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेतृत्व शांताबाईंनी लीलया पेलले. १९४६ साली पुणे कराराच्या निषेधार्त दलित सत्याग्रहींनी अनेक मोर्चे काढले होते. त्यातील स्त्री सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत शांताबाई सहभागी होत्या.

त्यांना या चळवळीत अटक झाली आणि येरवड्याच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. महिला कैद्यांसोबत राहताना त्यांनी जेलमध्ये त्यांना आंबेडकरी विचारांशी जोडण्यास आणि त्यांना शिक्षण देण्यास प्रारंभ केला.

शेकाफे पक्षाचे काम वाढवत नेत्यात त्यांनी हातभार लावला. भूमिहीन मजुरांचे प्रश्न देशाच्या समोर आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

१९४७ साली सत्नामी अस्पृशांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. प्रभावशाली एससी नेता पी.एन. राजभोज या चळवळीचे नेतृत्व करत होते. १९४२ पासून ते शेकाफे पक्षाचे महासचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्यासोबत बिनीच्या महिला नेता म्हणून शांताबाई दाणी यांना सोबत घेतले. हा फार मोठा सन्मान होता. त्यांनी यावेळी देशभर दौरे केले. रायपूरमध्ये जाउन केलेले आंदोलन यावेळी विशेष गाजले. जबलपूर येथे त्यांना निजामाचे एजेंट समजून तीन आठवड्यांसाठी तुरुंगात टाकण्यात आले होते.

आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आंबेडकरी राजकारणाचा कित्ता गिरवला. शेकाप ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा सगळ्या प्रवासात त्या ठाम राहिल्या.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची १९५७ साली स्थापना करण्यात त्यांचाही मोठा वाट होता.

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही त्यांनी दलितांसाठीचा लढा सुरु ठेवला. त्यांच्या या कामाला शासकीय स्तरावरही मोठी ओळख मिळाली. १९६२ मध्ये नालेगांवमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. यावेळी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या काही मोजक्या महिला नेत्यांपैकी त्या एक होत्या.

वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखले. त्यांच्या कार्यकाळत १९६८ साली त्यांची नियुक्ती विधानपरिषदेवर करण्यात आली. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांनी विधानपरिषदेत दलित-कष्टकरी जनतेचे प्रश्न मांडले. १९७४ पर्यतच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक लहानमोठ्या निर्णयांनी व चर्चेतून गरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडली. १९८० साली पुन्हा नाशिकमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली.

१९८९ साली वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.

मनमाड आणि नाशिक भागात दलित मुलामुलींसाठी त्यांनी शाळा सुरु केल्या. त्यांनी यासाठी आपले दागिनेही विकले.  

तक्षशिला विद्यालय आणि गौतम छात्रावास अशा संस्था त्यांनी सुरु केल्या. १९६५ मध्ये मुलींसाठी रमाबाई आंबेडकर प्रशाला उभारली. आजही या संस्था सुरु आहेत.

आपल्या कामाला महत्त्व देऊन शांताबाई आयुष्यभर अविवाहित राहिल्या. आपले समग्र जीवन त्यांनी दलित मुक्ति आंदोलनासाठी वेचले. १९६५ मध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

पण नंतरच्या काळात रिपब्लिकन पक्षाची शकले उडाली. अनेक नव्या दमाचे दलित नेते परस्पर वादात गुंतले.

त्यांना एकीचा संदेश देण्यासाठी कुण्या मोठ्या अनुभवी माणसाची गरज होती. शांताबाई यांनी दलित चळवळीत हि एकी यावी यासाठी प्रयत्न केले.

राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेऊनही  वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी एक सभा घेतली. यात मास मुव्हमेंट, दलित पॅन्थर, दलित मुक्ती सेना आणि रिपब्लिकन पक्षाची सर्व धडे सहभागी झाली होती. त्यांनी सर्वाना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले.

पण त्याचा उपयोग झाला नाही. या कामात त्यांना यश मिळाले असते तर भारताचा राजकीय इतिहास वेगळा झाला असता…

त्यांनी लिहिलेल्या “रात्रंदिन आम्हा” आत्मचरित्रातील ‘युद्धाचे प्रसंग’ संपून दलित मुक्तीची नवी पहाट उगवली असती. २००१ साली त्यांचे निधन झाले. त्यांना अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.