कर्नाटक जिंकणाऱ्या शिवरायांचा गौरवशाली इतिहास तिथलं सरकार का वगळत आहे?

कोरोनाचं संकट आल्यापासून शाळा बंद आहेत. नियमित वर्ग कधी सुरु होतील याचा अजूनही अंदाज लावता येत नाही. यामुळे सर्वत्र शैक्षणिक अभ्यासक्रमात कपात करणे सुरु झाले आहे. यात कर्नाटक सरकारने इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे गाळण्याचा निर्णय घेतला.

फक्त शिवाजी महाराजांचे धडेच नाहीत तर टिपू सुलतान, विजयनगर साम्राज्य, बहामणी साम्राज्य, राज्यघटनेतील काही भाग आणि इस्लाम, ख्रिश्चन धर्माशी निगडित काही भाग अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय कर्नाटक बोर्डाने घेतला आहे.

ऑनलाईन शिकवणे सोपे जावे म्हणून ३० % अभ्यासक्रम कमी केला जातोय. शिवाजी महाराजांचा इतिहास ७ वी मध्ये झाला असल्यामुळे तो वगळला.

असं बरच स्पष्टीकरण दिल जात आहे. मात्र सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचा आरोप आहे की या मागे कर्नाटक सरकारचा हेतू वाईट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकवर विजय मिळवला होता हा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न सुरु असे म्हटले जात आहे.

६ जून १६७४ रोजी शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व स्वतंत्र सार्वभौम राज्याचे  ते छत्रपती झाले.

राज्याभिषेकानंतर आपल्या स्वराज्याचा विस्तार करायची वेळ आली तेव्हा शिवरायांच्या डोक्यात कर्नाटक उभे राहिले. कर्नाटकात बंगळूर येथे शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांची जहागीर होती. शिवरायांच्या बालपणीचा काही काळ तिथे व्यतीत झाला होता. आता ही जहागीर त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे सांभाळत होते.

उत्तरेतल्या मुघलांनी मोठे आक्रमण केले तर संरक्षणासाठी स्वराज्याची पाळेमुळे दक्षिणेत खोलवर पसरलेली असावी हे छ.शिवाजी महाराजांच्या डोक्यात पक्क बसलेलं होतं. तेवढ्या साठी त्यांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली.

यालाच कर्नाटक मोहीम असे ओळखले जाते.

कर्नाटकात तेव्हा शक्तिशाली सत्ता अदिलशाहची होती. त्याच्या पठाण सरदारांचा समस्त रयतेला त्रास होत होता. महाराजांनी त्याचा बंदोबस्त करायचे ठरवले. शिवाय व्यंकोजी राजेना देखील समजावून स्वराज्यात सामील करावं हा देखील कर्नाटक मोहिमेचा दुसरा हेतू होता.

युवराज संभाजी महाराज व अष्टप्रधान मंडळाच्या हाती महाराष्ट्राचा कारभार देऊन शिवराय दक्षिण दिग्विजयाला निघाले. सोबत सेनापती हंबीरराव मोहिते, बिनीचे सरदार, खास अश्वदळ, प्रभावी पायदळ होत.  गोवळकोंड्याचा कुतुबशहा महाराजांच्या पाठीशी उभा राहिला. त्याची भेट घेऊन महाराज आंध्रप्रदेश मधून दक्षिणेत तामिळनाडूमध्ये मद्रासपर्यंत पोहचले. जिंजी, वेल्लोर सारखे महत्वाचे किल्ले सर केले.

दक्षिणेत असलेल्या डच, इंग्रज यांच्यावर जरब बसवली. 

महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे जिंकलेल्या प्रदेशाची त्यांनी व्यवस्था लावली. किल्ल्यांची डागडुजी केली. प्रशासन कडक केले. आपले सरदार, किल्लेदार या भागात नेमले. तिथल्या रयतेला त्रास न देण्याचे आदेश दिले होते. यामुळेच दक्षिणेत मराठ्यांवर विश्वास बसला. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे इष्टापत्ती मानले गेले.

बऱ्याच काळानंतर दक्षिणेत स्थैर्य व सौख्य आले होते याला कारण ठरली मराठ्यांची दिग्विजय मोहीम.

जिंजी, वेल्लोर नंतर महाराज कर्नाटककडे वळले. सर्वप्रथम व्यंकोजी राजे यांना समजावून सांगणारी पत्रे धाडली. व्यंकोजीराजे तेव्हा तंजावर येथे होते. ते सामोपचाराने ऐकत नाहीत हे पाहिल्यावर त्यांच्यावर देखील हल्ला करून त्यांचा मोठा पराभव केला. त्यांची अनेक ठाणी जिंकून घेतली.

अखेर व्यंकोजीराजे यांनी रघुनाथ पंत हणमंते यांच्यामार्फत छ. शिवाजी महाराजांशी तह केला.

ऐन पावसाळ्यात शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम सुरु होती. तिरूमलवाडीवरून वृद्धाचलममार्गे मराठे पोर्टानोव्हा येथे पोहचले. तिथे विजय मिळवला, पुढे दक्षिण अर्काट जिंकून घेतले. पुढे अरणी, होसकोट, शिरे, बाळापुर इत्यादी पश्चिम दक्षिणेला जोडणारी स्थळे घेऊन नोव्हेंबर १६७७ मध्ये कर्नाटक मोहिमेची सांगता केली.

त्याकाळच्या इंग्लिश पत्रामध्ये म्हटल आहे की,

“स्पेनमध्ये सीझर ज्याप्रमाणे आला, त्याने पाहिले व जिंकला त्याप्रमाणात छ. शिवाजी महाराज कर्नाटकात आले, पाहिलं आणि जिंकले.”

कर्नाटकची गौरवशाली मोहीम पार पडल्यावर महाराज जानेवारी महिन्यात म्हैसूर मार्गे महाराष्ट्राकडे परत निघाले.

जवळपास १०० किल्ले ताब्यात आले होते. जाताना छोटी मोठी ठाणी ताब्यात घेतली जात होती. धारवाड जवळचे बेलवडी यादवाड येथे देसाई यांनी कोणत्याही लढाईविना मांडलिकत्व स्वीकारले.

महाराज पुढे पन्हाळ्याच्या दिशेने निघून गेले. सखुजी गायकवाड या आपल्या मेहुण्याकडे यादवाडची जबाबदारी दिली होती.

पण काही कारणाने यादवाडमध्ये मराठ्यांचे तिथल्या सैन्याशी युद्ध झाले.येसाजी प्रभुदेसाई यांच्या निधनानंतर राणी मल्लाबाई यांनी आपल्या पराक्रमाने २७ दिवस तिथला किल्ला लढवला. पण त्यांचा पराभव झाला.

मल्लाबाई देसाई यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर उभे करण्यात आले.

त्यांनी आपल गाऱ्हाणे महाराजांना सांगितले. पतीच्या निधनानंतर मोठ्या धीराने मराठी सैन्याशी दोन हात करणाऱ्या राणी मल्लाबाई ला तिचे राज्य मुलांच्या दूध भातासाठी म्हणून महाराजांनी परत दिले. त्याचबरोबर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मल्लाबाईला आईच्या जागी मानून सावित्री म्हणून गौरवले .

शिवरायांच्या न्यायाची आठवण कायम स्वरूपी लक्षात रहावी म्हणून मल्लाबाईने शिवरायांच्या हयातीत पहिले शिल्प बनवले व महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास कर्नाटकाच्या भूमीत कोरला गेला.

आजही तिथे शिवाजी महाराजांच्या स्त्रीदाक्षिण्य आणि न्यायाच्या आदर्शाच्या गौरवगाथा गायल्या जातात.

मात्र स्वातंत्र्यानंतर आजवर कर्नाटकात जेव्हढी सरकारे आली त्यांनी महाराष्ट्राचा द्वेष करणारे राजकारण खेळले. याचा फटका बेळगाव, निपाणी येथील सीमावर्ती भागात पाहायला मिळाला. आता कोरोनाची संधी साधून इतिहास बदलण्याचे प्रयत्न तिथले सरकार करत आहे.

छ. शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या येडीयुरप्पा सरकारला मात्र या निमित्ताने खूप मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Rsfvhdgj says

    Jai bhawani jai chatrapati shivaji maharaj

Leave A Reply

Your email address will not be published.