या विजयानंतर शिवरायांच्या साम्राज्याची सीमा दक्षिणेच्या सागरतटापर्यंत पोहचली.

स्वराज्याचा विस्तार दक्षिणेत करायचा हे स्वप्न महाराजांनी पूर्वी पासून पाहिलेलं होत. महाराजांचे पिताजी शहाजी महाराज यांची बंगळूरला जहागीर होती. शिवरायांनी बालपणीचा काही काळ तिथे घालवला होता. महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी ही जहागीर सांभाळत होता. त्याला समजावून स्वराज्यात सामील करून घेणे हे देखील शिवरायांच उद्दिष्ट होतं.

यापूर्वी समुद्रमार्गे बसनूर पर्यंत स्वारी केली होती शिवाय मराठी सेना कारवार पर्यंत घोडदौड करतच होती. अखेर राज्याभिषेकानंतर महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली.

या मोहिमेला दक्षिण दिग्विजय म्हणून ओळखतात.

उत्तरेतल्या मुघलांचा दक्षिणेत वावर सुरु झाला होता. पठाणी फौजा दक्षिणेतल्या राज्य गिळंकृत करायचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे गोवळकोंड्याच्या कुतुबशहासारख्या सुलतानांनी शिवरायांच्या मोहिमेला पाठिंबाच दिला. त्यांचे जंगी स्वागत केले. आपला सेनापती शिवरायांच्या मदतीसाठी पाठवून दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने श्रीशैल, अनंतपूर, कडप्पा, तिरुपती मार्गे १६७६च्या मे महिन्यात मद्रास प्रांतापर्यंतचा पल्ला गाठला. मराठ्यांची अतिशय वेगवान घोडदौड पाहून या भागातल्या इंग्रज,डच व इतर शत्रूंची त्रेधा उडाली.

या भागात दोन मोठे किल्ले होते. जिंजी आणि वेल्लोर.

सर्वप्रथम जिंजी जिंकण्यासाठी सेनापती हंबीरराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली सैन्याचे एक पथक पाठवले. वास्तविक पाहता जिंजीचा किल्ला हा अभेद्य मानला जातो. पण मराठ्यांचे भय व त्यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकलेल्या नसीर महंमद खान या किल्लेदाराने सरळ शिवाजी महाराजांशी तहाची बोलणी सुरु केली.

५० हजार उत्पन्नाच्या जहागिरीच्या मोबदल्यात जिंजी हा किल्ला खानाने मराठ्यांना खाली करून दिला.

हे दक्षिण दिग्विजयातील सर्वात मोठे यश मानले गेले. आता उरला होता वेल्लोर.

वेल्लोर सुद्धा जिंजीप्रमाणेच अजिंक्य किल्ला होता. हा किल्ला पालार नदीच्या उजव्या काठावर असून स्थानिक परंपरेप्रमाणे त्याचे बांधकाम भद्राचलम्‌चा आश्रित राजा बोम्मी रेड्डी याने इ. स. १२७४ च्या सुमारास केले असे सांगितले जाते.

किल्ल्याची बांधणी काहीशी जलदुर्गासारखी असून त्याच्या सभोवती दुहेरी दगडी चिरेबंदी तट आहे. तटाभोवती खोल व रुंद खंदक आहे. या खंदकात सुसरी सोडलेल्या असायच्या. यामुळे वेल्लोरवर हल्ला करणे अतिशय अवघड मानले जायचे.

सभासदाने म्हटले आहे की

” तो कोट म्हणजे पृथ्वीवर गड असा नाही. कोटात जीत पाणीयाचा खंदक पानियास अंत नाही.” 

जिंजी ताब्यात घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराज वेल्लोर किल्ला जिंकायला स्वतः जातीने दाखल झाले.

सुरवातीला नासीर मोहमद खानाच्या सामोपचाराने किल्ला मिळतो का यांचे प्रयत्न झाले. पण तिथला किल्लेदार अब्दुल्लाखान चिवट होता. पावसाळा सरेल एवढी शिबंदी त्याने जमा करून ठेवलेली होती. त्याने मराठ्यांशी तह करण्यास नकार दिला.

साधारण मे महिन्याच्या अखेरीस वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा घालण्यात आला. दिवस उलटू लागले. वेल्लोर हाती येत नाही तर त्याच्या आसपास दोन डोंगरावर किल्ले बांधायचे आदेश महाराजांनी दिले.

दक्षिणेत पावसाळा लवकर येतो. वेल्लोरच्या मोहिमेमध्ये वेळ वाया जात होता. याच काळात शेरखान लोदीच्या रुपात नवीन संकट चाल करून येत होते.

महाराजांनी वेल्लोरच्या वेढ्याची जबाबदारी रघुनाथ पंत, आनंदराव व नरहरी रुद्र यांच्या कडे सोपवली व स्वतः हंबीरराव मोहितेना सोबत घेऊन शेरखान लोदिवर तिरूवाडी येथे चालून गेले. त्याच्या बाणापट्टमच्या किल्ल्याला वेढा घातला व शेर खानवर विजय मिळवला.

तिथून पुढे शिवाजी महाराज व्यंकोजीचा समाचार घेण्यासाठी तंजावरला गेले.

इकडे अनेक महिने उलटले तरी वेल्लोरचा किल्ला ताब्यात येत नव्हता. आदिलशाही मदत येईल या आशेने अब्दुल्ला खान लढा देतच होता. पावसाळा, त्यातच आलेली महामारी यामुळे तो त्रस्त झाला होता पण किल्ला सोडत नव्हता.

नरहरी रुद्र यांनी  महाराजांनी आदेश दिल्याप्रमाणे शेजारच्या टेकड्यांवरील किल्ले बांधून घेतले. त्यांना साजरा व गोजरा ही मराठी नवे दिली. या किल्ल्यांवर तोफा चढवल्या व तिथून वेल्लोरवर मारा सुरु केला.

तेव्हा मात्र अब्दुल्ला खान याला माघार घ्यावी लागली. तो दिवस होता शके १६०० कालयुक्त संवत्सर श्रावण शुद्ध चतुर्दशी म्हणजेच २२ जुलै १६७८.

जवळपास एका वर्षाच्या लढाईनंतर वेल्लोरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराज तो पर्यंत महाराष्ट्रात स्वराज्यात पोहचलेले होते. त्यांना वेल्लोर सर झाला ही बातमी कळाली. मराठ्यांनी आपली सीमा दक्षिणेत सागरतटापर्यंत पोहचवण्यात यश मिळवल याचं अभिमान वाटून ते खूब खुश झाले.

एकंदरीत या कर्नाटक मोहिमेत २० लाख होनांचा प्रदेश व जवळपास १०० च्यावर किल्ले ताब्यात आले होते. यातील मुकुटमणी होते जिंजी आणि वेल्लोर. शिवरायांनी दूरदृष्टीने आखलेल्या या दक्षिणदिग्विजयाची फळे मराठेशाहीने पुढच्या अनेक पिढ्या अनुभवली.

संदर्भ-‘छत्रपती शिवाजी महाराज’ प्र.न.देशपांडे व दक्षिण दिग्विजय हंबीरराव मोहिते यांचे कार्य

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.