शिवसेना भवनावर दगडफेक होत होती तेव्हा “विदर्भाचा शेर” मदतीला धावून आला होता..

जुने शिवसेना भवन होते तेव्हाची ही गोष्ट.

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. भारतावर लादलेली आणीबाणी नुकतीच संपुष्टात आली होती. अनुशासन पर्व असं कौतुक करत सुरु झालेल्या आणीबाणीचे रूपांतर कधी हुकूमशाहीत झालं हे कोणाला कळलंच   नव्हतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला गेला, माध्यमांवर नियंत्रणे लादली, विरोधकांना पक्षातून बाहेर काढले, कित्येकांना जेलमध्ये टाकलं.

एकूण सत्ता इंदिरा गांधीचे सल्लागार आणि सुपुत्र संजय गांधी यांच्या हातात उरली होती. संजय नसबंदी योजना सरकारवर उलटल्या आणि संपूर्ण देशभरात त्यांना विरोध सुरु झाला. जनसंघ, कम्युनिस्ट पक्ष, जनता पार्टी असे सगळेच पक्ष त्यांच्या विरोधात गेले होते.   

फक्त एकच स्थानिक पक्ष इंदिरा गांधींच्या सोबत उभा होता. तो म्हणजे शिवसेना.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना स्वतः इंदिरा गांधी मुंबईत भेटलेल्या, त्यांनी बाळासाहेबांचा पाठिंबा घेतला होता. पण पुढे जेव्हा आणिबाणीवर टीका सुरु झाली तेव्हा सगळा देश एकीकडे आणि इंदिरा गांधी काँग्रेस व शिवसेना एकीकडे अशी स्थिती निर्माण झाली. इंदिरा गांधींना चूक लक्षात येऊन त्यांनी आणीबाणी मागे घेतली. पुन्हा निवडणुका लावल्या.

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. खुद्द इंदिरा गांधी, संजय गांधी निवडणुकीत पडले. इंदिराजींनी पंतप्रधानपदाची सत्ता सोडली.

जयप्रकाश नारायण यांच्या आणीबाणी विरुद्धच्या आंदोलनाचा विजय झाला होता. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन व्य पक्षाची स्थापना झाली. नाव देण्यात आलं जनता पक्ष. देशात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार आलं होतं.

या नव्या सरकारच नेतृत्व देण्यात आलं अनुभवी नेते असलेल्या मोरारजी देसाई यांच्या कडे.

जनता सरकार स्थापन झाल्यावर मुंबईच्या कामगार संघटनांनी नव्या मंत्रिमंडळाचं अभिनंदन करण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क येथे सभा भरवली. मोरारजी देसाई चरणसिंग यांच्यापासून सगळे नेते हजर झाले. त्यांना पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली. शिवाजी पार्कमध्ये मुंगीला देखील घुसता येणार नाही अशी अभूतपूर्व गर्दी झाली होती.

सभा जोरदार रंगली. मोठमोठी भाषणे झाली. सत्कार झाले. इंदिरा गांधी व त्यांच्या समर्थकांवर प्रक्षोभक टीका करण्यात आली. सभा संपल्यावर जाताना तिथं उपस्थित असलेल्या अनेकांनी शिवाजी पार्क वरची दगड आपल्या खिशात टाकले.

हा मॉब जेव्हा शिवसेना भवनच्या इथे आला तेव्हा त्यांनी अचानक जोरदार दगडफेक करण्यास सुरवात केली.

काही मोजके शिवसैनिक शिवसेना भवनात हजर होते.

शिवसेनेचा हा पडता काळ होता. ना त्यांचे आमदार निवडून येत होते ना महापालिकेवर स्वबळावर सत्ता होती. काही मोजके नगरसेवक असलेला हा छोटासा पक्ष. डाव्या कामगार संघटनांशी त्यांचा जुना वाद होता. पक्षाच बळ कमी असूनही शिवसैनिक विरोधकांना नडायला कमी पडायचा नाही. हा सगळं वाद मनात ठेवूनच त्या दिवशी शिवसेनाभवनावर मोठा हल्ला झाला.

शिवसेना भवनाच्या सगळ्या खिडक्यांची तावदाने फुटलेली होती. काचांचा खच सगळीकडे पडला होता. संबंध रस्ता  मोकळा पडला होता. लोकांचे प्रेम हीच बाळासाहेबांसाठी ऊर्जा होती. आताच्या या विरोधामुळे हीच ऊर्जा कमी झालेय कि काय या विचाराने कधी नव्हे ते शिवसेना प्रमुख देखील हतबल झाले होते. शिवसैनिकांचा गराडा पुढे काय करायचं हा विचार करत घुटमळत होता.

अचानक आसंमतात ललकारी घुमली,

वा रे शेर आया रे शेर 

मजबूत शरीरयष्टी, दणकट मनगट, हातात स्टीलचे भक्कम वजनी कडे, काळीशार दाढी, साधू  बांधतात तशा जटा, पांढरे शुभ्र एकटांगी धोतर, लख्ख शुभ्र बंगाली सदरा आणि त्यावर तसेच शुभ्र उपरणं अशा अवतारातला झंझावात झपझप पावलं टाकत बाळासाहेबांच्या दिशेने आला.

त्याच नाव होत विदर्भाचा सिंह जांबुवंतराव धोटे.

विदर्भाचा सर्वात मोठा नेता. तिथे वसंतराव नाईकांसारख्या ११ वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या लोकप्रिय नेत्याला सळो की पळो करून सोडले.

आयुष्याची उमेदीची अनेक वर्षे त्यांनी असीम त्याग केला, जनआंदोलने उभारली, कारागृहाची हवा खाल्ली, पोलिसांच्या लाठय़ा झेलल्या. याच बळावर त्यांना यवतमाळच्या जनतेने काँग्रेसच्या तगड्या उमेद्वारा विरुद्ध १९६२ साली प्रचंड बहुमताने आमदार म्हणून निवडून आणले. ते हि सुभाष बाबूंच्या फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर.  

जांबुवंतराव धोटे नावाचं हे वादळ विधानसभेत आलं म्हणून शांत झालं नाही. वेगळ्या विदर्भासाठीचा त्यांचा लढा तिथेही सुरूच राहिला.

 

आपली मागणी मान्य केली नाही म्हणून सभापतींना पेपरवेट फेकून मारणाऱ्या जांबुवंतराव धोटेंची जांबुवंत उडी तेव्हापासून फक्त विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात फेमस होती. वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य वेचलं होतं. पुढे जेव्हा इंदिरा गांधींनी वेगळ्या विदर्भाचा विचार करतो असं आश्वासन दिल तेव्हा जांबुवंतरावांनी त्यांना देखील आपला पाठिंबा देऊ केला.

एकूणच आणीबाणीच्या वेळी जे मोजके पक्ष इंदिरा गांधींच्या पाठीशी होते त्यात शिवसेनेबरोबर धोटेंचा फॉरवर्ड ब्लॉक देखील होता. जेव्हा जांबुवंतराव धोटेंना शिवसेना भवनवर झालेल्या हल्ल्याबद्दल कळलं तेव्हा ते बाळासाहेबांच्या मदतीला तातडीने धावून आले. 

शिवसेना अत्यंत हतबल अवस्थेत असताना शिवसेनेच्या मदतीसाठी विदर्भात वारे शेर, आया शेरच्या उदघोषाने आसमंत भेदणाऱ्या फारवर्ड ब्लॉकच्या जांबुवंतराव धोटे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी हाक दिली होती. जांबुवंतराव धोटे आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना घेऊन थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी आणि सेनाभवनात पोहोचले होते.

विदर्भाचा शेर मुंबईच्या सेनेच्या टागरच्या मदतीला धावून गेला, अशा आशयाचे मथळे असलेला मजकूर त्यावेळी वृत्तपत्रातून प्रसिध्द झाला होता.

शिवसेना भवनात जांबुवंतराव धोटे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दीर्घ चर्चा करून मुंबईच्या आझाद मैदानात सेनेची विराट सभा आयोजित करण्याचा कार्यक्रम आखला. ठाकरे आणि धोटे यांच्या मदतीला दलीत पँथरचे नेते नामदेव ढसाळ सुध्दा धावून आले होते.

आझाद मैदानातील त्या विराट सभेला विदर्भाचा ‘शेर’ जांबुवंतराव धोटे, सेनेचा ‘टायगर’ बाळासाहेब ठाकरे आणि दलितांचा ‘पँथर’ नामदेव ढसाळ यांनी पहिल्यांदाच एकत्रपणे संबोधित केल्याचे अभूतपूर्व दृश्य महाराष्ट्राने अनुभवले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना राजकारणात आपण एकटे नाही याचा आत्मविश्वास आला. पँथरच्या माध्यमातून शिवसेनेशी पंगा घेणारे दलित तरुण पहिल्यांदाच बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहिले होते. विदर्भात देखील शिवसेनेचा प्रवेश याच घटनेनंतर झाला.

जांबुवंतराव धोटे यांच्या सारखा रांगडा नेता आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा ठाकरी शैली असलेला दिलदार नेता यांच्या संपूर्णं विदर्भात एकत्र अनके सभा झाल्या. दोघांच्या भाषणांनी सभा दुमदुमून जायच्या. 

पण हि युती फार काळ टिकली नाही. पुढे वेगळा विदर्भ होण्याच्या मुद्द्यावरून बाळासाहेबांचे आणि जांबुवंतरावांचे मतभेद झाले आणि त्यांचे मार्ग वेगळे झाले.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.