विदर्भ सिंहाच्या दहशतीमुळे विधानसभेत पेपरवेट ठेवायचं बंद करण्यात आलं..

मजबूत शरीरयष्टी, दणकट मनगट, हातात स्टीलचे भक्कम वजनी कडे, काळीशार दाढी, साधू  बांधतात तशा जटा, पांढरे शुभ्र एकटांगी धोतर, लख्ख शुभ्र बंगाली सदरा आणि त्यावर तसेच शुभ्र उपरणं अशा अवतारातला झंझावात झपझप निघाला की भल्या भल्याना कापरं भरायची. आसंमतात ललकारी घुमायची,

वा रे शेर आया रे शेर 

हा शेर म्हणजे कधी एकेकाळी लाखोंच्या सभा गाजवणारा, सत्ताधाऱ्यांना सभागृहात सळो की पळो करून सोडणारा अभ्यासू वक्ता. विदर्भाच्या प्रेरणेनं झपाटलेलं निष्ठा, समर्पण अन त्यागाचं एक वेगळचं रसायन.

विदर्भवीर जांबुवंतराव धोटे…

असं म्हणतात की गेल्या शंभर वर्षात त्यांच्या एवढं प्रेम विदर्भात कुठल्याच नेत्याला मिळालं नाही आणि त्यांच्या एवढं पोट तिडकीने कोणी विदर्भासाठी भांडलं देखील नाही. कुठल्या ही मोठ्या पक्षाच्या लेबलचा सहारा न घेता विदर्भात १८ उमेदवार निवडून आणायचा चमत्कार त्यांनी घडवून आणला होता.

यवतमाळच्या नगरपरिषद शाळेतला हा शारीरिक शिक्षक. नेताजी सुभाषचन्द्र बोस यांच्या चरित्राने भारावून गेला अन तारुण्याची रग, काम करायची तुफान उर्मी फक्त याच बळावर त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसचे दिग्गज नेते जवाहरलाल दर्डा यांच्याविरुद्ध यवतमाळच्या नगरपरिषद वॉर्ड क्र.१२ मधून निवडणूक लढवली आणि दर्डाचा पराभव करून राजकारणाच्या आखाडय़ात एक काँग्रेस विरोधक म्हणून उडी घेतली.

ही उडी पुढे जांबुवंत उडी ठरली आणि तिने वसंतराव नाईकांसारख्या ११ वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या लोकप्रिय नेत्याला सळो की पळो करून सोडले.

आयुष्याची उमेदीची अनेक वर्षे त्यांनी असीम त्याग केला, जनआंदोलने उभारली, कारागृहाची हवा खाल्ली, पोलिसांच्या लाठय़ा झेलल्या. याच बळावर त्यांना यवतमाळच्या जनतेने काँग्रेसच्या तगड्या उमेद्वारा विरुद्ध १९६२ साली प्रचंड बहुमताने आमदार म्हणून निवडून आणले. ते हि सुभाष बाबूंच्या फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर.  

जांबुवंतराव धोटे नावाचं हे वादळ विधानसभेत आलं म्हणून शांत झालं नाही. वेगळ्या विदर्भासाठीचा त्यांचा लढा तिथेही सुरूच राहिला.

त्या काळी राज्यात काँग्रेसच मोठ वर्चस्व होतं. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर विधानसभेच्या २६४ पैकी २१६ आमदार हे काँग्रेसचे असायचे. विरोधकांचा आवाज क्षीण होता. त्यातही अपक्ष आणि एकांड्या शिलेदार असलेल्या पक्षांकडे सभापतींचं लक्ष जायचंच नाही. यामुळे बऱ्याचदा जांबुवंतराव धोटे यांची चिडचिड व्हायची  

एकदा असाच काही प्रसंग झाला. दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा सुरु होती. विधानसभेत गोंधळ सुरु चालला होता. सत्ताधारी आमदार आपलं म्हणणं रेटत होते. जांबुवंतराव देखील आपला मुद्दा मांडायचा प्रयत्न करत होते. विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब भारदे त्यांना वारंवार शांत राहण्यास सांगत होते.

जांबुवंतरावांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी रागाच्या भरात आपल्या हातातील कागदांचा गठ्ठा अध्यक्षांच्या दिशेने भिरकावला आणि ‘माईक ऑपरेटर’च्या दिशेने ‘पेपर वेट’ फेकून मारला. तो पेपरवेट कोणाला लागला नाही पण क्रोधावर नियंत्रण न राखल्यामुळे जांबुवंतराव धोटेंची मोठी चूकच झाली होती.

त्यावेळी स्वत: मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी धोटे यांचे विधानसभा सदस्यत्व बरखास्त करून त्यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याचा ठराव मांडला. या ठरावाला सत्तारूढ काँग्रेसने समर्थन दिले, विरोधकांनी ठरावाला विरोध केला परंतु, विरोधी पक्षात असूनही सभागृहाची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी काही दुरुस्त्यांसह ठरावाचे समर्थन त्यावेळी एफ.एम. पिंटो यांनी केले होते.

अर्थात पिंटो यांच्या दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या व धोटेंना सभागृहातून निष्कासित करण्यात आले.

विदर्भवीर जांबुवंतराव धोटे हे संयुक्त महाराष्ट्रानंतर निलंबित झालेले पहिले आमदार ठरले. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हि पहिलीच घटना होती. १३ ऑगस्ट १९६४ रोजी ही कारवाई करण्यात आली. नंतर त्यांचे सदस्यत्वच रद्द करण्यात आले.

त्यानंतर १९६४ साली झालेल्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून पुन्हा उभे राहिले. यवतमाळच्या जनतेने या आपल्या सिंहाला तब्बल साडे हजार मतांनी पुन्हा निवडून आणले.

निवडून आल्यावर जेव्हा पुन्हा शपथ घेण्यासाठी अध्यक्षांनी त्यांचं नाव पुकारले. तेव्हा त्यांनी माईक हातात घेतला आणि थाटात म्हणाले,

ज्या जांबू धोटेचे सदस्यत्व पाशवी बहुमताच्या जोरावर तुम्ही रद्द केले होतेतो जांबू धोटे मीच आहे आणि लोकांनी मला पुन्हा निवडून दिले आहे.”

त्या दिवसापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारांच्‍या टेबलवरील पेपरवेट काढून टाकण्‍यात आले. 

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.