जगातला सर्वात खतरनाक अतिरेकी शिवसेना भवनात घुसला तेव्हा…

२६ नोव्हेंबर २००८. स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. तो ही थेट देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईवर. पाकिस्तान मधून आलेल्या १० दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. यात १६८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. जवान आणि पोलिस देखील शहिद झाले होते.

या हल्ल्यात त्यावेळी अजमल कसाब या एकमेव जिवंत अतिरेक्याला पकडून फासावर लटकवण्यात आलं. पण याच हल्ल्यातील अजून एक आरोपी डेव्हिड हेडली अर्थात दाऊद सय्यद गिलानी याला २००९ मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आलं होतं. पुढे चौकशी दरम्यान त्यानं अनेक धक्कादायक खुलासे केले होते. याच खुलास्यांपैकी एक होता तो म्हणजे,

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा प्लॅन.

मुंबई हल्ल्याची तयारी बरेच दिवस आधी चालू होती. बरेच दिवस म्हणजे अगदी २ वर्ष म्हंटलं तरी चालण्यासारखं आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून हेडलीने २००७ मध्ये सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुन हल्ला करायला येणाऱ्या अतिरेक्यांसाठी गंडे – दोरे खरेदी केले होते. सोबतचं अनेक ठिकाणांची हेडलीने रेकी केली होती. यापैकीचं एक ठिकाण म्हणजे शिवसेना भवन.

हेडलीने आपल्या कबुली जबाबात म्हंटले होते की, बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा हाफिज सईदचा प्लॅन होता. त्यासाठी त्यानं मला काम देखील सांगितलं. तो म्हणाला होता की,

बालासाहब को सबक सिखाना जरुरी है.

ही साधारण २००६-२००७ मधील गोष्ट आहे. हाफिज सईदच्या या इच्छेवर हेडलीने हाफिजकडून या कामासाठी सहा महिने मागून घेतले. याच दरम्यान हेडलीनं शिवसेना भवन नजरेखालून घालायचं ठरवलं. यासाठी त्यानं शिवसेनेचे कथित नेते राजाराम रेगे याचा उपयोग केल्याचा दावा केला.

आता या राजाराम रेगेंची ओळख सांगायची तर ते त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क अधिकारी होते. त्यामुळे शिवसेनेत त्यावेळी त्यांचा शब्द बऱ्यापैकी मानला जातं असल्याचं सांगितलं जातं. याच राजाराम रेगे यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी हेडलीनं जीम प्रशिक्षक विकास वराक यांचा वापर केला.

वराकच्या साथीनं रेगे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर हेडलीनं त्यांच्याशी संपर्क वाढता ठेवला. काही दिवस गेल्यानंतर हेडली आणि रेगे या दोघांची चांगली ओळख झाली आणि घट्ट मैत्री देखील.

हेडली सांगतो,

या मैत्रीच्या माध्यमातुन मी २००६ ते २००७ या काळात दोन वेळा शिवसेना भवनात घुसलो. तिथली संपुर्ण रेकी केली, काही व्हिडीओ शुट केले. कोण कुठे बसतो, कोण कधी येतो, जातो, बाळासाहेब कुठे असतात हे सगळं बघून घेतलं.

ज्यामुळे पुढे हल्ला करताना हा व्हिडीओ लष्कर-ए-तोयबाला उपयोगी झाला असता. त्यामुळे त्यांच्याकडे तो पाठवून दिला.

पण या दरम्यान या प्लॅनला एक्झिक्युट करण्यविषयी विचारल असता हेडली म्हणाला होता की,

मैं नहीं जानता कि यह कोशिश कैसे की गई. पर मेरे ख्याल से उस व्यक्ति को, जिसे ठाकरे को मारने के लिए भेजा गया था उसे पुलिसने गिरफ्तार कर लिया गया था. लेकिन वह पुलिस हिरासत से फरार होने में सफल रहा. इसलीए यह प्लॅन अंजाम तक नही पहुंच पाया.

पुढे २००८ मध्ये याचं रेगे यांच्या मेल वरुन हेडलीला ‘फोन कर’ असा मेसेज पाठवला होता. त्यानंतर त्यांनी हेडलीला मोबाईलवर देखील मॅसेज केला होता.

रेगेच्या माध्यामातुन बाळासाहेबांपर्यंत पोहचून त्यांना आणि उद्धव ठाकरे यांना अमेरिकेत बोलवून मारण्याचा पुर्ण प्लॅन होता. डॉ. राणा आणि एलईटीचे अन्य सदस्य त्यांची तिथं ‘काळजी’ घेणार होते अशी देखील माहिती हेडलीनं दिली होती. मात्र पुढे हा देखील प्लॅन पुर्ण होवू शकला नव्हता.

या सगळ्या भेटीच्या पार्श्वभुमीवर राजाराम रेगे यांना विचारलं असता ते म्हणाले होते की,

हेडलीने शिवसेना भवनाला आपल्यासोबत भेट दिल्याची दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे म्हटले होते. हेडलीशी केवळ दोन मिनिटांची भेट झाली होती. त्यानं शिवसेना भवन आतून पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण मी त्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर माझे त्याच्याशी काहीच बोलणे झाले नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.