अत्रे, बेहरे, वागळे, अर्णब : शिवसेना नेहमीच समोरच्याला जशास तशा भाषेत उत्तर देते…

अर्णब गोस्वामी ठाकरे परिवारांवर तुटून पडले होते. मुख्यमंत्र्यांना अरेतुरेची भाषा करत होते.  ज्युनिअर ठाकरे आणि सिनियर ठाकरे असा उल्लेख करत अगदी पाहून घेण्याची भाषा आपल्या रिपब्लिक चॅनेलवरून करत होते. 

याला निमित्त होतं ते सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचं. 

आजवर शिवसेनेच्या विरोधात असणाऱ्या पत्रकारांना सेनेने आपल्या खळखट्याकच्या भाषेतच उत्तर दिलं, अगदी कंगणा राणावतचा किस्सा घ्या. कंगणा जेव्हा सेनेवर तोफ डागू लागली तेव्हा सेनेने तिच्या ऑफिसवर थेट बुलडोझर चढवला.

मात्र अर्णबच प्रकरण वेगळं होतं.

एकीकडे अर्णबवर पोलीस केस देखील दाखल करुन घेण्यात आली होती. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ही केस होती. अर्णबने स्वत:च्या ऑफिसचं काम यांच्याकडून करुन घेतलं मात्र बील थकवलं त्याच्यातूनच ही आत्महत्या झाल्याचं सांगण्यात आलं.

आत्ता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येबाबत पुछतां हैं भारत म्हणून डॉल्बी लावणारे अर्णब अन्वय नाईक यांच्या आत्महत्येबाबत म्युटवर होते. या सर्व प्रसंगात उध्दव ठाकरेंना रिमोट माझ्याच हातात म्हणणारे बाळासाहेब आठवले असतील.

पण आज अर्णबला अटक करुन शिवसैनिकांना समाधान मिळालं. तरिही शिवसैनिकांना हा प्रश्न का पडायचां याचं उत्तर खालील प्रकरणांमधून बाहेर येत. 

हे संदर्भ प्रकाश अकोलकर यांच्या हा शिवसेना नावाचा इतिहास आहे या पुस्तकातून घेण्यात आले आहेत. 

प्रकरण १ 

अत्रे आणि ठाकरे हे एकमेकांचे चांगले जिगरी दोस्त. प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे हे दोघेही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे सेनापती. त्यामुळे प्रबोधनकारांसोबतच बाळासाहेब ठाकरेंसोबत देखील त्यांचे चांगले संबध होते.

बाळासाहेब जेव्हा फ्री प्रेस जर्नलमध्ये नोकरी करायचे तेव्हा मावळा या टोपणनावाने ते नवयुगमध्ये व्यंगचित्र काढायचे. 

पुढे मार्मिक सुरु झालं. बाळासाहेब ठाकरे राजकीय भूमिका मांडू लागले. त्यातूनच त्यांना डांगे यांना विरोध सुरू ठेवला. पुढे १६ डिसेंबर १९६२ रोजी ठाकरेंनी मार्मिकमधून अत्रेंवर हल्ला चढवला. लागलीच अत्रेंनी सांज मराठा मधून ठाकरेंवर पाच लेख प्रसिद्ध केले. पुढे त्यांची पुस्तिका काढली आणि त्याचं नाव ठेवलं, कमोदनकार ठाकरे आणि त्यांची कारटी. अत्रेंनी या पुस्तकाची किंमत एक कवडी इतकी ठेवली.

ठाकरेंनी आपल्या वर्तमानपत्रांतून आचार्य अत्रेंचा उल्लेख सूकराचार्य करण्यास सुरवात केली. पुढे ही भाषा वरळीचा डुक्कर अशी घसरली. 

पुढे २९ ऑगस्ट १९६५ च्या मार्मिकच्या मुखपृष्ठावर अत्रे-डांगे-फर्नांडिस यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलं. या विरोधात ठाकरेंच्या घरावर मोठा जमाव चालून गेला व केशवराव ठाकरेंना आमचा मुलगा गाढव आहे असे म्हणत माफी मागणं भाग पडलं.

नंतरच्या काळात शिवसेनची स्थापना झाली आणि राडा आणि खळखट्याकची भाषा बोलणारे शिवसैनिक ठाकरेंना मिळाले.

१९६७ साली व्ही.के.कृष्ण मेनन यांच्या विरोधात स.गो.बर्वे अशी लोकसभेची निवडणूक झाली. मेनन यांच्या व्यासपीठावर आचार्य अत्रे होते. या वेळी कम्युनिस्ट विरोध म्हणून शिवसेनेने मेनन यांच्या विरोधाची बाजू उचलली. अप्रत्यक्षपणे अत्रे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगला. 

निवडणूकीच्या प्रचारादरम्यान अत्रेंनी आव्हान सभेच आयोजन ठाण्यात केलं. शिवसैनिकांच्या धमक्यांना आपण भिक घालत नसल्याचं त्यांना दाखवायचं होतं. सभा सुरू झाली तेव्हा ठाण्याच्या गावदेवी मैदानावर लाल झेंडे होते. आपण शिवसैनिकांना हरवलं या अविर्भावात अत्रे उभा राहिले. इतक्यात व्यासपीठाच्या दिशेने एक चपलेचा जोड आला.

अत्रे तरिही बोलू लागले तोच सभेतले लाल झेंडे जाळण्यात आले आणि व्यासपीठावर चपलेला पाऊस पडू लागला. प्रत्यक्षात लाल झेंडे घेवून शिवसैनिक सभेला आले होते. 

या गदारोळात अत्र्यांना मारहाण झाली, त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. अत्रे एका हॉस्पीटलमध्ये लपून राहिले.

एका मोठ्या पत्रकाराला खळखट्याकची भाषा सांगण्याचा हा पहिला किस्सा. वर्तमानपत्रांतून ठाकरेंवर झालेल्या हल्यांचा समाचार काही काळानंतर निवडणूकीदरम्यान अशा प्रकारे घेण्यात आला होता. 

प्रकरण दोन.. 

सोबतकार ग.वा.बेहरे आणि बाळासाहेबांचे सुरवातीच्या टप्यात चांगले संबंध होते. मात्र याला गालबोट लागले ते १९७४ च्या लोकसभेसाठी लागलेल्या एका पोटनिवडणुकीमुळे. या निवडणूकीत कॉंग्रेसचे रामराव आदिक विरुद्ध डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे अशी लढत होती.

यापूर्वी झालेल्या कॉ. कृष्णा देसाई खून खटल्यातील आरोपीचे वकिलपत्र रामराव आदिक यांनी घेतले होते. त्याचसोबत वसंतराव नाईक व बाळासाहेब ठाकरेंचे चांगले संबध असल्याने शिवसेनेने रामराम आदिक यांना आपला पाठिंबा जाहीर केला. 

तेव्हा ग.वा बेहरे यांनी २० जानेवारी १९७४ रोजी आपल्या सोबत मध्ये पहिल्या पानावर अग्रलेख लिहला,

सेनापती की शेणपती?

या अग्रलेखातून बाळासाहेब ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. बाळासाहेब ठाकरेंच्या धरसोडीच्या राजकारणाची इच्छेद धुलाई या लेखात करण्यात आली. यात अस म्हणण्यात आलं की, शिवसैनिकांनी या सेनापतीची वस्त्रे काढून घेऊन त्याला नागडे करावे, नाहीतर कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात स्वयंसेवकाचे काम करावे… 

जेष्ठ नाट्यसमीक्षक माधव मनोहर यांना घेवून सोबतच्या वाचक-लेखकांच्या मेळाव्यास जात असताना बेहरेंना शिवसेना भवनच्या चौकात शिवसैनिकांनी अडवलं.

त्यांना मारहाण करण्यात आली व कपडे फाडण्यात आली. त्यांचे कपडे काढून घेवून त्यांना नग्न करण्यात आलं. तेव्हा तिथल्याच एका व्यक्तीने फेकलेली लुंगी गुंडाळून ग.वा. बेहरे कार्यक्रम स्थळी पोहचले. त्यानंतर ग.वा. बेहरे यांनी आपण माघार घेणार नाही अशी गर्जना केली.

शिवसैनिकांनी आपल्या सेनापतीवर झालेल्या टिकेनंतर थेट संपादकाला मारल्याचा हा दूसरा प्रसिद्ध किस्सा होता. 

प्रकरण तीन 

आणिबाणीनंतर आलेल्या जनता पक्षाच्या राजवटीत वर्तमानपत्रांच स्वातंत्र्य पून्हा बहरलं. या काळात समाजवादी विचारांच्या गटाकडून दिनांक नावाचे साप्ताहिक सुरू करण्यात आले. जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये अशा लोकांचा त्याला पाठींबा होता. याच काळात म्हणजे १९८० साली शिवसेनेने काढलेल्या एका मोर्चात हुतात्मा चौक ते बोरीबंदर दरम्यान दुकानांच्या काचा फोडून लुटालुट करण्यात आली. त्यावेळी दिनांक साप्ताहिकातून याबाबत तपशीलवार माहिती देणारा लेख प्रसिद्घ करण्यात आला.

दिनांकचे संपादक म्हणून निखिल वागळे काम पहात होते. अंक प्रसिद्ध झाल्यानंतरच्या आठवड्यात शिवसैनिकांनी निखिल वागळेंना मारहाण केली. 

अक्षर प्रतिरुप या मुद्रणालयातून मुद्रणालयाचे एक चालक अरुण नाईक यांच्यासोबत निखिल वागळे बाहेर पडले. तेव्हा बेसावधक्षणी वागळेंवर हल्ला करण्यात आला. पाठीवर ब्लेड्सचे वार करण्यात आले. तेव्हा बेस्ट डेपोतील लोक दूपारच्या सुट्टीसाठी बाहेर पडले होते. मोठ्या संख्येने लोक गोळा झाल्याने हल्लेखोर पळून गेले. 

त्यानंतर २४ ऑक्टोंबर १९९१ रोजी वानखेडे स्टेडियमची धावपट्टी शिवसैनिकांनी उखडल्यानंतर वागळेंच्या महानगर मध्ये बालबुद्धीचे प्रताप हा अग्रलेख व वागळे यांचा देशभक्तीचे राजकारण हा लेख छापून आला. यावर सायंदैनिकच्या ऑफिसवर शिवसैनिकांनी हल्ला केला आणि कार्यालयातील सामानाची मोडतोड केली. 

हा हल्ला झाल्यानंतर शिवसैनिकांच्या दहशतीविरोधात अनेक पत्रकार, विचारवंत महानगर च्या बाजूने. उभा राहिले. विजय तेंडुलकर, अरुण साधू यांच्या नेतृत्वाखाली महानगर कार्यालयापासून शिवसेना भवनपर्यन्त मोर्चा घेवून जाण्यात आला. मोर्चा शांततेत पार पडला. मात्र मोर्चा होवून महानगरच्या कार्यालयाजवळ पोहचलेल्या मणीमाला, शीला रावळ आणि मिलींद खांडेकर यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला चढवत मारहाण केली. 

प्रकरण ४ 

बाबरी मशिद उद्धस्त झाल्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगलीत शिवसैनिकांच्या असणाऱ्या सहभागाबाबत महानगर मधून लेख प्रकाशित होत गेले. याचा वचपा म्हणून १८ ऑगस्ट १९९३ रोजी हिंदी पत्रकार संघाने चर्चगेट येथील इंडियन मर्चेंट चेंबरच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात वागळे बोलण्यासाठी उभा राहिल्यानंतर शिवसैनिकांनी मारहाण केली होती. 

यावेळी एटिटर्स गिल्ड ऑफ इंडिया संघटनेने पुढाकार घेवून हरिकुमार (डेक्कन हेरॉल्ड), दिलीप पाडगावकर, गोविंदराव तळवळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाभवनापुढे एक दिवसाचं धरणं धरण्यात आलं होतं. 

या झाल्या प्रमुख चार घटना याचसोबत काही राखीव असे किस्से देखील आहेत. 

उदाहरण म्हणजे महानगर, आज दिनांक यातून लिखाण करणाऱ्या कपिल पाटील यांचा उल्लेख बाळासाहेब  समाजवादी कार्टी असा करत, तर महानगरचा उल्लेख महारोगी असा करत असत. पुढे जेव्हा उद्धव ठाकरेंकडे बरीच सुत्र सोपवल्यानंतर व नारायण राणे शिवसेनेला रामराम करण्याच्या काही काळाअगोदर निखिल वागळे, युवराज मोहिते व प्रमोद निगुडकर यांच्यावर कुडाळ येथे शिवसैनिकांनी हल्ला केला.

पुढे  नोव्हेंबर २००९ मध्ये आयबीएन लोकमत चा वृत्तवाहिनीवर शिवसैनिकांनी दोनदा हल्ला केला. तर २८ जानेवारी २०१२ रोजी टाइम्स ऑफ इंडियांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला. 

ही काही निवडक आणि महत्वाची उदाहरणे प्रकाश अकोलकर यांनी आपल्या जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आहे या पुस्तकात मांडली आहे. ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पत्रकार, संपादक, वर्तमानपत्र कार्यालय, वृत्तवाहिनी कार्यालयांवर हल्ले केले याचे वर्णन करण्यात आले आहे.

आत्ता सत्ता आहे हा एक मॅच्युअरपणा अशा वेळी शिवसैनिकांनी वृत्तवाहिन्यांवर हल्ला करुन आपल्याच सरकारला अडचणीत न आणण्याचा शहाणपणा दाखवला. आत्ता या मागे राजकीय सुड की खरोखरच अन्वय नाईक प्रकरण याचा शोध पोलिस घेतीलच पण या निमित्ताने लोकांना बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा पहायला मिळाली असेच वाटत आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.