शिवसैनिकांनी भिंतीवर रंगवलेल्या घोषणांमधून कम्युनिस्टांना हरवले आणि मुंबई जिंकली..

सध्याचं जग हे फेसबुक ट्विटर, इंस्टाग्रामचं आहे. प्रत्येकजण आपली फेसबुक वरची वॉल सजवण्याच्या भानगडीत असतो. विशेषतः राजकारणी लोक. आजकाल त्यांचा प्रचार हा सोशल मीडियावरच चालतो. दररोज गल्लीबोळात उगवणारे प्रशांत किशोर त्यांना फेसबुक वरच्या प्रचाराचं महत्व पटवून देतात आणि नेतेमंडळी फेसबुकच्या वॉल वर पोस्ट करायचं या भानगडीत गुंतून जातात.

शिवसेना सुद्धा अशाच वॉलवरच्या प्रचारांनी उभी राहिली. फक्त ते वॉल सोशल मीडियाचे नव्हते तर त्या होत्या मुंबईच्या खऱ्या खुऱ्या भिंती.

५ जून १९६६ रोजी शिवसेना नावाच्या वादळास सुरवात झाली. बाळ केशव ठाकरे या प्रबोधनकार ठाकरेंच्या लेकाने मराठी माणसाला आवाज मिळावा म्हणून शिवसेना हा पक्ष स्थापन केला होता. त्याकाळी तरुणाईमध्ये बेरोजगारीमुळे प्रचंड असंतोष पसरला होता. दक्षिणेतील येणारे यंडूगुंडू आपल्या हक्काच्या नोकऱ्या पळवत आहेत असं बाळासाहेबांनी पटवून दिलं.

मुंबईमधून हजारो तरुण त्यांच्या पाठीशी उभे राहू लागले, त्यांच्या सभांना व्याख्यानांना गर्दी होऊ लागली. बाळासाहेब ठाकरे सोपं बोलतात पण थेट बोलतात, आणि हृदयाला हात घालणारं बोलतात हे अनेकांना आवडत होतं.

लोकांची मने जिंकली होती आता निवडणूका जिंकायच्या होत्या.

बाळासाहेब राजकारणात नव्यानेच आले असले तरी ते मुख्यतः व्यंगचित्रकार होते. वडिलांचा पत्रकारितेचा वारसा त्यांच्याकडेही चालत आला होता. मार्मिक मधून त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या फटकाऱ्यांची आणि ठाकरी भाषेची स्टाईल विरोधकांची सालटी कशी काढता येते हे दाखवून दिल होतं.

हाच आपला आक्रमक ठाकरी बाणा प्रचारात वापरायचं ठरलं.

त्याकाळी सोशल मीडिया वगैरे नव्हता. सेनेकडे सत्ता नव्हती आणि पैसा देखील नव्हता. प्रचाराची साधने अत्यंत कमी होती. पण शिवसैनिकांच्यातील जिद्द तुफान होती. सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचायचं एकमेव साधन म्हणजे मुंबईच्या सार्वजनिक भिंती.

मुंबईच्या भिंतीवर झळकलेली सेनेची पहिली घोषणा घोषणा म्हणजे,

 ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’

मुंबईमध्ये येऊन मराठी माणसाच्या हक्काच्या नोकऱ्या चोरणाऱ्या मद्रासी लोकांवर केलेला हा हल्लाबोल होता. या घोषणेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या असंतोषाला वाट मिळवून देणारी सेना आणि तिची घोषणा पक्क्या मुंबई करांच्या मनात बसली. हटाव लुंगीच्या घोषणेनं मुंबईत धुमाकूळ घातला.

त्यानंतर नंबर लागला कम्युनिस्टांचा. त्याकाळी डाव्या पक्षांचे मुंबईत चांगलंच प्रस्थ होतं. गिरणी कामगारांच्या जोरावर कम्युनिस्ट पक्ष मुंबईवर राज्य करत होते. मुंबई जिंकायची असेल तर पहिले कम्युनिस्टांना हरवलं पाहिजे हे बाळासाहेबांनी ओळखलं होतं.

त्या काळात विळा हातोड्यावाल्या कामगार संघटनांची या भिंतींवर मक्तेदारी होती. शिवसेनेने या मक्तेदारीला पहिला हादरा दिला. शिवसैनिकांनी मुंबईच्या भिंतीवर रंगवलं,

‘जला दो जला दो, लाल बावटा जला दो’

लुंगी हटावच्या घोषणेप्रमाणे ही घोषणा सुद्धा चांगलीच हिट झाली. शिवसेना अंगावर येतेय हे बघून कामगार संघटना चवताळल्या. महानगरपालिकेच्या निवडणुकीत या घोषणायुद्धाने जोर पकडला. कम्युनिस्ट विरुद्ध शिवसेना हा वाद मुंबईच्या भिंतीवर रंगू लागला.

या पूर्वी काँग्रेस, जनसंघाच्या प्रचार घोषणा भिंतीवर रंगायच्या पण त्यात मज्जा नव्हती. शिवसेनेने आपली आक्रमकता या घोषणांमध्ये उतरवली.

१९६८च्या निवडणुकीत तर फक्त मुंबईतल्या भिंतीच नव्हेत तर पूल, पाईप, पाण्याच्या टाक्यावर देखील प्रचार युद्ध रंगू लागलं. सगळ्यात आधी भिंतीवर हक्क मिळवण्यासाठी शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्षांमध्ये भांडण व्हायची. हि भांडणं टाळण्यासाठी कम्युनिस्ट कार्यकर्ते चुना लावून भिंती बुक करून ठेवत. शिवसैनिक मग या भिंतीच धुवून टाकत. सेनेने कम्युनिस्टांवर कुरघोडी करण्यास सुरवात केली.

इथून या दोन्ही पक्षांमधील वादाने जोर पकडला. पुढे डाव्या संघटना भिंतींवर आपल्या पक्षाचा शॉर्टफॉर्म ‘सीपीआय’ असा लिहायचे. म्हणून शिवसैनिक ‘एसएस’ असं लिहू लागले.

बाळासाहेबांच्या सुपीक डोक्यातून निघणाऱ्या सेनेच्या घोषणा या भावनिक आवाहन करणा-या असायच्या. त्यात ‘शिवरायांची शपथ तुम्हाला, विजयी करा शिवसेनेला’ ही शिवसेनेची घोषणा तुफान गाजत होती. तर ‘असशील जर खरा मराठी,राहशील उभा शिवसेनेच्या पाठी’ असं मराठी मनांना भिडणारी घोषणा ठिकठिकाणी दिसू लागली.

म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, काव्य यांचा मुक्त वापर या घोषणांमध्ये केला जाऊ लागला.

शिवसेनेकडं सुरुवातीला ढाल-तलवार चिन्ह होतं. त्यावेळी ‘जय अंबे जय भवानी, ढाल तलवार आमची निशाणी’ अशी घोषणा होती. धनुष्य-बाणाचं चिन्ह मिळालं तेव्हा ‘आमची निशाणी धनुष्य बाण, विरोधकांची दाणादाण’ ही घोषणा जन्माला आली. सर्वसामान्यांच्या लक्षात राहील, असा ‘पंच’ या घोषणांमध्ये असे.

मुंबईत सिनेमांची क्रेझ होती. बाळासाहेबांनी या लोकप्रिय सिनेमांच्या नावाचा वापर आपल्या प्रचारात करायची भन्नाट आयडिया काढली. या घोषणा लोकांच्या पक्क्या लक्षात राहतात, हेही त्यांनी ओळखलं होतं.

त्यातूनच मग ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते’, ‘बूँद जो बन गये मोती, शिवसेना हमारा साथी’, या घोषणा निर्माण झाल्या.

बाळासाहेब व्यंगचित्रांमधून मोठमोठ्या नेत्यांची बिनधास्त खिल्ली उडवायचे, शिवसैनिकांनी हि स्टाईल भिंतीवरच्या घोषणांमध्येही आत्मसात केली. उदाहरणार्थ त्याकाळी काँग्रेसची एक घोषणा फेमस होती,

‘काँग्रेसला मत म्हणजे चांगल्या नागरी जीवनाला मत’

या घोषणेच्या पुढं शिवसैनिक ‘हा हा हा हा…’ असं लिहून यायचे. केवळ पक्षाच्या भिंती रंगवता रंगवता पेंटर झालेले कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक नारायण घागरे सांगतात,

‘बाकी काहीही असो या भिंती अत्यंत सुबक अक्षरात लिहिलेल्या असत. या सुबकतेचं श्रेय शिवसेनेलाच द्यायला हवं. त्यातून एकप्रकारे भिंतीवाचनाचा आनंद मिळे’.

शिवसेनेची प्रजा समाजवादी पक्षासोबतची युती नंतर तुटली. त्यानंतर ७१च्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी रातोरात दादर भागात  ‘प्रमिला दंडवते,सर्वांना गंडवते’, अशा घोषणा रंगवल्या होत्या.

काही काही वेळा या घोषणायुद्धात शिवसेनेवर टोमणे देखील मारले जायचे.

‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ या घोषणेला कामगार संघटनांनी उत्तर दिलं की  ‘धोती लुंगी एक है, टाटा बिर्ला दुष्मन है’

पुढे तर बाळासाहेबांनी १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत माजी लष्करप्रमुख करिअप्पा यांना पाठिंबा दिला. इतकंच नाही तर त्यांची प्रचार मोहीमदेखील शिवसेनेच्या खांद्यावर घेतली. दाक्षिणात्य लोकांवर टीका करणारे बाळासाहेब मुंबईत करिअप्पा यांचा प्रचार करतात यावरून बरंच खिजवलं गेलं.

‘मराठी माणसाच्या मारतात गप्पा, निवडून आणतात करिअप्पा’ या घोषणा मुंबईत जागोजागी दिसू लागल्या.

करिअप्पा देशाचे लष्कर प्रमुख राहिले असल्यामुळे या सेनानीला आम्ही पाठिंबा देतोय असं बाळासाहेबांनी सांगितलं पण याचा फायदा झाला नाही. करिअप्पा या निवडणुकीत जोरदार आपटले. त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मिळवावं लागलं.

असे काही दुर्मिळ प्रसंग वगळता शिवसेना मात्र या घोषणा युद्धात आघाडीवर राहिली. त्यांनी मुंबईच्या भिंतीवरच नाही तर मराठी माणसाच्या मनावर देखील राज्य केलं.

आजच्या काळात प्रचारामध्ये प्रचंड पैसा आला. ठिकठिकाणी उभे केलेल्या बेरंगी फ्लेक्स पासून ते टिकटॉक, इंस्टाग्राम वरील बीभत्स गाण्यापर्यंत भारताच्या प्रचाराचा प्रवास झाला आहे. सर्वच पक्षीयांनी यात घेतलेली आघाडी पाहता आजही जुन्या मुंबईकरांना आठवणींच्या धुक्यात पुसट झालेल्या सेनेच्या आणि कम्युनिस्ट पक्षांच्या त्या भिंतीवरील घोषणा दिसत राहतात हे नक्की.

संदर्भ- श्रीरंग गायकवाड नवशक्ती

हे ही वाच  भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.