दादा म्हणाले, “बाळ, तुम्ही एक कारखाना चालवलाय, १०० कारखाने तुम्हाला जड नाही “

श्रीनिवास पाटील. सध्याचे सातारचे खासदार. सनदी अधिकारी, खासदार ते सिक्कीमचे राज्यपाल असा प्रवास करत ते आता पुन्हा खासदार झाले आहेत.

त्यांचे व्यक्तीमत्व म्हणजे डोक्यावर गांधी टोपी, डोळ्यावर आयताकृती चष्मा, पिळदार मिशा, पारंपारिक राजकीय पोषाख, पाच-साडेपाच फुट उंची, मजबूत शरीरयष्टी. चालण्यात पाटीलकीचा थाट अन् बोलताना गावाकडचा भारदस्त आवाज, मात्र टीका करताना कमालीची मिश्कीलता, बोलायला उभा राहिला की हा माणूस भल्या भल्यांना गार करतो.

सनदी अधिकारी होण्यापुर्वी ६० च्या दशकात श्रीनिवास पाटील कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. शदर पवार यांच्या सोबत त्यांनी विद्यार्थी कॉंग्रेसचे अनेक वर्ष काम केले. कॉंग्रेसमध्ये काम करत असतानाचा वसंतदादा पाटील, राजारामबापु पाटील, बाळासाहेब देसाई अशा जेष्ठांचा स्नेह लाभला.

कराडमध्ये परत आल्यावर राजकारणात सक्रिय व्हायचे ठरवले, पण त्यावेळी इथे यशवंतराव चव्हाण, दाजीसाहेब चव्हाण, प्रेमिलाकाकी, यशवंतराव मोहिते असे अनेक दिग्गज राजकारणात होते. त्यामुळे राजकारणापासून दुर जात १९६५ ला राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा पास होवून पाटील सनदी अधिकारी झाले.

सुरुवातील करवीर, हिंगणघाट, संगमनेर इथे प्रांताधिकारी म्हणून काम केले होते. संगमनेरमध्ये असताना त्यांची संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक ही विशेष जबाबदारी देण्यात आली होती. या कामाचा फायदा त्यांना पुढे होणार होता.

१९७९ ला भारतीय प्रशासकीय सेवेसाठी त्यांची पदोन्नती झाली आणि MIDC चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे १९८५ पर्यंत ते याच पदावर होते.

१९८५ ला बदलीची वेळ आली तेव्हा मुख्यमंत्री पदावर होते वसंतदादा पाटील. पश्चिम महाराष्ट्रात राजकारणच मुळात साखरेवर आधारित होते आणि आजही आहे. त्यामुळे साखर संचालक पदावर काम करण्यासाठी अनेकांची चढाओढ चालू असते. पण वसंतदादांना इथे आपल्या विश्वासातील आणि प्रामाणिक अधिकारी हवा होते.

अशा वेळी वसंतदादांना पहिलेच नाव श्रीनिवास पाटील यांचे आठवले. MIDC सोबतच पाटील यांच्याकडे उद्योग, उर्जा विभागाच्या उपसचिव पदाचा अतिरीक्त कार्यभार होता.

वसंतदादांनी पाटील यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले,

बाळ, तुम्ही भाऊसाहेब थोरातांचा कारखाना चालवलाय, तो एकच १०० कारखान्यांच्या तोडीचा होता. त्यामुळे एक कारखाना काय न् १०० कारखाने काय. तुमची डायरेक्टर ऑफ शुगर पदावर नियुक्ती करतो.

पण काही सरकारी बाबुंनी “He is too junior to hold this post” असे सांगुन त्यांच्या नियुक्तीला खोडा घातला.

इथे राज्याचे माजी मंत्री यशवंतराव मोहिते पुढे आले. त्यावेळी ते कराडमधून खासदारकीची टर्म पुर्ण करुन नुकतेच राजकारणातुन निवृत्त झाले होते. त्यांना हा सगळा प्रकार समजला.

यशवंतरावांनी वसंतदादांना पत्र लिहीले, I know him intelligent. Thatfull, he may be appointed.

त्यांच्या या पत्राचा आधार घेत वसंतदादांनी श्रीनिवास पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. आणि त्यांची राज्याचे साखर संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात एकुण १६४ कारखाने त्यांच्याकडे होते.

राजकारणातुन झाली बदली :

१९८७ च्या आसपास शंकरराव चव्हाण राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते. त्या कालखंडामध्ये राज्यात वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या तीन गटातील संघर्षाचा काळ होता. वसंतराव दादांचा नातेवाईक आणि शरद पवार यांचा जवळचा मित्र म्हणून शंकरराव चव्हाण गटाचा श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता.

अशातच साखर संचालक म्हणून पाटील यांनी दिलेल्या एका निर्णयाचे कारण पुढे करून चव्हाण गटातील नाराज झालेल्या मंडळींनी त्यांची बदली करावी असा आग्रह शंकरराव चव्हाण यांच्याकडे धरला. त्यातून त्यांची बदली बीडला जिल्हाधिकारी म्हणून झाली.

त्यानंतर पुढे दोन-तीन महिन्यातच त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा पाटील यांनी दिलेला निर्णय योग्य होता हे मान्य केले. मात्र त्याअगोदरच दोन वर्ष या पदावर काम केल्यानंतर १९८७ साली त्यांची बदली होवून त्यांनी जिल्हाधिकारी बीड म्हणून पदभार स्विकारला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.