राजारामबापूंनी श्रीनिवास पाटलांच्या डोक्यातलं राजीनाम्याचं खूळ काढून टाकलं

ग्रामीण भागातील तरुणाईची नस पकडणे हे फक्त काहीच नेत्यांना जमते. प्रचंड ऊर्जा असणाऱ्या या युवाशक्तीला विधायक कामाला प्रेरित करणारे मोजकेच नेते या महाराष्ट्रात होऊन गेले. त्यातील सर्वात प्रमुख नाव येते राजाराम बापू पाटील यांचे.

गोष्ट आहे साठच्या दशकातली.

साताऱ्याचे सध्याचे खासदार असलेले श्रीनिवास पाटील हे नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC ) परीक्षा पास होऊन उपजिल्हाधिकारी बनले होते. त्यांची १९६५ सालची बॅच हि महाराष्ट्राची तिसरीच बॅच. प्रशिक्षण संपल्यावर सगळ्या अधिकाऱ्यांचा महसूल मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्याची पद्धत होती.

तेव्हा मंत्रीपदी होते राजाराम बापू. त्यांची श्रीनिवास पाटलांशी पूर्वी पासून ओळख होती.

राजारामबापूंचे जन्मगाव कासेगाव हे सांगली जिल्ह्यात पण कराड तालुक्याला लागून. त्यांचे अनेक नाते-संबंध, पै-पाहुणे हे कराड व पाटण तालुक्यात. त्यामुळे तरुणपणापासूनच श्रीनिवास पाटलांची व बापूंची ओळख.

पुण्यात महाविद्यालयीन जीवनात श्रीनिवास पाटील विद्यार्थी चळवळीत कार्यरत होते. तेव्हा त्यांनी  स्थापन केलेल्या संयुक्त सातारा विद्यार्थी मंडळाच्या अनेक कार्यक्रमांना पाहुणे म्हणून कै. यशवंतराव चव्हाण साहेब, कै. लोकनेते बाळासाहेब देसाई, कै. लोकनेते राजारामबापू हे नेहमी येत असत.

पुढे बापू महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हा श्रीनिवास पाटील, शरद पवार वगैरे मंडळी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते म्हणून त्यांच्याशी कायम संबंध येत असे. आपल्या भागातील मुलं म्हणून बापूंचे त्यांच्यावर नेहमीच विशेष प्रेम होतं. पुढे श्रीनिवास पाटील राजकारणापासून दूर गेले आणि अधिकारी बनले. तेव्हा सत्काराच्या वेळी आलेल्या राजाराम बापूंना त्यांना बघून धक्काच बसला.

‘आपलं पोरगं’ एवढ्या मोठ्या पदावर रुजू होत आहे याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांनी श्रीनिवास पाटलांचं विशेष कौतुक केलं. 

श्रीनिवास पाटील यांची पहिली नेमणूक १९६५ ते १९६७ या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात प्रांत अधिकारी म्हणून झाली.

त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते लोकनेते बाळासाहेब देसाई. ते श्रीनिवास पाटलांच्या वडिलांचे मित्र असल्याने त्यांचा कौटुंबिक स्नेह होता.  दोन वर्षे प्रांत अधिकारी करवीर या पदावर असताना बाळासाहेब देसाई यांनी श्रीनिवास पाटलांना शासकीय निवासस्थानी न राहू देता स्वतःच्या रुईकर कॉलनीतील घरी ठेवले होते.

दोन वर्षे उलटली व महाराष्ट्रातील सर्व उपजिल्हाधिकारी असलेल्या अधिका-यांची स्वतःच्या महसूल विभागाच्या बाहेर बदल्या करण्याचे धोरण पारित झाले. त्याप्रमाणे श्रीनिवास पाटलांची बदली विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाली.

दोन वर्षे करवीर प्रांत म्हणून उत्तम काम केल्यानंतरही एवढ्या दूर विदर्भात बदली झाली हे श्रीनिवास पाटलांना पटले नाही.

त्यावेळी त्यांचे वय होते २७. तरुण सळसळंत रक्त. आधीच राजकारणात रस असूनही सरकारी नोकरी मध्ये यावं लागलं होतं यामुळे थोडीशी घुसमटच झालेली. त्यात दूर विदर्भात बदली झाल्यामुळे असंतोषाचा बांध फुटला.

रागाच्या भरात ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांना सातारा सर्किट हाऊसवर भेटायला गेले. 

श्रीनिवास पाटलांच्या सोबत बाळासाहेबांचेच चिरंजीव जयसिंगराव व अशोकराव देसाई होते. रागारागात त्यांच्याकडे काहीही न बोलता नोकरीचा लिहून आणलेला श्रीनिवास पाटलांचा राजीनामा जयसिंगरावांनीच सुपूर्द केला.

बाळासाहेब देसाईंनी तो वाचला. बाळासाहेब तसे अतिशय तापट स्वभावाचे, हे सर्वश्रुत होते. पण समोर इतर शिष्टमंडळ सदस्य बसले होते. त्यामुळे प्रचंड राग येऊनही साहेबांना काही बोलता येईना. शेजारीच बसलेल्या महसूलमंत्री राजारामबापूंना त्यांनी पाटलांचे राजीनामा पत्र दिले व त्यांना म्हणाले,

“बापू पोरांना शेजारच्या खोलीत घेऊन जावा व काय म्हणतायतं पहा”

राजारामबापू या तरुणांना शेजारच्या सुटमध्ये घेऊन गेले. सुटमध्ये जाताच पहिले श्रीनिवास पाटलांचं पत्र वाचलं व वाचताच फाडून टाकलं. त्यांना जवळ बसायला सांगितले व समजूत काढू लागले.

“श्रीनिवास, आधीच आपल्या भागातले अधिकारी कमी, परीक्षा देऊन डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर झालेला तू पहिलाच. शासनाचे धोरण आहे. सर्व विभागातील अधिकारी राज्याच्या इतर विभागात गेले पाहिजेत, त्या भागाची ओळख झाली पाहिजे, तिथल्या समस्या सुटल्या पाहिजेत. तुम्ही जसं चांगलं काम करवीरला केलं तर राज्याच्या मागास भागातही झालं पाहिजे. आपण राज्य शासनाचे अधिकारी आहोत, राज्यात कुठेही जायची तयारी आपण ठेवली पाहिजे.”

बापूंनी अतिशय आपुलकीने समजावून सांगितल्यावर श्रीनिवास पाटलांना हे पटले. दोघे परत ना. बाळासाहेब देसाईंकडे गेले. तोपर्यंत बाळासाहेब देखील शांत झाले होते. हसत-हसत म्हणाले,

“बापू काढलं का ह्याच्या डोक्यातलं खूळ?”

श्रीनिवास पाटलांनी होकारार्थी उत्तर देताच साहेबांनी जवळ बोलवून पाठ थोपटली व आशीर्वाद दिले.

पुढे ते हिंगणघाट येथे रुजू झाले व ३ वर्ष उत्तम काम केले. त्यानंतर १९९९ पर्यंत अनेक वेळा पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागात बदल्या झाल्या. बदलीची ऑर्डर मिळताच सामान बांधायचे व शासनाने नेमलेल्या ठिकाणी आठवड्यात हजर व्हायचे ही बापूंची शिकवण त्यांनी नेहमीच पाळली.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.