ममता २०० च्या पार पोहचल्यात पण तो ममतांना आमदार होण्यासाठी झुंजवतोय..
सुरवातीची आकडेवारी आलेली आहे त्या वेळी ममता क्लियर कट गोल करताना दिसून येतायत. एकूण २९२ जागांपैकी २०० पेक्षा जास्त जागांवर ममता दिदींचा पक्ष आघाडीवर आहे. पण ममता दिदी मात्र आमदार होण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहेत.
शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता दिदी अशा निवडणूकीत ममता दिदी प्रत्येक फेरीत पिछाडीवर आहेत. अशा वेळी कोण हे शुभेंदू अधिकारी असा प्रश्न विचारण्यात येत आहे..
२००७ चे वर्ष पश्चिम बंगालच्या राजकारणाला नाट्यमय वळण देणारे ठरले होते. सिंगूर, नंदीग्राम या राज्यव्यापी आंदोलनांच्या मदतीने ममता बॅनर्जींनी मागच्या ३ दशकांपासून सत्तेवर असलेल्या डाव्यांच्या साम्राज्याला धक्का देण्यास सुरुवात केली, आणि पुढच्या ४ वर्षांमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास पूर्ण देखील केला.
पश्चिम बंगालमधील पूर्व मिदानपूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये २००७ च्या सुरुवातील एका इंडोनेशिया स्थित रासायनिक कंपनीला १४ हजार एकर जमीन अधिग्रहित केल्याची अफवा गावकऱ्यांमध्ये पसरली. आपली जमीन जाणार अशा बातम्या येऊ लागल्याने गावकरी अस्वस्थ झाले.
यामागे सीपीएमचे सुप्रसिद्ध बाहुबली नेते लक्ष्मण सेठ यांची प्रमुख भूमिका असल्याचे सांगितले गेले.
त्याच्या आदल्याच वर्षी दक्षिण कांथी विधानसभा सीट वरून शुभेंदू अधिकारी यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत याच लक्ष्मण सेठ यांना हरवण्याचा पराक्रम केला होता. दक्षिण कांथी, नंदीग्राम हा सगळा भाग पूर्व मिदनापूर जिल्ह्यामध्येच येतो.
या भूमि अधिग्रहणा विरोधातील गावकऱ्यांच्या अस्वस्थतेला हेरून शुभेंदू अधिकारी यांनी आंदोलन उभे केले, भूमि उछेड प्रतिरोध कमेटी (BUPC) या बॅनरखाली सर्व गावकऱ्यांना एकत्रित आणले. या सगळ्याच्या चेहरा जरी ममता दिसत होत्या तरी त्यामागील मास्टर ब्रेन शुभेदूं अधिकारी यांचाच होता.
या आंदोलनाद्वारे गावकऱ्यांनी सरकार विरोधात मोर्चा, निदर्शनं चालू केली. पोलीस आपल्यापर्यंत पोहचू नये यासाठी त्यांनी नंदीग्रामला बाहेरच्या जगाशी जोडणारा एकमेव रस्ता बंद केला. पण तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी गावकऱ्यांचा हा विरोध मोडून काढण्यासाठी बळाचा वापर करण्याचं ठरवलं.
परिणामी, १४ मार्च २००७ रोजी मोठ्या प्रमाणावर पोलीस गावापर्यंत पोहचले, गावावर नियंत्रण मिळवण्यास चालू झाल्याचे पाहून गावकरी अधिक आक्रमक होऊ लागले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून कोण्या अधिकाऱ्याने गोळीबार चालू केला. यामध्ये १४ निरपराध लोकांना आपला बळी गमवावा लागला.
यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळाले, परिणामी डाव्यांच्या सरकारला एक पाऊल मागे यावं लागलं होत. या आंदोलनाने शुभेन्दू यांना राज्यभर स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यास मदत केली, सोबतच आंदोलनाच्या यशामुळे शुभेन्दू बंगालच्या जनतेमध्ये हिरो होते.
त्यामुळे ममतांनी त्यांना पश्चिम मिदनापुर, पुरुलिया आणि बांकुड़ा या भागांची जबाबदारी दिली. इथं देखील त्यांनी पक्ष वाढला.
याच आंदोलनाने सत्तेच्या चाव्या हातात मिळाल्या.
हुगळी जिल्हयातील सिंगूरमध्ये देखील अशाच पद्धतीच आंदोलन झालं होत. या दोन आंदोलनांचा प्रभाव संपूर्ण राज्यावर झाला. परिणामी डाव्यांच्या ३४ वर्षांच्या साम्राज्याला सुरुंग लागला.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत डाव्यांच्या जागा २००४ च्या तुलनेत ३५ वरून थेट १५ वर घसरल्या. तर तृणमूलच्या काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागा ६ वरून २६ वर गेल्या.
शुभेन्दू यांनी देखील २००९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तमलुक मतदारसंघातून विजय मिळवला. पुन्हा लक्ष्मण सेठ यांच्या विरोधात तब्ब्ल १ लाख ७३ हजारांचे मताधिक्य घेत त्यांना पराभूत केले.
२००६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या मतांचा टक्का २७ टक्के होता. तो आंदोलनानंतरच्या ५ वर्षांमध्ये म्हणजे २०११ पर्यंत वाढून ३९ टक्के झाला होता. पूर्व मिदानपूर आणि पश्चिम बर्दवान सह संपूर्ण जंगल महल मधील ६५ जागांवर देखील तृणमूलच्या मतांचा टक्का २८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांवर गेला. २०१६ मध्ये याच जागांवर जवळपास ४८ टक्के मत मिळाली.
२०११ मध्ये राज्य विधानसभेमध्ये तृणमूल काँग्रेसला ३० जागांवरून चमत्कारिकरित्या जवळपास १८४ जागा मिळाल्या. पूर्ण बहुमत मिळवत ममता बॅनर्जी राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.
शुभेन्दूचा प्रभाव असलेल्या पूर्व मिदानपूरच्या ४९ पैकी ३६ जागा तृणमूलने जिंकल्या.
२०१६ च्या विधानसभा निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांनी आंदोलन झालेल्या नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर त्यांना ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.
अधिकारी कुटुंबीयांची राजकीय ताकद
शुभेंदू अधिकारी यांना सरकारमध्ये क्रमांक दोनचे नेते मानले जात होते. मिदनापूर परिसरात अधिकारी कुटुंबीयाचे वर्चस्व आहे. त्यांचे वडील शिशीर अधिकारी १९८२ मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. ते दुसऱ्या UPA सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्रीही राहिलेले आहेत.
सध्या शिशीर अधिकारी हे कांथी लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. तर शुभेंदू यांचे भाऊ दिब्येंदू तमलुक लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. शुभेंदू यांचे आणखी एक भाऊ सौम्येंदू कांथी नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत.
मात्र मागील काही गेल्या काही काळापासून पक्षात ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिजित बॅनर्जी यांचा आणि वरिष्ठ नेतृत्व राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा हस्तक्षेप वाढला असून यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत असल्याचं शभेन्दू यांचं म्हणणं आहे.
त्यानंतर त्यांना पक्षाच्या बऱ्याच पदांवरून हटवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी बॅनर लावले होते.
२६ नोव्हेंबर रोजी हुगली रिवर ब्रिज कमीशनच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्रीपदाचा देखील राजीनामा दिला. आणि अखेरीस त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
आज शुभेंदू सरकार त्याच ममतांना आमदार होण्यासाठी झुंजवताना दिसून येत आहेत.
हे हि वाच भिडू.