बाकी काही का असेना विद्या बालनच्या नवऱ्याची स्टोरी पक्की फिल्मी आहे.
जुन्या काळात म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या आधीच्या काळात एक फिल्म प्रोड्युसर होता. जी.राकेश त्याचं नाव. मुळचा पाकिस्तानमधल्या पंजाबचा. घरची परिस्थिती चांगली. लाहोरमध्ये मोठं किराणामालचं दुकान होतं पण पोराला फिल्मच वेड लागलं म्हणून मुंबईला आलेला. घरात सातआठ मुलं असल्यामुळे घरच्यांनी देखील अडवल नाही. आला स्ट्रगल केली, खटपटीने प्रोड्युसर बनला, डायरेक्टरसुद्धा झाला. राज कपूरला घेऊन फिल्मपण बनवली पण कधी यश बघायला मिळालं नाही.
तो एक डायरी लिहायचा. डायरी म्हणजे फक्त आज कुठे कुठे गेलो होतो, कोणाला किती पैसे दिले वगैरे तपशील. त्यात बऱ्याच स्टुडियोच्या वाऱ्या असायच्या, त्याही कोणाकोणाची देणी द्यायची असायची त्यासाठीचं. एकदा असाच मेहबूब स्टुडियोमध्ये तो गेला होता आणि तिथे त्याचा मोठा अपमान झाला होता. ही गोष्ट आहे १९५३ मधली.
पन्नासवर्षानंतर
त्याच स्टुडियोमध्ये एक मोठा माणूस येणार म्हणून अपॉइन्टमेंट होती. मोठमोठे स्टार लोक आपला तारणहार म्हणून त्याची वाट बघत होते. हा दुसरा कोणी नाही तर जी.राकेशचा नातू होता. नाव सिद्धार्थ रॉय कपूर.
आज लोक त्याला ओळखतात विद्या बालनचा नवरा, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल रॉय कपूरचा भाऊ म्हणून. फक्त एवढीच ओळख नाही. तो आहे दंगल सारख्या भारताच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमाचा प्रोड्युसर. भारताच्या सिनेमानिर्मितीचं कल्चर बदलणारा माणूस म्हणून त्याला ओळखतात.
सिद्धार्थ रॉय कपूरचे आजोबा रघुपत रॉय कपूर उर्फ जी.राकेश यांनी आपल्या नातवांसाठी काही भली मोठी प्रॉपर्टी बनवली नव्हती. त्यांच्या मुलाने तर या बेभरवशाच्या करीयरला दुरूनच रामराम ठोकला आणि सरळ मिल्ट्रीमध्ये भरती होऊन काश्मीर मध्ये निघून गेले. रघुपत रॉय यांनी पण फिल्मच्या वेडाचा वारसा मात्र आपल्या नातवंडाना दिला.
मुंबईत एका थिएटरजवळ त्यांच घर होतं. रघुपत रॉय दररोज आपल्या नातवाना घेऊन सिनेमा बघायला न्यायचे. त्या भल्या मोठ्या पडद्यावरच्या रुपेरी स्वप्नात ही दोन पिढ्यांचं अंतर असलेली कपूर मंडळी रंगून जायची. शोले तर त्यांनी ३५ वेळा बघितला होता.
सिद्धार्थची आई सलोम अरोन ही सुद्धा एकेकाळची मिस इंडिया, सुप्रसिध्द सामा डान्सर. तिनेही काही सिनेमात हिरोईन होऊन आपलं लक अजमावलेल होतं पण जमलं नाही.
असल्या वातावरणात सिद्धार्थला लहानपणीच हिरो व्हायचं स्वप्न पडलं नसत तर नवल?
पण आजोबांकडून आणखी एक वारसा त्याला मिळाला होता, शिक्षणाचा. रघुपत रॉय कपूर हे फक्त फिल्मी नव्हते तर उच्चशिक्षित देखील होते. त्यांनी लंडन मधल्या थ्रोटन कॉलेजमधून गोल्ड मेडल मिळवल होतं. सिद्धार्थ सुद्धा शाळेत हुशार होता. नाटकात वगैरे काम करायचा पण ते सगळ अभ्यास सांभाळून. सिडनहम कॉलेजमध्ये असताना त्याला जाणवलं की आपल्याला नाटकात काम करण्यापेक्षा स्पोन्सर आणणे, प्रयोगाच्या तारखा बुक करणे अशी पडद्यामागची कामे जास्त चांगली जमत आहेत.
मुंबईच्या फेमस अशा जमनालाल बजाज कॉलेज मध्ये त्याला एमबीएसाठी अडमिशन मिळालं. नव्वदच्या दशकातला काळ. एमबीएचं भारतात नुकतच फड आलेलं. सिद्धार्थला अडमिशन मिळाली. तिथला तो स्टार स्टुडट बनला.त्याने एका छोट्याशा फिल्मकंपनीमध्ये उन्हाळ्यात इंटरनशिप केली होती. वरळीमध्ये तळघरातल्या एका छोट्या खोलीत ऑफिस होतं. पण या कंपनीशी सिद्धार्थ चं घरचं नात निर्माण झालं. कंपनीच नाव युटीव्ही आणि मालक होते रॉनी स्क्रूवाला. त्यांना उत्साही मुलगा खूप आवडला.
पुढे इंटरनशिप संपली. कॉलेजदेखील संपल. मोठमोठ्या कंपन्या कम्पस इंटरव्ह्यू साठी जेबी कॉलेजमध्ये आल्या. पण सिद्धार्थला ज्यात करीयर करायचं होतं त्या फिल्म प्रोडक्शन कंपनी ढुंकूनही या एमबीए ग्रॅज्युएटकडे बघायच्या नाहीत. म्हणूनच सिद्धार्थ कॉलेजमध्ये टॉपर असूनही तो बेकार होता.
अखेर कोणीतरी त्याला समजावलं आणि प्रोक्टर अँड गॅम्बल या ब्रँड कंपनीत जॉब करायला लावली. तिथे त्याने केलेलं भारी काम बघून स्टार टीव्हीने मार्केटिंगचा भल्या मोठ्या पगाराचा जॉब ऑफर केला. सिद्धार्थचे दिवस पलटले होते. आवडत्या क्षेत्राशी जवळचं काही तरी काम करायला मिळणार म्हणूनच तो खुश होता. त्याला हॉंगकॉंग ऑफिसला पाठवलं. सिद्धार्थ झटझट प्रगती करतच चालला होता.
अखेर स्टार टीव्ही वर एक शो आला ज्याच्या मार्केटिंग आणि प्लनिंगसाठी सिद्धार्थ रॉय कपूरला हॉंगकॉंगवरून परत मुंबईला बोलावून घेण्यात आलं. शोचं नाव कौन बनेगा करोडपती.
स्वतः महानायक अमिताभ बच्चन या शोच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर अवतरणार होते. त्यांना साजेशी ग्रँड एंट्री होणे आवश्यक होते. सिद्धार्थने या शो साठी जीव तोड मेहनत केली. बच्चनची जादू छोट्या टीव्हीवरसुद्धा चालली. सिद्धार्थचं कौतुक झालं. त्याला अरबदेशात स्टार टीव्ही लोन्चं करायची जबाबदारी मिळाली.
इथ पर्यंत त्याच टिपिकल नोकरदार माणसाप्रमाणे आयुष्य चाललेल. पगार बक्कळ होता. प्रतिष्ठा वगैरे होती. सगळ चांगलं होतं पण मनात एक रुखरुख होती, आपल्याला सिनेमा बनवायचा आहे.
एक दिवस त्याला फोन आला. तो फोन युटीव्हीच्या रॉनी स्क्रूवालाचा होता. आता युटीव्ही वरळीच्या तळघरातली छोटी कंपनी राहिली नव्हती. ते आता लक्ष्य, स्वदेस, चलते चलते अशा मोठ्या सिनेमांना प्रोड्यूस करायला मदत करत होते. रॉनी स्क्रूवालाचा फोन आलाय म्हटल्यावर सिद्धार्थने ओळखलं आपल्यासाठी काही तरी गुड न्यूज आहे. रॉनीने आपल्या लाडक्या शिष्याला युटीव्हीचा मार्केटिंग हेड म्हणून नोकरी दिली होती. सिद्धार्थने पगार विचारला नाही,वर्क प्रोफाईलविचारलं नाही. सरळ स्टारचा राजीनामा दिला आणि पहिली फ्लाईट पकडून मुंबईला आला. त्याला माहित होतं आता आपल्याला आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळणार आहे.
रॉनी स्क्रूवाला रंग दे बसंती प्रोड्यूस करत होते. सिद्धार्थकडे मार्केटिंगचं काम होतं पण त्याने प्रोडक्शनमध्ये सुद्धा आपल डोकं लावलं. रॉनीने त्याला फ्री हँड दिलाच होता. त्यांनी जबरदस्त काम केलं. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा अगदी कोणतीही तडजोड करायला न लागता त्यांना हवा तसा बनला होता. अतिशय सेन्सिटिव्ह विषय असूनही हा सिनेमा सुपरहिट झाला. आमीर खान, ए आर रेहमान यांची जादू परत दिसली. या सगळ स्वप्न साकार होण्यामागे पडद्यामागे जी टीम कष्ट घेत होती यात सिद्धार्थसुद्धा होता.
रॉनीने काहीच वर्षात त्याला आपल्या युटीव्हीचा सीईओ बनवले. या दोघांच्या टीमने बॉलीवूडमध्ये कॉर्पोरेट कल्चर रूढ केलं. जुन्या काळाप्रमाणे खिशात नोटांचे बंडल असणारे ढेरपोटे शेटजी जाऊन कोट टाय घातलेली सोफिस्टिकेटेड माणसे प्रोडक्शन टीममध्ये दिसू लागली. कधीही सिनेमा सुरु करा, कधीही संपवा वगैरे अनागोंदी कारभार बंद झाला.
प्रोड्युसरच्या लहरीप्रमाणे स्टोरी बदलणे बंद झालं.हा एक जॉब आहे आणि तो त्याच प्रोफेशनली केला पाहिजे हे युटीव्हीने दाखवून दिले. सिनेमाचा आत्मा ही स्टोरी असते. रॉनी आणि सिद्धार्थचं एक धोरण होतं काहीही झालं तरी स्टोरीमध्ये तडजोड करायची नाही.
त्यांनी जोधा अकबर, राउडी राठोड सारखे पैसे कमवणारे सिनेमे बनवलेच पण खोसला का घोसला, वेन्सडे, पानसिंग तोमर, चिल्लर पार्टी सारख्या ऑफबीट सिनेमानां मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला. त्यांचे आता पर्यंत पाच सिनेमे भारताकडून ऑस्करला पाठवण्यात आले. म्हणूनच की काय आमीर खान आपल्या प्रोडक्शनच्या तारे जमी पर, देल्ली बेली, पिपली लाईव्ह वगैरे फिल्म्सना त्यांची मदत घेत होता.
रणबीरचा बर्फी हा सिनेमा सिद्धार्थच्या करीयरमधला हायेस्ट पोईंट म्हणल तरी चुकीचं ठरणार नाही. लहरी अनुराग बासूला त्याच्या मनाप्रमाणे काम करू दिल. कोणालाही अपेक्षित नसताना पिक्चर सुपरहिट झाला. युटीव्हीला डिस्नेची ऑफर आली. सिद्धार्थ रॉय कपूर डिस्नेच्या भारतीय युनिटचा एमडी झाला.
सिद्धार्थ रॉय कपूरने बरेच सिनेमे प्रोड्यूस केले. दंगल आणि पिकेने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. पण दरम्यानच्या काळात त्याला अपयश देखील बघायला मिळालं. फितूर, मोहनजोदारो, जग्गा जासूस वगैरे सुपरफ्लॉप झाले. जग्गामुळे डिस्नेला बॉलीवूडमधून गाशा गुंडाळावा लागला.
सिद्धार्थने देखील डिस्नेला टाटा बाय केलं आणि स्वतःची रॉय कपूर फिल्म्स नावाची कंपनी सुरु केलीय. परत पहिल्या पासून श्रीगणेशा करावा लागलाय. तो वेबमिडिया साठी डिजिटल कंटेंट बनवतो. काही सिनेमे देखील येतायत. फिल्म टेलेव्हिजन प्रोड्युसर गिल्डचा तो अध्यक्ष देखील आहे. फक्त भारतातल्याच नव्हे तर जागतिक सिनेमा क्षेत्रातल्या सर्वात जाणकार माणसांमध्ये याचा समावेश होतोय.
एवढे मोठे चढउतार पाहिलेत जे लोकांना अनुभवायला एक जन्म देखील पुरत नाही. आणि हा गडी आत्ता फक्त ४५ वर्षाचा झालाय.
अपयशी आजोबांची सगळी स्वप्नं पुरी करतोय. भावांना देखील सिनेमात लॉंच केलंय. स्वतः देखील एखाद्या हिरो पेक्षा कमी देखणा नाही, बायकोदेखील विद्या बालन सारखी जबरदस्त अॅक्ट्रेस मिळाली आहे. खुद्द करण जोहरने म्हणे त्यांची लव्हस्टोरी सेट करून दिली होती. बाकी काही का असेना सिद्धार्थ रॉय कपूरची स्टोरी पक्की फिल्मी आहे हे नक्की.
हे ही वाच भिडू.
- लक्ष्य सिनेमा ही खरं तर फरहान अख्तरची स्वतःची लाइफस्टोरी होती.
- अंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या चोरीचोरीने बॉलिवूडला शहाणं केलं.
- आल्या आल्या सलग तीन सिनेमे सुपरहिट होवूनही अमिषाची पाटी कोरीच राहिली.
- शंभर कोटीचा गल्ला कमवणारा भारताचा पहिला सिनेमा !!