शंभर कोटीचा गल्ला कमवणारा भारताचा पहिला सिनेमा !!
ऐंशीचं दशक. आताची रशिया आणि तेव्हाची सोव्हिएत युनियन मध्ये कसल्यातरी निवडणुका सुरु होत्या. त्यांच्या पंतप्रधानांच्या निकोलोय तिखोनोव्ह यांच्या प्रचार रॅली जोरात सुरु होत्या. त्या दिवशी राजधानी मॉस्कोमध्ये प्रचारसभा होणार होती. सभेची वेळ झाली अजून कोणीही सभेच्या ठिकाणी फिरकल नव्हत. मंडप ओस पडला होता. सभा कॅन्सल करायला लागली.
पंतप्रधानांनी चौकशी केली नेमक झालय तरी काय? तेव्हा त्यांना कोणी तरी सांगितलं,
“मॉस्को एअरपोर्टवर जिम्मी आलाय. त्याला पाहायला तिथे गर्दी झालीय.”
हा जिम्मी म्हणजे कोणी हॉलीवूडचा रॉकस्टार नव्हता. तर तो होता आपला मिथुन चक्रवर्ती. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल मिथुनची रशिया मध्ये एवढी कसली क्रेझ? काय आहे विषय नेमका? त्यासाठी आपल्याला थोड अजून जरा भूतकाळात जाव लागेल.
साल होत १९८१. मिथुनदा एका सिनेमाच्या शुटींग मध्ये बिझी होता. पिक्चरचं नाव होतं तकदीर का बादशाह. डायरेक्टर होता बी. सुभाष. खर नाव बब्बर सुभाष!! हा बी सुभाष तसा बॉलीवूड मध्ये काही खूप फेमस नव्हता. छोटे मोठे फिल्म्स बनवायचा. मिथुन मात्र बंगाल मधला मोठा स्टार होता.
मिथुन हिंदीमध्ये आल्या आल्या आपल्या डेब्यू सिनेमामध्ये त्याने नॅशनल अवार्ड मिळवला होता. पुण्याच्या एफटीआयआय मध्ये शिकला असल्यामुळे त्याच्या अभिनयाबद्दल कोणाला शंका असण्याचं कारणच नव्हत. पण हिंदी मध्ये त्याला अपेक्षित असं यश मिळत नव्हत. त्यामुळेच बी.सुभाषच्या लो बजेट सिनेमामध्ये त्याला इच्छा नसून देखील काम कराव लागत होतं.
तकदीर का बादशाहचं शुटींग सुरु असताना अचानक एकदा मिथुन मेकअप रूम मध्ये गेला ते खूप वेळ बाहेरच येईना. बी. सुभाष नेमक काय झालं ते पाहायला मेकअप रूम मध्ये गेले. मिथुन तिथे बसून रडत होता. सुभाष जवळ त्याने आपल मन मोकळ केलं. एवढ्या वर्षांचा स्ट्रगल सगळा बाहेर पडला. सुभाषनी मायेने त्याच सगळ ऐकून घेतलं. शेवटी ते त्याला एकच वाक्य म्हणाले,
“मै एक ऐसी फिल्म बनाउंगा जो तुम्हे सुपरस्टार बनाएगी”
पुढे तकदीर का बादशाहचं शुटींग संपलं. सिनेमा काही विशेष चालला नाही पण लगेच सुभाष नी मिथुनला घेऊन एका सिनेमाच शुटींग सुरु केलं. पिक्चरच नाव होतं डिस्को डान्सर!!
मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये लग्नात गाणारा आणि रस्त्यावर डान्स करणाऱ्या स्ट्रीट डान्सर अनिलची ही कथा. त्याचा डान्स बघून एक डेव्हिड ब्राऊन नावाचा माणूस डिस्को डान्सर बनायचा चान्स देतो. त्याला जिम्मी हे नाव देतो. पिक्चर काय तुम्ही बघितलाचं असाल. त्यामुळे काय सगळी स्टोरी सांगत बसत नाही. यात इलेक्ट्रिक गिटार ला घाबरणारा मिथुन आहे, त्याचा काका झालेला राजेश खन्ना आहे, बप्पी लाहरीचं इलेक्ट्रिक डिस्को म्युजिक आहे.
आणि सगळ्यात महत्वाच मिथुनचा क्या बात क्या बात क्या बात म्हणायला लावणारा डान्स आहे. या सिनेमामधली सगळी गाणी त्याकाळच्या तरुणाई मध्ये तुफान गाजली.
“आय एम ए डिस्को डान्सर, जिम्मी जिम्मी आजा आजा, क्रिश्ना धरती पे आजा तू”
बप्पी लाहरीने आफ्रिकन, तुर्कस्थान कुठून कुठून ट्यून ढापून आणल्या होत्या. पण त्याकाळात कोण चाली ढापत नव्हत? आजही ढापाढापी चालतेच की. पण बप्पीने भारताला खरं डिस्को म्युजिक नेमक काय असते हे दाखवून दिल. क्षणात ठेका धरायला लावणार हे सुपरफास्ट पॉप संगीत, रंगेबेरंगी लाईटचा मारा आणि त्यात आपले लांब पाय हलवून नाचणारा मिथुन यांनी पूर्ण भारतातलं संगीत, डान्स याला एका हाती बदलून टाकलं.
बी.सुभाष नी मिथुनला वचन दिलेलं असल्या प्रमाणे सिनेमा सुपरहिट झाला. मिथुनच्या घरा बाहेर प्रोड्युसरची लाईन लागली. मिथुन ने मात्र तिथून पुढे बी.सुभाष यांच्या कोणत्याच सिनेमाला नाही म्हटल नाही. कसम पैदा करणे वाले की , कमांडो, डान्स डान्स असे अनेक हिट फिल्म्स या दोघांनी दिले.
कसम पैदा करणे वाले की चं शुटींग सुरु होतं. या सिनेमामध्ये स्मिता पाटील होती. एकदा तिच्याशी गप्पा मारत असताना बी.सुभाष म्हणाले की
“मला सरकारकडून ऑफर आली आहे की डिस्को डान्सरचं मॉस्को फिल्म फेस्टिव्हल मध्ये प्रदर्शन करू. “
स्मिता पाटील उडालीच. तिने त्यांना विचारलं मग कधी जाताय मॉस्कोला? सुभाष म्हणाले ,
“मला वाटते की जायला नको. तिथे सगळे मदर इंडिया टाईप सिरीयस सिनेमे असणार. आमचा डिस्को डान्सर टिपिकल मसाला सिनेमा आहे.”
स्मिता पाटीलने त्यांना एवढा मोठा चान्स सोडतायत म्हणून वेड्यात काढले. तिच्या सांगण्यावरून सुभाष पिक्चर मॉस्को फेस्टिव्हल ला रिलीज करायला कसेबसे तयार झाले. तिथे गेल्यावर मात्र त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. रशियन पब्लिकला सिनेमा खूप आवडला. पूर्ण फेस्टिव्हल मध्ये प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजला गेलेला हा एकमेव सिनेमा ठरला.
पिक्चर पूर्ण रशिया मध्ये रिलीज केला गेला. डिस्को डान्सरच्या गाण्यांनी तिथे देखील वेड लावलं. मिथुन रशियामधेय जिथे जिथे गेला तेव्हा जिम्मीजिम्मीच्या गजरात त्याचे स्वागत झाले. डिस्को डान्सरने रशियातले सगळे रेकॉर्ड मोडून टाकले. भारतात ६ कोटी कमावणारा हा सिनेमा रशिया, चीन , जपान या देशांमध्ये मिळून १०० कोटी कमावला.
शंभर कोटी कमावणारा हा पहिला भारतीय सिनेमा होता.
एकदा रशियाचे राष्ट्रप्रमुख मिखाईल गार्बाचेव्ह भारतात आले होते. तेव्हा राजीव गांधीनी त्यांची ओळख सुपरस्टार अमिताभ बच्चनशी करून दिली. तेव्हा ते म्हणाले
“माझी बायको राज कपूरची फॅन आहे आणि माझी मुलगी मिथुन चक्रवर्तीची. हे दोन सोडून दुसऱ्या कुठल्या भारतीय सेलिब्रेटीला आम्ही ओळखत नाही. “
मध्यंतरी मिथुन आणि सलमान लकी या सिनेमाच्या शुटींग साठी रशियाला गेले होते.तिथे सलमानला कोणीही ढुंकूनही पाहिलं नाही पण इतक्या वर्षांनी देखील मिथुनच्या स्वागतासाठी एअरपोर्ट तुडूंब भरल होतं.
भारतातल्या छोट्याशा खेड्यात सरकारी शाळेत शिकणाऱ्या पोरापासून रशिया, उझबेकिस्तान ,युक्रेन या देशामधल्या तरुणांपर्यंत जगभरातल्या अनेकांना जोडणारा एक समान धागा म्हणजे मिथुन.
अजूनही रशियामधल्या डान्स शो मध्ये , सिंगिंग कॉम्पीटेशनमध्ये डिस्को डान्सरची गाणी वाजतात आणि आपल्यासारखेच तेही ही गाणी ऐकून लहानपणीच्या आठवणीनी नॉस्टल्जिक होतात.
हे ही वाच भिडू.
- आज जगातील पहिल्या भिडू चा बड्डे : हॅप्पी बर्थडे जग्गू दादा
- सनी देओल आहे म्हणून आम्ही त्याच्या फडतूस पिक्चरला पण टॉकीज गाजवायचो !
- आपण पाहिलेला पहिला फॉरेनर कल्याणचा होता !