राजमाता जिजाऊंच्या जन्मावेळी लखुजीराव जाधवांनी हत्तीवरून साखर वाटली होती.
१२ जानेवारी १५९८ म्हणजेच पौष शुद्ध पौर्णिमा १५१९रोजी सिंदखेडच्या देशमुखांच्या गढीत लखुजी राजे जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पदरी कन्यारत्न जन्माला आले. नाव ठेवण्यात आलं “जिजाई”.
या तेजस्वी बाळाच्या आगमनाचा आनंद लखुजीरावांना एवढा झाला त्यांनी सर्वत्र हत्तीवरून साखर वाटली.
पोरगी झाली म्हणून रडणाऱ्या सामान्य जनतेसाठी हे आक्रीतच होत. त्यांना काय माहित ही पोरगी पुढ जाऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून देशाचं भविष्य बदलण्यास कारणीभूत ठरणार आहे.
लखुजीराव जाधव म्हणजे निजामशाहीमधले मोठे सरदार. देवगिरीचे राजे यादवांचे ते वंशज.
त्यांना बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडची देशमुखी मिळाली होती. त्यांच्या आधी ही देशमुखी मुळे घराण्याकडे होती. गावातल्या रविराव ढोणे या माणसाने मुळे घराण्याविरुद्ध बंड केले, त्यांच्या घरातली सगळी माणसे मारली.
या कत्तलीतून यमुनाबाई नावाची विधवा वाचली. तिला लखुजीरावाचा पराक्रम माहित होता. तिने त्यांच्याकडे न्यायासाठी पदर पसरला. लखुजीरावानी बंड मोडून काढले. मुळे घराण्याचा वारस कोणी उरला नसल्यामुळे ही जहागीर लखुजीराव जाधवांना मिळाली.
त्यांच्याच काळात सिंदखेडची भरभराट झाली. लखुजी राजांच्यामुळेच सिंदखेड गावाला सिंदखेड राजा संबोधण्यात येऊ लागले. त्यांनी गावात बाजारपेठ वसवली, पाण्याच्या व्यवस्थेसाठी तलाव बांधले , नीलकण्ठेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
लखुजी राजांनी सिंदखेडमध्ये देशमुखांची गढी उभारली. याच गढीत मांसाहेबांचा जन्म झाला.
शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले लखुजीराजांच्या पदरी सरदार होते. मालोजी राजांची पत्नी फलटणच्या वनगोजी निंबाळकरांची मुलगी होती तर वनगोजी निंबाळकरांची बहिण म्हणजे जिजाऊची आई म्हाळसादेवी. निंबाळकर हे दोन्ही घरांना एकत्र बांधणारे सूत्र होते.
असं म्हणतात की लहानपणीच्या तेजपुंज शहाजी राजांना पाहून लखुजी जाधवराव मस्करीत म्हणाले होते की मी याला जावई करून घेणार. मालोजीराजांनी मात्र गंभीरपणे जिजाउना सून करायचा विषय काढला. मात्र लखुजीराव त्यावेळी तयार झाले नाहीत. त्यांना आपली लाडकी पोरगी आपल्या सरदाराच्या घरात द्यायची नव्हती.
पण काळाची महिमा मालोजींच्या मुलांनी शहाजीराजे आणि शरीफजीराजेनी आपल्या पराक्रमाने अख्ख्या निजामशाहीमध्ये नाव कमावले. लखोजीरावांनी सिंदखेड गावी जिजाऊ आणि शहाजीराजांचे थाटात लग्न लावून दिले.
पुढे काही कारणाने जाधव घराणे आणि भोसले घराण्यात वितुष्ट निर्माण झाले, रक्तपात झाला. तेव्हा स्वाभिमानी असणाऱ्या जिजाउनी आपल माहेर तोडून टाकलं.
पुढे १५ जुलै १६२९रोजी निजामाने कट रचून लखुजीराव जाधवांना दौलताबाद दरबारात बोलावून घेतले आणि त्यांचा व त्यांच्या दोन मुलांचा मारेकऱ्यांकरवी खून केला. शहाजी राजांनी आपल्या सासऱ्यांच्या खुनामुळे चिडून जाऊन निजामशाही सोडली आणि ते आदिलशहाला जाऊन मिळाले.
जिजाऊंच्या पदरी तोवर शिवरायांचा जन्म झाला होता. मांसाहेबाना खूप सुरवातीपासून आपले आप्तस्वकीय मराठा सरदार परकीय सुलतानाची चाकरी करतात याचा राग होता.
पुण्याच्या लालमहालात त्यांनी आपल्या मुलाच्या मनात लहानपणीच कर्तुत्वाची ठिणगी पेटवली. राजनीती पासून न्यायनिवाड्याचे संस्कार दिले. सगळ्यात महत्वाचे लहानपणापासून त्यांना स्वराज्याचे स्वप्न पाहायला शिकवले व त्यादृष्टीनेच घडवले.
शिवरायांच्या रक्तात स्वभिमान जिजाऊनीच फुंकला होता. मासाहेबांचे शिकवण घेऊनच शिवबांनी मोगलाई, निजामशाही आणि आदिलशाहीशी लढा देऊन हिंदवी स्वराज्य उभे केले.
सिंदखेडराजाच्या मातीचा संस्कार मराठा साम्राज्याच्या उभारणीसाठी कारणीभूत ठरला. आजही राजमाता जिजाऊचा जन्म झाला ती गढी सिंदखेड उभी आहे. लखुजीराव जाधवांचीही समाधी तिथे आहे. राजमाता जिजाऊ मांसाहेब यांचा एक पुतळा उभा करण्यात आला आहे.
शिवाय जिजाऊसृष्टीचं कामही वेगात सुरु आहे. दरवर्षी १२ जानेवारीला राजमाता जिजाई जन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम सिंदखेड गावात साजरा करण्यात येतो.
हे ही वाच भिडू.
- शिवरायांच्या काळात महाराष्ट्रात साखर होती का?
- मराठा सैन्याने शपथ घेतली, आत्ता किल्ला घेतल्याशिवाय अन्नग्रहन करणार नाही..
- शिवरायांच्या गनिमी काव्यापुढे बहादूरखानाचा अतिशहाणपणा नडला, आणि तो पेडगावचा शहाणा झाला.
- नरवीर तानाजींच्या पराक्रमाचा वारसा आजही मालुसरे घराण्यानं जीवापाड जपलाय