भारतीय भिडूने शोधलेल्या टेक्नॉलॉजीमुळे जगाचं चित्र बदललं, आज तो सॅमसंगचा उपाध्यक्ष आहे..

जगभरात अनेक जिनियस, तत्वज्ञानी लोक नवनवीन शोध लावत असतात. देशाच्या तांत्रिक क्षेत्रात आणि देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावत असतात. भारतातले जिनियस समजले जाणारे पोरं पुढं जाऊन काय काय शोध लावतील याचा पत्ता नसतो म्हणजे आज जो किस्सा सांगणार आहे तो शोध आपल्याला माहिती आहे पण तो एका भारतीय भिडून लावलाय हे आपल्याला माहिती नसणार.

प्रणव मिस्त्री या गुजरातच्या तरुणानं एक असा जबरदस्त शोध लावला जो जागतिक स्तरावरचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा शोध मानला गेला. त्याने सिक्स्थ सेन्स नावाची एक टेक्नॉलॉजी शोधून काढली आणि जगभरातल्या मोठमोठ्या शास्रज्ञ लोकांना अवाक केलं.

सगळ्यात आधी सिक्स्थ सेन्स टेक्नॉलॉजी म्हणजे काय भानगड आहे ते बघू- आपल्याला असलेल्या सेन्स म्हणजे चव, वास अशा प्रकारच्या गोष्टी सोडून मशीन आणि टेक्नॉलॉजी वापरून पाच सेन्सपैकी अजून एक सेन्स बनवला गेला आपल्याला गोष्टी ओळखायला आणि समजायला मदत करतो. या टेक्नॉलॉजीमध्ये कॅमेरा आपल्या इशाऱ्यानुसार काम करतो.

यामध्ये बोटाला वेगवेगळ्या रंगाचे टेप लावले जातात , कॅमेरा कलर वरून ओळखतो. ज्या रंगाच्या बोटाची हालचाल आपण करू त्या कमांडनुसार कॅमेरा काम करतो. या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण पेंटिंग करू शकतो, चित्र काढू शकतो. फक्त बोटांच्या हालचालीवरून कॅमेरा जे आपण सांगू ते इंटरप्रिट करतो आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून आउटपुट देत असतो.

एवढं टेक्निकल जर जड जात असेल तर अजून सोपं करून सांगतो,

मागच्या काही वर्षात फॉरेनमध्ये ब्रेसलेटवाला फोन आल्याची चर्चा होती. त्या फोनमध्ये वापरलेली टेक्नॉलॉजी हि आपल्या भारतीय भिडूची होती. त्या ब्रेस्लेटच्या फोनवरून आपण जे टाईप करू किंवा ऑपरेट करू ते आपल्या त्वचेवर प्रोजेक्ट होतं. हि सिक्स्थ सेन्स टेक्नॉलॉजी अँड्रॉइड फोनच्या स्क्रीनचं प्रोजेक्शन करते.

प्रोजेक्ट केलेल्या गोष्टींना टच करून नवीन फंक्शनमध्ये जाण्याची सोय या टेक्निकमुळे झाली.

पूर्वीच्या काळी आपण पडद्यावर जो पिच्चर पाहायचो तो पाठीमागून प्रोजेक्ट केलेला असायचा, त्या मशीनमधून फक्त आउटपुट दिलं जात होतं. पण या टेक्नॉलॉजीमुळे आउटपुट आणि इनपुट असे दोन्ही शोध लागले गेले.

हि टेक्नॉलॉजी सुरवातीच्या काळात १९९४ ला स्टीव्ह मान या शास्त्रज्ञाने शोधली होती पण ती जास्त कुणाला माहिती नव्हती. स्टीव्ह मान त्यावेळी हि सिक्स्थ सेन्स टेक्नॉलॉजी कपाळावर आणि छातीवर प्रोजेक्ट करत असे. जस जसा काळ पुढे सरकत गेला २००७-०८ च्या काळात प्रणव मिस्त्री या भारतीय मुलाने या टेक्निकवर काम करणं सुरु केलं. सुरवातीला तो हॅकर म्हणून काम करायचा.

स्टीव्ह मानच्या पुढे जाऊन त्याने हि टेक्निक इतकी जबरदस्त विकसित केली कि हातावर मोबाईल प्रोजेक्ट होणं, बोटांनी करून चित्रं काढणं अशा अनेक गोष्टी त्याने शोधल्या. त्याने लावलेल्या शोधामुळे फिजिकल कीबोर्ड नाहीसे झाले. एकदम छोट्या आकाराचा प्रोजेक्टर आणि त्यावर सगळं काम करता येत.

माउस नसलेला पहिला कॉम्पुटर प्रणव मिस्त्रीने बनवून जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

प्रणव मिस्त्रीने बनवलेल्या या सिक्स्थ सेन्स टेक्नॉलॉजीमुळे भविष्यात मोठमोठे गॅजेट्स हे एकदम लहान आकारात उपलब्ध होणार आहे. हा शोध महत्वाचा मानून नासाने हा प्रोजेक्ट आपल्या कामात वापरण्याचा निर्णय घेतला.

थोडक्यात काय तर शरीरावर किंवा कुठल्याही वस्तूवर प्रोजेक्ट करून आपण ऑपरेटिंग करू शकतो.

आता सध्या प्रणव मिस्त्री हा सॅमसंग या कंपनीचा ग्लोबल व्हाईस प्रेसिडंट आहे. सिक्स्थ सेन्स टेक्नॉलॉजी, सॅमसंग गॅलॅक्सी गियर अँड प्रोजेक्ट बियॉंड या गोष्टींसाठी प्रणव मिस्त्री प्रसिद्ध आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.