फिल्मसिटी, वॅक्स म्यूझियम कोणीही उभारेल पण शेतकऱ्यांची ग्रामसंस्कृती देशभर यांनी उभारली

वर्षानुवर्षे शहरी भागात राहणाऱ्या अगदी थोडक्या लोकांना ग्रामीण संस्कृती म्हणजे काय? हे माहित असते किंवा पाहिलेले असते.  त्यामुळे मग ही जर संस्कृती पाहायची असेल, जाणून घ्यायची असेल तर मग ‘मॉडेल व्हिलेज’ ही संकल्पना पुढे आली.

यात सिमेंटचे समूह शिल्प उभारून ग्रामीण भागचं प्रतिरूप तयार करायचे, त्यामध्ये गावातील सगळी संस्कृती दाखवायची अशी कल्पना.

पुण्याच्या पाषाण भागात उभे राहिलेले ‘ग्रामसंस्कृती पार्क’ हा त्याच संकल्पनेतून पुढे आलेला प्रकल्प. 

फक्त पुण्यातच नाही तर राज्यात आणि देशाच्या अनेक भागात अशी प्रतिरूप उभी करून गाव काय असते हे सांगितले जाते. यामध्ये शेकडो शिल्प तयार केली जातात. त्यांना अगदी माणसांसारखे बनवून रंगरंगोटी करून जिवंत भाव दिले जातात. पण हे करण्यासाठी कलाकार देखील तेवढाच अस्सल हवा.

असाच एक देशभरात गाजलेला अस्सल शिल्पकलाकार म्हणजे टी. बी. सोळबक्कणवार.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वसामान्यांना ‘चटकन समजणारे’ शिल्पसमूह उभारण्यासाठी सोळबक्कणवार ओळखले जातात. पुतळ्यांमध्ये जिवंतपणा आणणे यामध्ये त्यांचा विशेष हातखंड.

वर उल्लेख केलेलं पुण्यातील ग्राम संस्कृती पार्क पासून ते बेंगळूरुच्या जक्कूर भागात उभारले जात असलेल्या ‘मॉडेल व्हिलेज’पर्यंत; तसेच हुबळी, हावेरी, शिमोगा, बेळगाव, बागलकोट या पट्टय़ात आणि ‘आलमट्टी शिल्प गार्डन’ अशा अनेक ठिकाणी तब्बल १० हजारहुन अधिक शिल्पांच्या माध्यमातून सोळबक्कणवार यांचे काम बोलत आहे. 

त्यांची मूळ कर्मभूमी ही कर्नाटकचीच. १९४७ साली हावेरी जिल्ह्यातील गोटागुडीमध्ये ते जन्मले. तेथेच ते शिकले आणि धारवाडला डी. व्ही. हळभावी यांच्या कलासंस्थेत शिकून मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालयातून इंटीरिअर डिझाइनचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

शिक्षण पूर्ण करून आधी कन्नड चित्रपट क्षेत्रात सेट-उभारणीचे काम, मग एका कन्नड नियतकालिकासाठी चित्रे काढणे असे सोळबक्कणवारांनी सुरू केले. बैलाटा, दोड्डाटा या नावांनी ओळखले जाणारे यक्षगान सारखे पण लोकनाटय़ासारखे कला प्रकार जतन व्हावेत, म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले.

ग्रामीण जीवनाचे दर्शन ही मुख्य कल्पना, पण त्यासह ७० हून अधिक पुतळे असलेले ‘एकता’, २५ पुतळे असलेले बालपण अशा विषयांवरील समूहशिल्पेही त्यांनी उभी केली. तसेच कर्नाटकमधील ‘उत्सव गार्डन’, ‘कृष्णा पार्क’, ‘लव-कुश पार्क’ ही देखील सोळबक्कणवार यांचीच निर्मिती. 

‘उत्सव गार्डन’ हे  हावेरी जिल्ह्य़ातील गोटागुडी येथे, ३० एकरांच्या जमिनीवर त्यांनी उभारलेले कलाग्राम. इथे जवळपास १ हजार पेक्षा जास्त लहान मोठी समुह शिल्प उभारून जणू अखंड गावाचं उभं केलं आहे. साधी आणि कलात्मक अशी ही सिमेंटची, ऑइलपेंट (एनॅमल) वापरून रंगवलेली  शिल्पे अशी याची ओळख. त्यांचा ‘गावची जत्रा’ हा सुमारे ३०० मानवशिल्पांचा समूह देखील पाहण्यासारखा. 

सोळबक्कणवार हे काही काळ  कर्नाटक बायालाता अकॅडमी ओपन डान्स अँड ड्रमा’चे अध्यक्ष देखील राहिले आहेत. 

जक्कूर मधील महात्मा गांधी ग्रामीण ऊर्जा आणि विकास संस्थेच्या आवारातील ‘विकसित गावा’चे शिल्प, हे त्यांचे अखेरचे काम ठरले. नुकतेच मागील महिन्यात त्यांचे निधन झाले.

एक समूह शिल्पकार म्हणून आपली कला आपल्या पुरती मर्यादित न ठेवता जवळपास ३ हजार कलाकारांना तयार केले आहे. त्यामुळे ग्रामीण संस्कृती आणि समकालीन शिल्पांच्या उभारणीचे त्यांचे काम पुढे चालू राहील हे नक्की.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.