आणि अशा रीतीने लोणी डोश्याचा दावनगिरीमध्ये जन्म झाला
डोसा हा संपूर्ण भारताचा लाडका अन्न पदार्थ. भारतात भाषा, प्रांत, वेशभूषा, जाती, धर्म जेवढे आहेत कदाचित त्याहूनही जास्त डोश्याचे प्रकार आहेत.उडप्याच्या हॉटेलात गेलं की म्हैसूर डोसा पासून गाडी सुरू होते ते पेपर डोसा, मसाला डोसा, घी डोसा, चीज डोसा, सेट डोसा, स्पंज डोसा, बॉम्बे डोसा अशी अनेक स्टेशन घेत फायनल डेस्टिनेशनला जाते.
डोसा जगतात लोणी डोशाचा मान मात्र वेगळाच आहे. नुसता लोणी डोसा नाही तर दावनगिरी बेन्नी डोसा.
दावनगिरी म्हणजे दूर कर्नाटकातील एक गाव. महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटरवर असलेल्या या गावाच्या नावावरून बनणारा डोसा आज प्रत्येक गल्लीबोळात मिळतो. गरीब श्रीमंत प्रत्येकाची भूक भागवणारा खास लोणी डोसा याचा इतिहास देखील खासच आहे.
दावनगिरी हजारो वर्षे जुनी आहे. चालुक्यांपासून ते मराठ्यांपर्यंत अनेक राजवटींनी इथे राज्य केले. अत्यंत सुपीक समृद्ध असलेल्या दावनगिरी मध्ये खाद्यसंस्कृतीची मोठी परंपरा आहे. इथल्या स्वयंपाकघरात बनणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी जगात कुठेही आढळणार नाहीत.
पण भरपूर लोण्याने भरलेल्या चविष्ट दावनगिरी डोश्याचा नाद नाही.
दावनगिरीमध्ये अनेक हॉटेल्स आहेत. सहाजिकच प्रत्येक हॉटेलमध्ये लोणी डोसा मिळतोच. प्रत्येक हॉटेलवाला लोणी डोश्याचा शोध आम्हीच लावला असा दावा करतो पण जाणकार सांगतात लोणी डोसा पहिल्यांदा बनला श्री महादेवप्पा बेन्नी डोसा रेस्टॉरंट मध्ये.
हे रेस्टॉरंट जवळपास ९० वर्षे जुने आहे. याची सुरवात केली होती चेन्नम्मा नावाच्या एका महिलेने. ती मूळची बेळगाव जिल्ह्यातल्या बिडकी गावची. एकदा त्या भागात मोठा दुष्काळ पडल्यामुळे चेन्नम्माचं कुटुंब कामाच्या शोधात दावनगिरीला आलं.
चेन्नम्मा च्या पदरी चार मुले होती, नवरा लवकर वारला यामुळे पोट भरण्यासाठी काही ना काही करावेच लागणार होते. चेन्नम्मा उत्कृष्ट सुगरण होती, तिने दावनगिरीमधल्या एका नाट्यगृहाच्या बाहेर छोटीशी टपरी टाकली. तिथे घी डोसा व इतर पदार्थ बनवण्यास सुरवात केली.
दावनगिरीमध्ये नाटकाची मोठी परंपरा आहे. त्याकाळी रात्ररात्रभर नाटक चालायचे. चेन्नम्माच्या पाहुण्यांच नाट्यगृह होतं त्यांनीच चेन्नम्माला हे हॉटेल उघडून दिलं होतं.
१९२८ साली विजयादशमीच्या दिवशी श्री महादेवप्पा रेस्टॉरंट सुरू झालं. चेन्नम्मा तिथे रोज संध्याकाळी 7 ते सकाळी 7 डोसे बनवायची. अगदी थोड्याच काळात हे हॉटेल फेमस झालं. नाटकाच्या व्यतिरिक्त देखील इथे खास डोसे खाण्यासाठी गर्दी होऊ लागली.
चेन्नम्मा यांचं वय झाल्यावर त्यांनी आपलं हॉटेल मुलांच्या स्वाधीन केलं. बसवंतअप्पा, शंकरप्पा, महादेवप्पा आणि शांतप्पा अशी ही चार मुले, यातले दोघे परत बेळगावला गेले आणि शंकरप्पा महादेवप्पा दावनगिरीमध्येच राहिले.
यातल्या शंकरप्पा यांनी आईच्या घी डोस्याच्या रेसिपी मध्ये थोडेसे बदल करून त्यात लोणी वापरण्यास सुरवात केली.
आणि सुप्रसिद्ध दावनगिरी लोणी डोस्याचा जन्म झाला.
आज शंकरप्पा महादेवप्पा यांची तिसरी पिढी हे हॉटेल चालवते. आजही सकाळी सात वाजल्यापासून या हॉटेलच्या बाहेर लाईन लागलेली असते. आसपासच्या खेडेगावातले शेतकरी त्यांना लोणी आणून देतात.
त्यांच्या लोणी डोस्याच्या प्रसिद्धी नंतर दावनगिरीमध्ये हा डोसा प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये बनू लागलाय. त्यांची कॉपी अनेकांनी केली. मात्र खास चटणी, त्यांचे लोणी याची सिक्रेट रेसिपी मात्र अजूनही कोणाला माहीत नाही.
या दावनगिरी लोणी डोश्याची साथ दावनगिरीच्या बाहेर देखील पसरली. हुबळी, बेळगाव करत हा डोसा कोल्हापुरात आला. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या बाहेर सुरू झालेल्या दावनगिरी डोसा सेंटरमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी या लोणी डोशाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहचवलं.
आज दावनगिरीची ओळखच लोणी डोसा बनली आहे.
हे ही वाच भिडू.
- सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे हे नाव इंग्रजांमुळे नाही तर छत्रपतींमुळे मिळालं.
- उडपी या एका जिल्ह्यातून आलेल्या अण्णा लोकांनी भारतभर हॉटेल्सची साखळी तयार केली
- दक्षिणेतल्या सांबरचा शोध संभाजी महाराजांमुळे लागला.
- पोर्तुगीज भारतात आले म्हणून आपल्या उपवासाची सोय झाली.