बाप विरुद्ध पोराच्या निवडणुकीत ट्विस्ट, प्रतापसिंह राणेंना लाइफटाईम कॅबिनेटचा दर्जा दिलाय

अवघे ४० आमदार आणि २ खासदार असलेल्या गोव्यात जेवढा ड्रामा चालू आहे तेवढा उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्यांना पण लाजवण्यासारखा आहे. ममतादीदी आणि केजरीवालांच्या एन्ट्री नंतर तर गोव्यात नुसता धिंगाणा माजलाय. रोज कोणीतरी एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये उडी मारतोय. फोडाफोडीच्या राजकारणानं गोव्यात कळस घातलाय. याचा सगळ्यात मोठा फायदा झालाय भाजपाला आणि सगळ्यात मोठा तोटा मात्र काँग्रेसला.

आताच्या घडीला काँग्रेसमध्ये फक्त दोन आमदार राहिलेत. दिगंबर कामत आणि प्रतापसिंह राणे हे दोन माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये आहेत.

यातही काँग्रेसचे दिग्गज नेता आणि सहा वेळचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप कोणतीच कसर ठेवत नाहीए. तरीही त्यांनी काँग्रेसचं तिकीट घेतलंय.प्रतापसिंग राणे हे आगामी विधानसभेची निवडणूक ही पोरियम मतदारसंघातून लढणार आहेत.आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी त्यांचेच चिरंजीव राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय.

‘वडिलांनी वयाच्या ८३ व्या वर्षी निवडणूक न लढता मुलाला पाठींबा द्यायला हवा होता. वडिलांचं वय झालं आहे आता त्यांनी तरुणांना संधी द्यायला हवी होती. त्यांनी तसं केलं नाही म्हणून मी हा निर्णय घेतोय’

असं राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटलंय. मात्र आता या लढतीत एक ट्विस्ट आलाय.

पोरानं असा रिटायरमेंट प्लॅन दिलाय कि त्याचे पप्पा रिटायरमेंटचा सिरिअसली विचार करू शकतेत असं सांगितलं जातंय. 

प्रमोद सावंत यांच्या सरकारनं प्रतापसिंह राणे यांना ‘लाइफटाईम कॅबिनेट’ चा दर्जा देण्याचं ठरवलंय.

म्हणजे त्यांना आजीवन कॅबिनेट मंत्र्यांचा स्टेटस आणि सुविधा भेटणार आहेत. राणे जिवंत असेपर्यंत राज्याच्या तिजोरीला कॅबिनेट मंत्र्याइतकेच पगार आणि भत्ते मिळणार आहेत. भाजपाच्या जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनाही अश्या प्रकारचा दर्जा देण्यात आलेला नाही.

 मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर याची घोषणा करताना सांगितले की, “आमच्या सरकारने ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे जी यांना त्यांच्या गोवा राज्यासाठी केलेल्या महान सेवेबद्दल आजीवन मंत्रिमंडळ दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा विधानसभेचे मुख्यमंत्री आणि सभापती म्हणून त्यांनी राज्यातील सर्वोच्च पदे भूषवली आहेत.”
सावंत पुढे म्हणाले, “ते गोव्यातील सर्व स्तरातील लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या विकासासाठी कार्य करत असताना मला त्यांच्या सतत मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. मी त्याचे अभिनंदन करतो आणि त्याच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.”

राज्याचे आरोग्य मंत्री असलेले राणे यांचे पुत्र विश्वजित यांनी ट्विटरवर प्रमोद सावंत यांचे आभार मानताना म्हटलंय की, “माझे वडील श्री प्रतापसिंह रावजी राणे यांना आजीवन कॅबिनेट दर्जा दिल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री @DrPramodPSawant आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा आभारी आहे.

 मुख्यमंत्री, सभापती आणि आमदार म्हणून त्यांनी केलेल्या 50 वर्षांच्या सार्वजनिक सेवेचा गौरव करण्याचा यापेक्षा मोठा मार्ग नाही”

श्री प्रतापसिंह राणे ८३ वर्षीय आमदार गेल्या ५० वर्षांपासून सक्रिय राजकारणात असून १९७२ पासून ते ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळं आता आजीवन मंत्र्यांचा दर्जा मिळाल्यानंतर प्रतापसिंह राणे आपल्या पोरासाठी सीट सोडतील कि त्याला फाइट देतील हे येणाऱ्या दिवसात कळेलच.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.