भगवान विष्णूंचं अस्तित्व असतं म्हणून शाळीग्राम दगडातून मुर्ती बनवायला विरोध होतोय

अयोध्येत राम मंदिर बनवण्याचं काम सुरू आहे. साधारण २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि मंदिरात दर्शन सुरू होईल असा अंदाज आहे. त्यामुळे, मग मंदिरात मुर्ती कोणत्या स्वरुपाची असावी या विषयीच्या चर्चा आणि अभ्यास झाल्यानंतर तो शोध नेपाळमधल्या गंडकी नदीतल्या शिळाग्राम या दगडापर्यंत जाऊन थांबला.

त्यानंतर ते दगड नेपाळवरून अयोध्येत आणले गेले. आणत असताना रस्त्यात ठिकठिकाणी या दगडांची पूजा होत होती. लोक स्वत:हून ही पूजा करत होते. आता हे दगड अयोध्येत पोहोचलेत.

हा झाला घटनेचा एक भाग. दुसरा आता सुरू होतोय. यात, शाळिग्रामपासून राम-सीतेची मुर्ती बनवण्यात येऊ नये असं मत व्यक्त केलं जातंय. हे मत  तपस्वी छावनीचे पीठाधीश्वर महंत परमहंस दास यांनी व्यक्त केलंय.

पण, हे असं मत का व्यक्त केलं जातंय आणि अशा मागण्यांनी जोर का धरलाय ते बघुया.

मुळात रामसीतेची मूर्ती तयार करण्यासाठी शाळीग्राम दगडच का निवडला असावा ?

त्यामागे असणारं धार्मिक महत्व पाहूया. हिंदू धर्मात अनेक दगड शुभ मानले जातात. त्यातलाच एक म्हणजे शाळीग्राम. नेपाळच्या गंडकी नदीमध्ये विशेष प्रकारचे शाळीग्राम आढळतात. या दगडावर चक्र, गदा असे चिन्ह दिसतात.

हिंदू धर्मानुसार, शाळीग्राम दगड भगवान विष्णूचे स्वरूप आहे.

त्यामागं सांगितली जाणारी पौराणिक कथा अशी कि, जालंदर नावाचा एक असुर होता ज्याची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे जालंदर देवांनाही अजिंक्य झाला होता. म्हणून वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव शक्य नाही हे देवांना कळलं. म्हणून श्रीविष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून, त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले. म्हणून वृंदेने देहत्याग केला आणि देहत्याग करताना श्रीविष्णूंना दगड म्हणजेच शाळिग्राम होण्याचा शाप दिला. विष्णूनेही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला.

पण वृंदेच्या पतिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला की, तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शालिग्रामाशी, म्हणजेच विष्णूशी, तुळशीचे लग्न लावले जाईल. म्हणून तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडाशी लावलं जातं. विष्णूंना शालिग्राम स्वरूप मानले जाते आणि पूजले जाते.

पण हा शाळीग्राम दगड नेपाळमध्येच कसं काय सापडतो?

धार्मिक मान्यतेनुसार, शिवपुराणात असं सांगितलंय कि, वृंदा शापातून मुक्त झाल्यावर भगवान विष्णूनेही वृंदा देवीला वरदान दिले की तू सदैव गंडकी नदीच्या रूपाने पृथ्वीवर वाहत राहशील. तुझे एक नाव नारायणी असेल. मी तुझ्या जलप्रवाहात शालिग्राम शिलेच्या रूपात निवास करीन. नदीमध्ये राहणारे असंख्य कीटक त्यांच्या तीक्ष्ण दातांनी माझ्यावर माझ्या चक्राचे चिन्ह बनवतील. या दगडांना माझे स्वरूप मानून यांची पूजा केली जाईल.

भगवान विष्णूने दिलेल्या या वरदानामुळे शाळीग्राम शिला गंडकी नदीमध्ये वास करते आणि म्हणूनच हा दगड कायमच गंडकी नदीतच मिळतो आणि या दगडावर किड्याच्या आकारासारख्या ज्या खुणा दिसतात त्या खुणा सुदर्शन चक्रासारख्या दिसतात. असे म्हटले जाते की, शालिग्रामचे ३३ प्रकार आहेत, त्यापैकी २४ प्रकार भगवान विष्णूच्या २४ अवतारांशी संबंधित आहेत अशी धार्मिक मान्यता आहे.

नेमकं हेच कारण आहे या दगडापासून मुर्ती बनवण्यास विरोध करण्यामागचं. अध्यात्मानुसार या दगडात भगवान विष्णू वास करतात. त्यामुळे, या दगडावर हातोडीने घाव केले जाऊ नयेत असं काही हिंदुत्ववादी लोकांचं मत आहे.

यातलेच एक आहेत महंत परमहंस दास. परमहंस दास यांनी म्हटलंय,

“शाळीग्राम दगडामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे. त्यामुळे, त्या दगडावर हातोडी चालणं हे चुकीचं आहे. असं झालंच तर मी अन्न-पाणी त्याग करेन.”

याशिवाय, हिंदू महासभेनंही या विषयावर शाळीग्रामपासून मुर्ती बनू नये असंच मत व्यक्त केलंय.

नेपाळच्या गंडक नदीतून काढलेल्या महाकाय शाळीग्राम दगडापासून रामलल्लाची मूर्ती बनवली तर मोठा विनाश होणार हे नक्की. मंदिरातील मूर्ती सोन्याची असावी की राम मंदिराची काळी मूर्ती. हे दगड पुन्हा गंडकी नदीत परत पाठवावेत. अशी मागणीही हिंदू महासभेनं केलीये.

दरम्यान, शाळीग्राम दगडापासून पहिल्यांदाच देवाची मुर्ती बनणार आहे असं नाहीये.

१३व्या शतकातल्या उडपी इथल्या कृष्णमठातली मुर्ती, ५०० वर्षांपुर्वीची वृंदावन इथल्या राधा रमण मंदिरातली मुर्ती मुर्ती, तिरुवनंतपुरम इथल्या श्री पद्मनाभ मंदिरातली मुर्ती, बद्रिनाथ मंदिरातली मुर्ती या मुर्त्या शाळीग्राम दगडापासून बनवलेल्या आहेत. अगदी आपल्या महाराष्ट्रात पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरातली रुक्मिणी मातेची मुर्तीसुद्धा या शाळिग्राम दगडापासूनच बनलेली असल्याचं बोललं जातं.

आता या सगळ्या प्रकरणाबाबत मुर्तीकार आणि मंदिराचं ट्रस्ट निर्णय घेईल असं वृत्त आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.