जाके बोल तेरे निझामको, “वऱ्हाड के लोगोंके घरसे कस्तुरी का सुगंध आता है”.
विदर्भातला शेतकरी इर्ष्या करु शकतो. ते देखील निझामाशी. अशक्य वाटतय. साहजिक आहे, आपल्यापुढे विदर्भाच अस्मानी आणि सुल्तानी मारा झेलणारा विदर्भ असच चित्र आहे. आणि ते दुर्देवानं खरं देखील आहे. पण काही दशकांपुर्वी अस नव्हतं. विदर्भ हा भारतात महत्वाचा भाग होता. दक्षिण आणि उत्तरेतील सलतन य़ांना जोडणारा तर दुवा होताच त्याच बरोबर प्रमुख व्यापारी मार्ग देखील इथून जायचे. तेव्हा वाशिम जिल्ह्यातलं कारंजा हे व्यापारमार्गातलं प्रमुख ठिकाण होतं. हि कथा त्याचं गावच्या एका व्यक्तीची.
खूप खूप वर्षापूर्वीची एक कथा सांगितली जाते.
वऱ्हाडात लाड कारंजा नावाचं एक गाव आहे. तिथे एकदा एक उत्तरेकडचा व्यापारी उंटावरून काही तरी सामान लादून निघाला होता. सात उंटांची ती वरात निघाली होती. सकाळी मोकळी व्हायला आलेली माणस त्यांच्याकडं उत्सुकतेन बघत होती. उनाड पोर उंटांच्या मागून धावत होती.तेवढ्यात एका म्हाताऱ्या शेतकऱ्यानं त्याला हटकलच.
“कोण गावसे हो? क्या लेके जा रहे हो?”
व्यापाऱ्यानं त्याला फक्त पाहिलं. शेतकऱ्याच्या अवताराकडं बघून त्याला काही उत्तर द्यावासं वाटलं नाही. तो चालतच राहिला. म्हातारा सुद्धा त्याच्या पाठोपाठ आला. एकदाची ही ब्याद टळावी म्हणून व्यापारी त्याला म्हणाला,
“उंटपर जो कुछ भी ही वो तुम्हारे काम का नही” .
म्हातारयाची उत्सुकता आणखीन बळावली. आपल्या कामाचं नाही म्हणजे असं काय आहे त्यात? त्यानं उंटाच्या कासर्याला हात घालून त्याला रोखलं. आता व्यापारी चिडला होता. तो बोलला,
“अरे चाचा काहे को तंग कर रहे हो. उंट पर हिमालय की कस्तुरी है. तुम्हारे इस मुफ्लीस वऱ्हाडमे किसीने देखी भी नही होगी. सिर्फ राजा महाराज इसको खरीद सकते है. शायद हैद्राबादका निझाम खरीदले.”
म्हातारं पण पेटलं, वऱ्हाडात कोणी बघितली नसेल म्हणजे काय? आजोबा बोलले,
“कितने को है तेरी कस्तुरी? मै लेता हुं.”
मारवाड्यान एक तोळ्याचा भाव सांगितला. पण म्हाताऱ्याला साती उंटावरची सगळीच्या सगळी कस्तुरी हवी होती.
व्यापाऱ्याला वाटलं बुढ्ढा पागल हो चुका है. त्यानं मुद्दामहून जास्त किंमत सांगितली. म्हाताऱ्यानं घरातून पोराला पैसे घेऊन बोलवून घेतलं. सोन्याची नाणी मोजून मारवाड्याच्या हातात दिली. बघणारे सगळे चाट पडले होते. म्हाताऱ्यानं व्यापाऱ्याला मागून येण्याचा इशारा केला.
कारंजा गावाच्या छोट्या गल्ल्यांमधून हि वरात निघाली. आता तर अख्खा गाव लोटला होता. म्हातारबुवांच्या वाड्याच बांधकाम सुरु होत. त्यांनी उंट तिथं थांबवले. सगळी कस्तुरी उतरवून घेतली. समोर भिंती बांधण्यासाठी माती कालवून चिखलाचा गारा बनवण्यात आला होता. आजोबा म्हणाले,
“अबे पोट्टेहो,बघत काय रायले ? ओता ती कस्तुरी गाऱ्यात .
अय बेपाऱ्या जाके बोल तेरे निझामको, वऱ्हाड के लोगोंके घरसे कस्तुरी का सुगंध आता है “
त्या शेतकऱ्याच नाव लेकुर संघई. कापसाच्या शेतातून कमवलेला पैसा आपल्या भागाच्या इज्जतीसाठी त्याने खर्च करून टाकला.
आज सुद्धा लाड कारंजाच्या त्या पडक्या गढीच्या भिंतीतून पाउस पडला की कस्तुरी दरवळते असं तिथले स्थानिक सांगतात. आणि सोबत ही कथा. आत्ता या कथेला संदर्भ कोणता विचारू नका संदर्भ आहे तो फक्त कस्तुरीच्या वासांचा आणि परंपरेन सांगितल्या जाणाऱ्या या कथेचा.
हे ही वाच भिडू-
- महाराष्ट्रातील भारतमातेचं एकमेव मंदिर !
- गोवारी समाजाच्या आरक्षणासाठीच्या संघर्षपूर्ण लढ्याचा प्रवास !
- नेमकं कशासाठी, शरद जोशींनी देशातील एकमेव सीतेच्या मंदिराच्या जिर्णोद्वाराची जबाबदारी घेतली होती.
- राजा हरिश्चंद्र आणि महाराष्ट्राचं काय होतं नातं ? वाचा हरिश्चंद्र गडाची कहाणी.