किर्तनामुळे कैलास जीवन घराघरात पोहचलं : भन्नाट मार्केटिंग स्ट्रॅटेजी

कैलास जीवन कुठे आणि किर्तन कुठे, एकमेकांचा एकमेकांशी काहीतरी संबंध असणं शक्य आहे का. बोलभिडू वाले कधीकधी उगी आभाळ फेकतात.

साहजिक आहे म्हणा, आमच्याकडे देखील कधीकधी अशी माहिती येते की खुद्द आम्हालाच लक्षात येत नाही की यावर विश्वास ठेवायचा का नाही.

तर अशीच एक माहिती म्हणजे,

किर्तन आणि कैलास जीवनचं नातं.

ही गोष्ट सुरु होते विसाव्या शतकाच्या सुरवातीला. पुण्यात वासुदेव कोल्हटकर नावाचे एक इसम रहात असतं. त्यांना किर्तनाचं प्रचंड वेड. या वेडापायी ते सांगलीतून संस्कृत शिक्षण घेवून आले होते. १९२३-२४ च्या दरम्यान ते पुण्यात स्थायिक झाले. मात्र या  व्यक्तीला अजून एक नाद होता. तो म्हणजे आयुर्वेदाचा. फावल्या वेळात औषधं तयार करणे आणि किर्तन देणे ही दोन कामे ते निष्ठेने करत असत.

झालं अस की त्यांना वेगवेगळी औषधे तयार करण्याचा छंद होता. याच छंदातून त्यांनी आयुर्वेदातील शतघौतघृत अर्थात शंभर वेळा फेटलेले तूप. फरक फक्त इतकाच असायचा की या तूपातून इतका उग्र वास यायचा की असा लोक त्याचा वापर शून्य करायचे. काय करता येईल याचा विचार करता करता त्यांनी ठरवलं की आपण तूपाऐवजी खोबरेल तेल वापरू. पाहूया गुण आला तर आला.

आश्चर्य झालं. त्यासाठी त्यांनी इतर सामग्री देखील वापरली. तयार झालेल्या या नव्या औषधाला त्यांनी नाव दिलं, कैलास लोणी.

कैलास लोणी नावाचा पदार्थ माणसं विकत घेतील याची शक्यता कमी होती. यासाठी वेगळं अस ब्रॅण्डनेम आवश्यक होतं म्हणून याचं नाव कैलास जीवन करण्यात आलं.

मात्र मुख्य प्रश्न होता हे विकायचं कोठ?

वास्तविक त्याचा प्रश्न किर्तनाने कधीच सुटलेला. किर्तनाच्या मध्यंतरात ते नेहमीच औषधे विकत असत. कैलास जीवन वासुदेव कोल्हटकरांनी किर्तनाच्या मध्यंतरामध्ये विकण्यास सुरवात केली.

कापलं, भाजलं तर कैलास जीवन. थंडीमुळे पाय, ओठ फाटले तरी कैलास जीवन, उन्हाळ्यात सन स्क्रिम म्हणूनही कैलास जीवन. पाहता पाहता कैलास जीवन पेठांमध्ये रुळले. पुण्याच्या पेठांमध्ये किर्तन करत असताना कैलास जीवन प्रत्येकाच्या घराघरात पोहचले.

किर्तनामुळे कैलास जीवन प्रसिद्धीस आले मात्र तरिही तो साधाच ब्रॅण्ड होता.

१९५० नंतरच्या काळात कैलास जीवन हा उद्योग सुरु झाला होता. जे लोक समोर असायचे त्यांनाच ही कैलास जीवन विकत घेता येत असे. मात्र दिवसांमागून दिवस जावू लागले. पुण्यातल्या लोकांना किर्तनकार वासुदेव कोल्हटकरांचे कैलास जीवन आवडू लागले. याच कालावधीत वासुदेव कोल्हटकरांची मुले मोठी झाली. एक मुलगा औषधनिर्माण शिकला. दूसऱ्यांनी देखील वैद्यकशास्त्रातलं शिक्षण घेतलं. व त्यांनीच मिळून पुण्यात,

आयुर्वेद संशोधनालय पुणे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली.

या कंपनीच मुख्य उत्पादन होतं कैलास जीवन. राम कोल्हटकर व त्यांच्या भावाबहिणींनी मिळून ही कंपनी नावलौकिकाला आणली. कैलास जीवनच्या जाहिराती चालू झाल्या पाहता पाहता कैलास जीवन भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचलं. पण हा प्रवास सुरू झाला तो किर्तनामुळे. त्यामुळेच कैलास जीवनच्या या प्रवासासाठी किर्तनाचे आभार नक्कीच मानायला हवेत.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.