भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीच्या निर्मात्याला आत्महत्या करावी लागली होती.

१९ जून १९८१. दुपारची वेळ. कलकत्ता येथील सदर्न अव्हेन्यू मधील एका बिल्डींग.  तिथल्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये फॅनला लटकणारा एक ५० वर्षाच्या व्यक्तीचा देह सापडला. जवळच चिठ्ठी लिहून ठेवलेली होती,

“I can’t wait everyday for a heart attack to kill me.”

हे दुसरे कोणी नव्हते तर भारतातील पहिले टेस्ट ट्यूब बेबीचे निर्माते डॉ. सुभाष मुखोपाध्याय होते. त्यांच्यावर ही वेळ का आली ही एक मोठी शोकांतिका आहे.

डॉ.सुभाष मुखोपाध्याय यांचा जन्म एका बंगाली भद्र परिवारात झाला. त्यांचे वडील देखील डॉक्टर होते. झारखंडच्या हजारीबाग येथे त्यांचा दवाखाना होता.

स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ. इंग्रजांनी आणलेला पाश्चात्य आधुनिक उपचार फक्त श्रीमंत लोकांपुरता मर्यादित होता. पण सुभाष मुखोपाध्याय यांच्या वडिलांप्रमाणे काहीच डॉक्टर होते जे ग्रामीण भागात जाऊन रुग्णांना उपचार मिळावे यासाठी धडपडत होते.

अशा निस्पृह देवमाणसाच्या घरी जन्मलेल्या सुभाष मुखोपाध्याय याने वडिलांचा वारसा पुढे चालवायचं ठरवलं. तो लहानपणापासून हुशार होता. १९४९ साली कलकत्ता विद्यापीठातून फिजिओलॉजीमध्ये बीएस्सीची डिग्री पूर्ण केली. याच विद्यापीठातून एमबीबीएसच शिक्षण घेतलं.

१९५८ साली त्यांना कलकत्ता विद्यापीठातून व १९६७ साली स्कॉटलंडच्या एडिनबर्ग विद्यापीठातून रिप्रोडक्टिव्ह एन्डोलॉजी या विषयात डॉक्टरेट मिळाली.

कलकत्त्याच्या सुप्रसिद्ध एनआरएस मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओलॉजी विषयाचे प्रोफेसर म्हणून काम करू लागले. याच काळात त्यांची डॉ सुनीत मुखर्जी व डॉ. सरोज कांति भट्टाचार्य या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांशी ओळख झाली. यांच्या बरोबर स्त्रियांच्या गर्भधारणेविषयीच्या प्रश्नांवर त्यांनी संशोधन सुरु केलं.

सत्तरचं दशक साधारण याच काळात कृत्रिम गर्भधारणेच्या शक्यते विषयी जगभरात चर्चा सुरु झाली होती. अनेक संशोधक याच्या मागे रिसर्च करत होते. मात्र अजूनही कोणाला यात यश आलेल नव्हत.

विशेषतः भारतात ज्या स्त्रियांना मुल नाही त्यांना वांझपणाचा शिक्का घेऊन समाजात वावरावं लागत होत.

अडाणी व अशिक्षित समाजात याच प्रमाण जास्त होत अस नाही तर अनेक उच्चशिक्षित कुटुंबात ही अशा घटना सर्रास पाहायला मिळत होत्या. अनेक दाम्पत्य उपास तापास, नवस, बुवाबाजी या मध्ये अडकलेले होते.

अशातीलच एक कलकत्त्याचे अग्रवाल पतिपत्नी एकदा डॉ.सुभाष मुखोपध्याय यांच्या संपर्कात आले.

धनाढ्य मारवाडी कुटुंबातील असणाऱ्या अग्रवाल यांचे आजवरचे सर्व उपाय थकले होते. देवाच्या हातून सुद्धा जे शक्य नाही ते डॉक्टरच्या दारात तरी होईल या आशेने ते सुभाष मुखोपाध्याय यांना भेटले.

त्यांनी त्याना टेस्ट ट्यूब बेबी साठी प्रयत्न करण्यासाठी सुचवलं.

भारतात आजवर कधीही कोणी हा प्रयोग केला नव्हता. याच्या यशस्वीपणाची शक्यता अत्यंत कमी होती. तरीही अग्रवाल या कृत्रिम प्रत्यारोपणासाठी तयार झाले. कलकत्त्याच्या त्या साऊथ अवेन्यूच्या आपल्या राहत्या घरात मुखोपाध्याय यांनी हा प्रयोग सुरु केला.

अगदी याच काळात पॅट्रिक स्टेप्टो व रॉबर्ट एडवर्ड्स या ब्रिटीश डॉक्टरांनी लंडनमध्ये टेस्ट ट्यूब बेबीचे प्रयत्न यशस्वी ठरले.

२५ जुलै १९७८ रोजी लुईस ब्राऊन या जगातल्या पहिल्या टेस्टट्यूब बेबीचा जन्म झाला.

त्याच वेळी कलकत्त्याच्या त्या छोट्या फ्लॅटमध्ये काही छोटी यंत्रे व एक रेफ्रीजीरेटर यांच्या मदतीने सुभाष मुखोपाध्याय यांच्या निगराणीखाली पहिला भारतीय टेस्ट ट्यूब बेबी आकार घेत होता.

पॅट्रिक स्टेप्टो व रॉबर्ट एडवर्ड्स यांच्या टेस्ट बेबीच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यात ३ ऑक्टोबर १९८३ रोजी जगातल्या दुसऱ्या व भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला.त्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस होता. त्यामुळे या मुलीचं नाव ठेवलं

“दुर्गा”

दुर्गा जर ६७ दिवस आधी जन्मली असती तर जगातला पहिला टेस्ट ट्यूब बेबी भारतीय असता.

भारतासारख्या विकसनशील देशात जगात क्रांती करणाऱ्या तंत्रज्ञानाचा जन्म झाला होता पण कोणाला पत्ताच  नव्हता. सुभाष मुखोपाध्याय यांनी या टेस्ट ट्यूब बेबीच्या जन्माबद्दल तेव्हाच्या सरकारला अवगत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या कडे चक्क दुर्लक्ष करण्यात आले.

पश्चिम बंगालमध्ये तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते तर केंद्रात जनता पक्षाचे. समाजवादी विचारसरणीच्या या सरकारामध्ये नोकरशाहीच्या लालफितीचा बोलबाला होता. जुनाट विचारांच्या अधिकाऱ्यांनी सुभाष मुखोपाध्याय  यांच्या या कार्याची माहिती जगापुढे येऊ दिली नाही.

मुखोपाध्याय यांच्या टेस्ट ट्यूब बेबीच्या दाव्याची चौकशी करण्यासाठी प.बंगाल सरकारने एक चार सदस्यीय कमिटीची नेमणूक केली.

या समितीने चौकशी तर केली नाहीच वर मुखोपाध्याय यांना मुर्खात काढले. हा प्रयोग त्यांनी करणे शक्यच नाही असा दावा समितीने केला.

जेव्हा मुखोपाध्याय यांनी स्वतःहून बाहेरच्या विद्यापीठांशी संपर्क केला व जपान मध्ये त्यांना त्यांचा पेपर सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले तेव्हा भारतीय सरकारने त्यांना व्हिसा देण्यास इन्कार केला. उलट त्यांची बदली रिजनल इंस्टीट्यूट ऑफ ऑफ्थॉल्मोलॉजी येथे केली.

एकीकडे जगात असे क्रांतिकारी शोध लावणाऱ्या संशोधकांना अनेक मानसन्मान बक्षिसे देण्यात येतात. पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचे जनक म्हणून पॅट्रिक स्टेप्टो यांना नोबेल देण्यात आला आणि याच्या उलट त्यांच्या इतकच कष्ट घेतलेल्या, कर्तुत्व असणाऱ्या भारताच्या सुभाष मुखोपाध्याय यांना अपमानाच्या व उपहासाच्या नैराश्यात बुडून जावे लागले.

याच नैराश्यातून मुखोपाध्याय यांनी आत्महत्या केली.

पुढे काही वर्षांनी टी.सी.आनंदकुमार नावाच्या व्यक्तीने १९८६ साली भारतात टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्यांची मात्र अंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. पण आनंदकुमार यांनाच अभ्यास करताना लक्षात आले की आपल्यापूर्वी सुभाष मुखोपाध्याय यांनी हा प्रयोग यशस्वी केला होता.

त्यांच्या प्रयत्नांमुळे सगळ्या जगाला मुखोपाध्याय यांची ओळख झाली. आनंद कुमार यांनी आपल्या संशोधन लबोरेट्रीला सुभाष मुखोपाध्याय यांचे नाव दिले.

यांच्या जीवनावर आधारित डॉक्टर की मौत नावाचा सिनेमा देखील बनवण्यात आला.

आज आयव्हीएफ किंवा कृत्रिम गर्भधारणेने मूल जन्माला घालण्याचे प्रमाण जगातच नव्हे तर भारतातही वाढले आहे. आज हे मानवजातीला मिळालेले वरदान म्हणून ओळखले जाते.

भारताच्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी दुर्गा उर्फ कनूप्रिया अग्रवाल सध्या पुण्यात राहतात व त्या आता ४२ वर्षांच्या आहेत. त्यांच्या रूपाने सुभाष मुखोपाध्याय व इतर संशोधकानी घेतलेल्या प्रयत्नांना आजही करोडो मातांचे आशीर्वाद लाभत असतील हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.