गांधीजींच्या आधी नोटेवर सुभाषचंद्र बोसांचा फोटो झळकला होता….

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाचे क्रांतिकारक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेनेची स्थापना करून सुभाषचंद्र बोसांनी इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकले. आझाद हिंद सेनेचं नेतृत्व त्यांनी स्वतः केलं आणि इंग्रज सत्तेला आव्हान दिलं. ज्या ज्या वेळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख केला जाईल त्या त्या वेळी आझाद हिंद सेनेचं नाव कायम वरच्या रांगेत असतं.

आज आपण तो किस्सा बघणार आहोत ज्यावेळी नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो होता. या नोटा केव्हा छापल्या गेल्या आणि का छापल्या गेल्या, पण नंतर त्या बंद सुद्धा करण्यात आल्या. त्याबद्दल आपण आज जाणून घेऊया.

हि गोष्ट आहे १९४१ सालची. ज्यावेळी सुभाषचंद्र बोसांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडलं होतं, आणि सुभाषचंद्र बोसांच्या या त्रासाला वैतागून इंग्रजांनी त्यांना जेरबंद करण्याचं फर्मान काढलं. पण इंग्रजांच्या तावडीतून वाचण्यासाठी सुभाषबाबू परदेशात निघून गेले. १९४२ साली मोहन सिंह यांनी आझाद हिंद सेनेला एकत्रित आणलं. १९४३ साली सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं.

यानंतर २१ ऑक्टोबर १९४३ साली सिंगापूर मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अस्थायी सरकार बनवण्याची घोषणा केली. हे सरकार होतं आझाद हिंद सेनेचं. याचं सगळं नेतृत्व आणि मुख्य प्रतिनिधी म्हणून सुभाष बाबू स्वतः आघाडीवर राहिले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हे सरकार बनवलं कारण इंग्रज राजवटी मध्ये राहणं त्यांना मान्य नव्हतं. इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी हे नवीन सरकार तयार केलं होतं. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळात जापान आणि आणि ब्रिटन एकमेकांचे कट्टर दुष्मन होते. त्यावेळी नेताजींनी जपानकडून मदत मागण्याचा मार्ग निवडला.

या दरम्यान नेताजींनी एका प्रांताचा प्रतिनिधी म्हणून जपानकडे मदत मागताना सांगितलं कि मी माझ्या देशाचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे आलोय, इंग्रज राजवटीमध्ये लोकांवर अन्याय होत आहे, इंग्रजांनी बळजबरीने त्यांचं सरकार वसवलं आहे. त्यामुळे इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी तुम्ही आमची मदत करावी. त्यावेळी नेताजींनी बनवलेल्या आझाद हिंद सरकारला जर्मनी, जपान, फिलिपाइन्स, कोरिया, चीन, इटली, आयर्लंड अशा देशांनी पाठिंबा दर्शवला. 

जर्मनी, जपान, इटली, चीन अशा देशांनी पाठिंबा दिल्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरुद्धचा लढा आणखी आक्रमक केला. याकाळात लोकांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांना भरघोस पाठिंबा दिला. भारतीयांनी जास्त क्षमतेने आझाद हिंद सेनेसाठी आर्थिक मदत केली. भरपूर पैसे जमा झालेले त्यामुळे आर्थिक व्यवस्था बघण्यासाठी १९४४ साली आझाद हिंद बँक स्थापन करण्यात आली. रंगून प्रांतात हि बँक उभारण्यात आली.

आझाद हिंद बँकेची स्थापना केल्यानंतर सरकार चॅनलवण्यासाठी पैशांची गरज भासू लागली तेव्हा त्यांनी आझाद हिंद बँकेच्या अंतर्गत चलन सुरु केलं.

ज्या ज्या देशांनी आझाद हिंद सरकारला सपोर्ट केला त्या देशांनी सुद्धा या चलनाला, करन्सीला मान्यता दिली.

या दरम्यान आझाद हिंद बँकेने ५, १०, १००, १५०, १०००, ५००० आणि १ लाख रुपयांच्या नोटा छापल्या.

१९४७ साली भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तेव्हा देशांत नवीन संविधान तयार करण्यात आलं. या दरम्यान स्वातंत्र्य झालेल्या भारतात सुभाषचंद्र बोस यांनी सुरु केलेल्या नोटा बंद करण्यात आल्या. १९५० साली जेव्हा संविधान लागू करण्यात आलं तेव्हा आझाद हिंद बँकेच्या नोटा कायमच्या बॅन करण्यात आल्या.  

या नंतर बऱ्याच वर्षांनी पश्चिम बंगालचे गृहस्थ पृथ्वीश दासगुप्ता यांनी वित्त मंत्रालय आणि RBI ला पत्र लिहिलं कि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो सध्याच्या भारतीय नोटांवरही छापला जावा. याकडून उत्तर न मिळाल्यावर त्यांनी RBI विरुद्ध कोर्टात केस केली. याला प्रत्युत्तर म्हणून २०१० साली RBI च्या एका पॅनलने उत्तर दिलं कि,

महात्मा गांधी या व्यक्तिमत्त्वा व्यतिरिक्त दुसरी कोणतीही व्यक्ती नाही जी भारतीय नोटांना परिपूर्ण ठरवेल.

पण एक काळ असा होता कि महात्मा गांधींच्या आधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो होता आणि सगळ्यात मोठी किंमत त्या नोटांना होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.