आझाद हिंद सेना उभी राहण्यामागे सावरकरांची प्रेरणा होती !

तीसच्या दशकातला उत्तरार्ध. भारतात होत असलेली मोठमोठी आंदोलने यामुळे इंग्रज सरकारला भारतात राज्य करणे अवघड जात होतं. म्हणूनच गोलमेज परिषदा बोलवल्या, नेत्यांशी चर्चा केली. भारतात वाढत चाललेल्या असंतोषाला वाट करून देण्याची गरज होती. अखेर ब्रिटीश संसदेने १९३५सालचा गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट पास केला. यामुळे भारतात प्रांतांना स्वायत्तता मिळणार होती. तिथे निवडणुका होऊन लोकांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळणार होता.

१९३७ साली निवडणुका झाल्या. मुख्य लढत पंडीत जवाहरलाल नेहरू अध्यक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि मोहम्मद अली जिना यांच्या मुस्लीम लीग मध्ये झाली. सावरकरांचे विचार मानणारी हिंदू महासभा देखील निवडणुकीत उतरली होती. नजर कैदेत असलेल्या सावरकरांना राजकारणात येण्याची बंदी असल्या मुळे हिंदू महासभेचे नेतृत्व शामाप्रसाद मुखर्जी करत होते.

पंजाब, सिंध प्रांत सोडला तर देशभर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले . मुस्लीमबहुल मतदारसंघात मुस्लीमलीगला आलेले अपयश डोळ्यात भरण्यासारखे होते. हिंदूमहासभेला ही विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. बंगाल सिंध येथे उमेदवार निवडणून आले होते. त्यांनी तिथल्या प्रादेशिक मुस्लीम पक्षांशी युती केली. सिंध मध्ये तर मुस्लीम लीगबरोबर आघाडी करून ते सत्ता स्थानी गेले.

प्रांतिक सरकारे सत्तेत आली, तोवर सावरकरांवरची बंदी उठवण्यात आली होती. युरोपमध्ये तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचे सावट उभे राहिले होते. इंग्लंड फ्रांस विरुद्ध हिटलरची इटली यांच्यातील टेन्शनने टोक गाठले होते. हिटलर युद्धास तोंड फोडणार हे नक्की होते. इंग्रज सरकारची इच्छा होती की भारतीय सैन्याने इंग्लंडच्या बाजूने महायुद्धात भाग घ्यावा. याला कॉंग्रेसचा पूर्ण विरोध होता. कॉंग्रेस सरकारने याविरुद्ध राजीनामे दिले.

फक्त सावरकरच असे होते जे भारतात तरुणांना आवाहन करत होते की ब्रिटीश आर्मी जॉईन करा. १९३८ साली मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात सावरकरांनी आपली भूमिका मांडली होती,

“राष्ट्रास आज साहित्यिक नकोत, सैनिक हवेत! तरुणहो, आमच्या दुर्बल पिढीच्या देखोदेखी सुनीते नि कादंबऱ्या लिहिण्याकरिता लेखण्या सरसावू नका. राष्ट्रसंरक्षणासाठी लेखण्या मोडा आणि हाती बंदुका घ्या.”

हाच काळ जेव्हा कॉंग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस बाहेर येत होती. तेव्हा अध्यक्ष असलेल्या सुभाष बाबू आणि गांधीजी यांच्या वादाने टोक गाठले. सुभाषचन्द्र बोस यांचे जहाल क्रांतिकारी विचार गांधी गटाच्या नेत्यांना पटत नव्हते. अखेर कंटाळून सुभाषबाबूंनी कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. कॉंग्रेस अंतर्गतचं स्वतःच्या फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या पक्षाची स्थापना केली.

फॉरवर्ड ब्लॉकचे पहिले अधिवेशन २० जून ते २२ जून १९४० मध्ये नागपूर येथे भरवण्यात आले.  कलकत्त्यामध्ये झालेल्या ब्लॅकहोल ट्रॅजेडीशी संबंधित हॉलवेल या अधिकाऱ्याचा पुतळा हटवावा म्हणून आंदोलन करायचं सुभाष बाबुनी ठरवलं.

या अधिवेशनानंतर सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या पक्षाच्या भूमिकेच्या पाठींब्यासाठी कॉंग्रेसेतर मोठमोठ्या नेत्यांची भेट घेण्यास प्रारंभ केला. यात पहिली भेट मोहम्मद अली जिना यांची घेतली. जिनांनी सुभाषबाबूंचे ऐकून घेतले पण त्यांना मी मुसलमानांचा नेता आहे, तुम्हाला मी कोणतीही मदत करू शकत नाही असे सांगितले. जिनांनी त्यांना सावरकरांची भेट घ्या असे सुचवले.

२६ जून १९४० रोजी दादर इथल्या सावरकर सदन इथे सुभाषचंद्र बोस आले आणि त्यांनी सावरकरांची भेट घेतली. बंद खोली आड झालेल्या या चर्चेचे तपशील बाहेर आले नाहीत.

काहीच दिवसात म्हणजे २ जुलै ला सुभाषबाबूंची अटक झाली आणि त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले. साधारण जानेवारी महिन्यात सुभाषचंद्र बोस या नजर कैदेतून फरार झाले आणि अफगाणिस्तान जर्मनी मार्गे जपानला पोहचले. त्यानंतरचा आझाद हिंद सेनेचा इतिहास आपल्याला ठाऊकचं आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सावरकरांनी १९५२ साली पुण्यात आपल्या अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेच्या कार्यपूर्ती विसर्जनाचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना सावरकरांनी आपल्या व सुभाषचंद्र बोस यांच्या भेटीचे तपशील उघड केले. 

सावरकरांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी सुभाष बाबू हॉलवेलच्या पुतळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आले होते. पण सावरकरांनी त्यांना या छोट्या विषयात गुंतून पडण्यापेक्षा मोठी जबाबदारी उचलण्याविषयी सुचवले. सुभाषचंद्र बोस यांना काही कळेना. तेव्हा सावरकरांनी त्यांना रासबिहारी बोस यांची चिठ्ठी दाखवली.

रासबिहारी बोस हे दुसऱ्या महायुद्धात शत्रू राष्ट्रांच्या हातात सापडलेल्या युद्धबंदिना एकत्र करून त्यांच्यामधून एका लष्करी संघटनेची बांधणी करण्यात गुंतलेले होते. काही दिवसात जपानही या युद्धात इंग्लंड विरुद्ध उतरेल अशी शक्यता आहे असेही त्यांच मत होतं.

तर सुभाषबाबूनी या संघटनेने नेतृत्व हाती घ्याव आणि जर्मनी, जपान या इंग्रजविरोधी देशांची मदत घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून द्याव असा सल्ला आपण त्यांना दिला होता असे सावरकरांनी सांगितले. याचाच अर्थ आझाद हिंद सेना उभी राहण्यामध्ये सावरकरांची प्रेरणा होती असे म्हणता येईल. 

सुभाषचंद्र बोस यांनी १९४४ साली आझाद हिंद रेडियो वरून देशाला संबोधित करताना सावरकर यांनी तरुणांना लष्करात जाण्याचे आवाहन केले होते त्याबद्दल धन्यवाद मानले होते. ब्रिटीशांच्या विरोधात फासावर गेलेले मदनलाल धिंग्रा किंवा अनंत कान्हेरे असे अनेक क्रांतिकारक घडण्यामागेही सावरकरांचे प्रोत्साहन होतेच.

बीबीसी या वृत्तवाहीनीनुसार थोर समाजवादी विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी सुद्धा, सावरकर, सुभाषबाबूंसहित अनेक क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान होतं असं म्हटलंय. अशाच अर्थाचा संदर्भ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे – चळवळीचे मूळ संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या चरित्रात, त्यांनी कन्या कॉम्रेड रोझा डांगे यांनी सुद्धा दिला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.