एका व्यक्तीचे तीन पीए.. दोघे मुख्यमंत्री झाले आणि एकजण पंतप्रधान झाला..
आजकाल राजकारणात स्वामींचा सुळसुळाट झाला आहे. अनेकजण पॉलिटिक्सच्या कुरघोडीमध्ये आपलं कर्मयोग विसरून जातात.
पण एक स्वामी असेही होते ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मराठवाडा निजामाच्या जोखडातून सोडवला, महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते बनले. पण तरीही सत्तेच्या खुर्ची पासून स्वतःला दूर ठेवलं आणि त्यागाचं व्रत जपलं.
स्वामी रामानंद तीर्थ
मूळ नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर. जन्म कर्नाटकातील सिंदगी जिल्हा विजापूर
स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीचा काळ. ब्रिटिशांचा जोखड भारतावर घट्ट झाला होता वर आंध्रभाषिक तेलंगणा व मराठीभाषिक मराठवाड्याचा भाग हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. हे देशातील सर्वात मोठे संस्थान होते. निजाम मीर अली हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जायचा.
पण या श्रीमंत राजाची प्रजा मात्र पिचलेली होती. एकवेळ ब्रिटिश परवडले पण हा निजाम नको असे लोकांना वाटत होते.
आधीच दुष्काळाचं अस्मानी संकट आणि त्यात निजामाची सुलतानी तलवार यामुळे मराठवाडा अतिमागास बनला होता.
परभणी जिल्ह्यातील परतूर येथे १ जून १९३७ रोजी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन पार पडले. हैदराबादमधील जनता शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात स्वामीजींनी मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीवर घणाघाती टीका केली.
या भाषणावेळी त्यांचे नेतृत्वगुण लक्षात आल्यामुळे सर्व सहकाऱ्यांनी स्वामीजींना हैदराबाद संस्थानातील असंतुष्टांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. त्याच सुमारास स्वामीजींनी आपल्या असंख्य अनुयायांसह आंबेजोगाई सोडून हैदराबादला प्रयाण केले.
‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’
स्वामी रामानंदांनी ९ जून १९३८ पासून हैदराबाद शहरात कायमचे वास्तव्य केले.
हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना होऊन स्वामीजींना त्याचे नेतृत्व देण्यात आले. स्वामीजींच्या क्रांतिकारकी चळवळी मुळे काँग्रेस हैद्राबाद मराठवाड्याच्या तळागाळात जाऊन पोहचली. गोविंदभाई श्रॉफ, आ. कृ. वाघमारे, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू , रवीनारायण रेड्डी या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मदतीने स्वामींनी निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आंदोलन छेडले.
याच कार्यकर्त्यांमध्ये एक नाव होतं शंकरराव भाऊराव पाटील. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील मशीद रांजणगाव गावचे. तुटपुंज्या शेतीमुळे पोट भरत नसल्यामुळे हे कुटुंब पैठण येथे आले. शंकरराव चव्हाण यांचं शिक्षण हैद्राबाद येथेच झालं. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी एलएलबीची डिग्री चांगल्या मार्कानी पूर्ण केली.
याकाळात त्यांचा संपर्क स्वामी रामानंद तीर्थ यांच्याशी आला. स्वामी तेव्हा इंग्रजीत पत्रव्यव्हार करू शकतील अशा कार्यकर्त्यांच्या शोधात होते.
त्याकाळचे हैद्राबाद संस्थान हा प्रचंड पसरलेला प्रदेश होता. यात तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मराठवाड्याचा भाग येत होता. या सर्व प्रांतात निजामशाहीच्या विरुद्ध असंतोष पसरला होता. हैद्राबाद स्टेट काँग्रेसला या संस्थानच्या कानाकोपऱ्यात पोहचून आपली लढाई तीव्र करायची होती. यासाठीच स्वामीजींचा पत्रव्यवहार व इतर गोष्टींसाठी स्टेट काँग्रेस पूर्ण वेळ कार्यकर्ते नेमत असे.
इंग्रजी, उर्दू, मराठी या तिन्ही भाषांमध्ये पारंगत असणाऱ्या शंकरराव चव्हाण यांना स्वामी रामानंद तीर्थ यांनी आपला स्वीय सहायक म्हणून नेमलं. शंकरराव चव्हाण यांच्या सोबतच आणखी दोन जणांची नेमणूक स्वामीजींचा पत्रव्यव्हार सांभाळण्यासाठी केली होती. यातले तेलगू भाषेचा विभाग सांभाळणारे होते पी.व्ही.नरसिंह राव तर कन्नड भाषेचा विभाग सांभाळण्यासाठी वीरेंद्र पाटील यांची नेमणूक केली.
हे तिघेही भाषा पंडित होते. पी.व्ही.नरसिंह राव त्याकाळात एक मासिक चालवायचे. त्यांना तर सोळा भाषा यायच्या.
स्वामी रामानंद यांच्या तालमीत हे तिन्ही कार्यकर्ते राजकारणात तयार झाले.
ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिल्यावर तर हैद्राबाद संस्थानचा प्रश्न आणखी चिघळला. रझाकारांच्या अत्याचाराला परिसीमा उरली नाही. निजामाने तर थेट पाकिस्तानात विलीन करण्याचा निर्णय घेतला होता. कारावासात असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांनी आपला लढा तीव्र करण्याचे आदेश दिले.
हैद्राबाद मुक्तीसंग्रामच्या हजारो कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानी पराकाष्ठा केली. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार भारतीय सैन्य हैद्राबाद मध्ये घुसले आणि निजामाला गुडघे टेकायला लावण्यात आलं. स्वामी रामानंद तीर्थ यांची सुटका झाली.
स्वामींनी शंकरराव चव्हाण यांच्या सारख्या कार्यकर्त्यांना सांगितलं,
” लोकांसाठी समाजासाठी खरंच काही करायचं असेल तर राजकारणात जा. सत्तेत जाऊन लोकांच्या भल्याची कामे करा.”
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आदेशानुसार शंकरराव चव्हाण हे नांदेडला आले. इथेच स्थायिक झाले. नांदेड जिल्हा काँग्रेस मधून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. नांदेडचा नगराध्यक्ष ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ते देशाचा गृहमंत्री हा मोठा प्रवास त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आदर्शानुसार केला.
विशेष म्हणजे ते जेव्हा देशाचे गृहमंत्री होते तेव्हा पंतप्रधान होते पीव्ही. नरसिंह राव. दोघांची हैद्राबाद मुक्तिसंग्रामच्या काळात एकत्र काम केले असल्यामुळे जुनी मैत्री होती. पी.व्ही.नरसिंह राव देखील पंतप्रधान होण्यापूर्वी काही काळ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तर या दोघांचे तिसरे मित्र वीरेंद्र पाटील हे देखील दोन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री राहून गेले.
स्वामी रामानंद तीर्थ यांचे तीन सचिव मुख्यमंत्री होणे, देशाच्या पंतप्रधान गृहमंत्रीपदापर्यंत पोहचणे हा निव्वळ योगायोग नाही. तर रामानंद तीर्थ यांच्या कठोर शिस्तीचा, त्यांच्या शिकवणुकीचा आणि गांधीवादी विचासरणीचा, सगळ्यात महत्वाचं हैद्राबाद मुक्तिसंग्रामच्या संघर्षाचा यात सर्वात मोठा वाटा आहे.
हे ही वाच भिडू.
- बॉम्ब बनवणारा शाळा मास्तर बीडचा पहिला खासदार बनला
- एका संन्याशाच्या जिद्दीने मराठवाड्यातली निजामशाही उखडून फेकली
- …आणि ‘हैद्राबाद संस्थान’ बिनशर्तपणे भारतीय सैन्याला शरण आले !