ताराराणींच्या पराक्रमामुळे औरंगजेबाची कबर मराठी मातीत खोदली गेली.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या शिवरायांचा १६८० साली मृत्यू झाला. या बातमीने खुश झालेला अख्ख्या हिंदुस्तानाचा आलमगिर बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता.
शिवरायांच्या पाठोपाठ संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही. मुघलांच्याबरोबरच पोर्तुगीज, सिद्दी अशा अनेक शत्रूंचा सामना केला.
पण दुर्दैवाने दगाफटका करून औरंगजेबाने शंभुराजांना पकडले व हालहाल करून मारले, त्यांच्या मुलाला आपल्या कैदेत टाकलं.
औरंगजेबाला वाटलं की आता मराठेशाही संपली. पण तसं झालं नाही, धाकट्या राजाराम महाराजांना छत्रपती बनवून मराठ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला.
राजाराम महाराजांनी शिवरायांनी दूरदृष्टीने खोल दक्षिणेत उभारलेल्या ठाण्याचा म्हणजेच जिंजीचा सहारा घेतला.
मुघलांनी तिथेही धडक दिली पण संताजी धनाजी सारख्या शूरवीर सरदारांनी स्वराज्याची मशाल विझू दिली नाही.
३ मार्च १७०० रोजी राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. औरंगजेबाला वाटलं की आता तरी मराठ्यांचा अंतिम निकाल लागला.
पण औरंगजेबाचे हे दिवास्वप्न खोटे ठरले. कारण होत्या,
भद्रकाली महाराणी ताराराणी बाईसाहेब.
कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजाराम छत्रपतींची पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या.
त्यांचा जन्म १६७५ साली झाला. सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी आपल्या या मुलीला युद्धकलेचे देखील शिक्षण दिले होते.
जेव्हा शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती पदाच्या साठी वाद होण्याची चिन्हे दिसू लागली तेव्हा हंबीररावांनी आपले सख्खे भाचे व भावी जावई असलेल्या राजाराम महाराजांच्या ऐवजी संभाजी महाराजांची निवड केली आणि आपल्या न्यायवृत्तीचे दर्शन घडवले.
हाच न्यायाचा आदर्श ताराबाई राणीसाहेबांनी आयुष्य भर सांभाळला.
ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.
छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर त्या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. सन १६९४ साली त्या जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला. १७०० साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला.
त्यानंतर ताराबाई राणीसाहेबांची कारकीर्द सुरू झाली. तेव्हा त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या.
स्वराज्याचे युवराज शाहू महाराज कैदेत होते. औरंगजेबाच्या आक्रमणामुळे दक्षिणेत सर्व घडी विस्कटलेली होती. मुघल सैन्याचा धुमाकूळ चालला होता. शिवरायांचे सगळे किल्ले त्यांच्या ताब्यात होते. मराठ्यांची गादी वारसा विना मोकळी होती.
ताराबाईसाहेबांनी वयाने लहान असलेल्या आपल्या मुलाला म्हणजेच दुसऱ्या शिवाजींचा विशाळगड येथे राज्याभिषेक केला व त्यांच्या नावाने कारभार पाहू लागल्या.
सरसेनापती हंबीरराव मोहितेंची मुलगी असल्यामुळे त्यांना राज्यकारभाराबरोबर युद्धकलेमध्ये देखील त्या पारंगत होत्या.
शिवशंभूच स्मरण कायम मनात ठेवून त्यांनी मुघलांशी लढा तीव्र केला.
धनाजी जाधव त्यांचे सेनापती होते, तसेच उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, बाळाजी विश्वनाथ आदी मात्तबर सेनानीना त्यांनी एकत्र आणले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गनिमी काव्याच्या पद्धतीचा वापर करून मुघलांना नामोहरम करण्यास सुरुवात केली.
मुत्सद्दीपणे कधी बोलणी करून कधी तलवारीच्या बळावर त्या एक एक किल्ले परत जिंकू लागल्या.
ताराबाई राणी साहेब स्वतः घोडेस्वारीमध्ये पारंगत होत्या. एकाच ठिकाणी फार काळ मुक्काम करायचा नाही हे सूत्र पाळले.
गडागडांवर जाऊन त्या जातीने पाहणी करीत. सरदारांना सल्ला देत. दक्षिणेतील मोगलांच्या सैन्याचे एकत्रित बळ कमी व्हावे, म्हणून त्यांनी उत्तरेत व पश्चिमेकडे चढाई केली.
मराठ्यांच्या घोडी मावळातही दौडू लागल्या.
हे पाहून औरंगहेब बादशहा हवालदिल झाला. वायू वेगाने येणाऱ्या मराठी भीमथडी घोड्यांना पाहून मोगल सैन्य देखील थरथर कापू लागले.
एवढ्या प्रयत्नाने अगदी हातातोंडाशी आलेलं मराठ्यांच राज्य आपल्याला हुलकावणी देत आहे, कोणताही कर्तबगार पुरुष सत्तेत नसताना एक स्त्री युद्धात आपल्याला भारी पडते आहे हे औरंगजेबाला सहन होत नव्हते.
रागाने जळणाऱ्या बादशहाची झोप उडाली होती. त्यातच त्याने अनेक चूका केल्या.
जवळपास पंचवीस वर्षे आपली घरे सोडून दक्षिणेत आलेले मुघल सैन्य देखील वैतागले होते. त्यातच माण मध्ये आलेल्या महापुरात मुघल सैनिक, घोडे, खजिना वाहून गेला. खुद्द बादशहा औरंगजेब लंगडा झाला.
१७०७ साली ताराराणी बाईसाहेब आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी गलितगात्र केलेला आलमगिर औरंगजेब अखेर मराठी मातीत गाडला गेला.
मराठ्यांच राज्य संपवण्याचं त्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही.
त्याच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली. त्यांनी परत आल्यावर छत्रपतीपद परत मागितले. तब्बल सात वर्षे मिळेल त्या मावळ्याला घेऊन औरंगजेबाशी लढा देणाऱ्या ताराबाई राणीसाहेबांनी मात्र याला नकार दिला.
मराठेशाहीच्या कारभाऱ्यानी या वादात तेल ओतण्याचे काम केले. याची परिणीती दुर्दैवी युद्धात झाली. अनेक युद्धे झाली आणि अखेर वारणेच्या तहानुसार अलिकडे शाहू महाराजांची सातारा गादी व पलीकडे ताराराणीसाहेबांची करवीर गादी अशी छत्रपतीपदाची वाटणी झाली.
ताराराणी बाईसाहेब ८६ वर्षे जगल्या. दरबारी राजकारणाचे अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिले.
त्यांना कैदेत देखील टाकण्यात आलं. ज्याची त्यांनी स्थापना केली त्या करवीर संस्थानमधून देखील त्यांचा हक्क डावलण्यात आला. पण सातारा गादीवर शाहू महाराजांच्या नंतर ताराबाईंचे नातू रामराजे छत्रपती झाले.
दोन्ही मराठेशाहीच्या दोन्ही गादीवर ताराराणीची छाप कायम राहिली व ती कोणी मिटवतो म्हणाले तरी मिटवू शकत नाही.
मराठ्यांच्या इतिहासातील स्वातंत्र्य युद्ध महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे.
या काळात मुघल सत्तेच्या विरुद्ध लढा उभारुन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम महाराणी ताराबाई यांनी केले. त्यांनी या काळात आपले कार्य आणि कर्तृत्त्व निर्विवादपणे सिद्ध केले.
कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।
आजही कोल्हापूर मधील ताराबाई महाराणी साहेबांचा पुतळा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत अखंड उभा आहे.
हे ही वाच भिडू.
- औरंगजेबाने पाडलेलं काशी विश्वनाथ मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुन्हा उभारून दाखवलं.
- शंभूराजांच्या सुटकेसाठी लढणाऱ्या ज्योत्याजी केसरकरांच्या नावाने सातारच्या गादीने अख्खी पेठ वसवली
- गेल्या वीस पिढ्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे घराणे आपल्या पराक्रमाने देशाची सेवा करत आहेत.