राज्यात टेस्टची संख्या कमी केली म्हणून कोरोना पेशंट कमी झाले या आरोपात कितपत तथ्य आहे?

मागच्या काही दिवसापुर्वी महाराष्ट्रातील वाढत्या आकडेवारीने देशाचे लक्ष वेधलं होतं. कधी ६० हजार, कधी ६५ हजार असे बाधितांचे नवं-नवे रेकॉर्ड तयार होतं होते. मात्र सध्या हे चित्र हळूहळू बदलताना दिसत आहेत. आता एकीकडे देशातील इतर राज्यात वाढ सुरु असताना मागच्या १० ते १२ दिवसांपासून राज्यात मात्र बाधितांच्या आकड्यात घट व्हायला लागल्याच चित्र दिसत आहे.

एप्रिल महिन्यात जिथे कोरोना संक्रमितांचा आकडा ६० हजारांवर गेला होता, तोच आता अगदी ३७ हजारांच्या घरात येत आहे. त्यामुळे खुद्द पंतप्रधान मोदींना देखील महाराष्ट्राच कौतुक कराव लागलं. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून मोदींनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या भीषण परिस्थितीत राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या कामगिरीचं कौतुक केलं.

सोबतचं राजधानी मुंबईत देखील गेल्या महिन्यात ४ एप्रिल रोजी नवीन रूग्णांची संख्या ११ हजार होती, ती या ४ मे ला २ हजार ५०० च्या घरात आलेली पहायला मिळतं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय, निती आयोग यांनी मुंबई मॉडेलचं कौतुक देखील केलं.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले,

कोरोना विरुद्ध लढ्यात मुंबईच्या मॉडेलची कामगिरी पाहून सर्वोच्च न्यायालयाने देखील राज्य सरकारला शाबासकी दिली. रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यावर न्यायालयाने बुधवारी सुनावणी करताना दिल्लीने मुंबई मॉडेलकडून शिकले पाहिजे. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचं कोर्टाकडून कौतुक करण्यात आलं.

सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ केंद्र सरकारच्या नीती आयोगानेही या रणनितीचं कौतुक केलं आहे. मुंबईचं कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी असल्याचं केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी म्हटलं.

पण आता या सगळ्ता दरम्यानं कमी झालेल्या रुग्णांमागे सध्या एक गंभीर दावा केला जात आहे. हा दावा म्हणजे राज्यात टेस्टिंगचा आकडा कमी करून रुग्ण संख्या घटवली जात आहे. ज्यामुळे संक्रमितांच्या आकड्यातही कमतरता दिसून येत आहे.

नेमकं सत्य काय आहे?

१६ एप्रिल पासून अगदी २ मे पर्यंतची टेस्टिंगची आकडेवारी बघितली तर ती जवळपास सरासरी २ लाख ८० हजारांच्या घरात होती. त्यामुळे बाधितांचा आकडा मोठा होता.

त्यानंतर,

  • ३ मे रोजी २ लाख ११ हजार ६६८ जणांची चाचणी करण्यात आली ज्यात ४८ हजार ६२१ जणांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला होता.
  • तर ४ मे रोजी २ लाख ४० हजार ९५६ जणांची चाचणी करण्यात आली. ज्यात ५१ हजार ८८० जणांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला.
  • त्यानंतर ५ मे रोजी २ लाख ७९ हजार २०० लोकांची चाचणी करण्यात आली. ज्यातं ५७ हजार ६४० पॉजिटीव्ह रूग्ण समोर आले.

याठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ३ मे च्या तुलनेत ४ आणि ५ मे रोजी चाचण्या जास्त झाल्यानंतर बाधितांचा आकडा देखील वाढला होता. यानंतर पुढच्या दिवसांमध्ये चाचण्या सातत्यानं कमी होतं गेल्या.

  • ६ मे रोजी २ लाख ७७ हजार ०८६ चाचण्या घेण्यात आल्या, ज्यानंतर ६२ हजार १९४ पॉजिटीव्ह रूग्ण समोर आले.
  • ७ मे रोजी २ लाख ६८ हजार ९१२ जणांची चाचणी करण्यात आली, त्यानंतर ५४ हजार ०२२ नवीन प्रकरणांची नोंद झाली.
  • ८ मे रोजी २ लाख ६० हजार ७५१ जणांची चाचणी घेतल्यानंतर ५६ हजार ५७८ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली.
  • ९ मे रोजी २ लाख ४७ हजार ४६६ जणांची चाचणी घेण्यात आली. त्यात बाधितांच्या आकड्यात घट होऊन ४८ हजार ४०१ प्रकरणे समोर आली.
  • तर काल म्हणजे १० मे रोजी १ लाख ९२ हजार ३३० जणांची चाचणी घेण्यात आली. ज्यात ३७ हजार २३६ जणांचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला होता.

९ आणि १० मे या दोन दिवसांमध्ये ४ आणि ५ मे च्या तुलनेत चाचण्यांचं प्रमाण लक्षणीय रित्या कमी होतं त्यामुळे सहाजिकच बाधितांचा आकडा तुलनेनं कमी झालेला दिसून आला.

त्यामुळे फॅक्ट चेक नंतर राज्य सरकारनं चाचण्या कमी केल्याचा आणि त्यातुन रुग्णसंख्या कमी आल्याच्या दाव्यात तथ्य असल्याचं आढळून येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रातील आणि विशेषतः मुंबईतील चाचण्या कमी झाल्याचे लक्षात येताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चाचणीच्या आकड्याकडे लक्ष वेधले. त्यांनी लिहील की,

मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचं आभासी चित्र उभं करणं आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येणं या गोष्टी कोरोना विरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होतं आहे. हे प्रकार तत्काळ थांबवण्यात यावेत.

त्यामुळे आता इथून पुढच्या काळात ठाकरे सरकार चाचण्या वाढणार कि याच क्रमाने कमी करून रुग्णवाढ होणार नाही याची काळजी घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.