सगळं कंट्रोल लष्कराच्या हातात…पाकिस्तानात नक्की काय चालूये ?

९ ऑगस्टच्या मध्यरात्री पाकिस्तान झोपेत होतं अन् त्याच रात्री राजकीय उलथापालथी झाल्या. पाकिस्तानची संसद राष्ट्रपतींनी बरखास्त केली. महत्वाचं म्हणजे संसदेच्या पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या १२ ऑगस्ट रोजी संपणार होता मात्र त्याच्या तीन दिवस आधीच पाकिस्तानची संसद बरखास्त करण्यात आली.

राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कलम ५८ (१) अंतर्गत नॅशनल असेंब्ली विसर्जित केली आहे. तसंच, येत्या ९० दिवसांत निवडणुका घेता याव्यात याकरता संसदेत विरोधी पक्षनेताही निवडला जाणार आहे. काळजीवाहू पंतप्रधानांची नियुक्ती होईपर्यंत, पंतप्रधान शेहबाज हे हंगामी पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहेत.

पण इम्रान खान तुरुंगात जाताच आणि संसद बरखास्त होताच पाकिस्तानात चर्चा सुरु झालीय ती पाकिस्तानात पुन्हा एकदा लष्करशाही आल्याची. पण पाकिस्तानची सत्ता लष्कराकडे जाण्याची शक्यता का निर्माण झालीय का?

पाकिस्तानमध्ये नक्की काय राजकारण घडतंय ?

तर तोषखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. ‘इम्रान खान यांनी पंतप्रधान पदावर असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती पाकिस्तान निवडणूक आयोगापासून लपवली. परिणामी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होतात’ असा निर्णय देत इस्लामाबाद सेशन कोर्टाने त्यांना शिक्षा ठोठावली आणि इम्रान खान यांना अटक झाली सध्या ते तुरुंगात आहेत. त्यांना पुढचे ५ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.

या शिक्षेला आव्हान देणारी याचिका त्यांनी इस्लामाबाद हाय कोर्टात दाखल केलीय पण पाकिस्तानच्या राज्यघटनेप्रमाणे घटनादत्त पदावर येणारी व्यक्ती ‘प्रामाणिक’ हवी आणि यात आता इम्रान खान बसत नाहीत कारण त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत.

त्यामुळं हाय कोर्ट त्यांच्या बाजूने निकाल देईल याची शक्यता दिसून येत नाही. जरी ते तोशाखाना प्रकरणातून सुटले तरी त्यांच्या विरोधात जवळपास दीडशे खटले कोर्टात सुरू आहेत. त्यामुळं या ना त्या प्रकरणात त्यांच्यावर चौकशीची लटकटी तलवार असेलच.

त्यात इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ या पक्षाची अवस्था वाईट आहे, स्वतः पक्षप्रमुख इम्रान खान तुरुंगात आहेत. तर गेल्या काही काळात अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षातून बाहेर पडलेत. तर काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक झालीय आणि उरल्या सुरल्या तहरिक-ए-इन्साफ पक्षाची सूत्रे माजी परराष्ट्रमंत्री शहा मोहम्मद कुरेशी यांच्याकडे आली आहेत.

इम्रान खान यांचा राईज अँड डाऊन फॉल पाहायचा झाला तर त्यासाठी २०१८ मध्ये इम्रान खान सत्तेवर कसे आले होते ? तेंव्हा काय झालं होतं हे जाणून घ्यायला हवं.

इम्रान खान आत्तेवर कसे आले हे पाहताना हे लक्षात घ्यावं लागतं कि, पाकिस्तानात नवाज शरीफ आणि बेनझीर भुट्टो यांच्यानंतर स्ट्रॉंग नेता म्हणून कोण समोर आलं तर इम्रान खान आहेत. पण त्या आधी ते क्रिकेटर म्हणून लोकप्रिय होते. त्यांना नेता म्हणून पुढं आणलं ते लष्कराने.

पण ते सत्तेवर कसे आले पाहताना आधी पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेतलं संख्याबळ बघायला लागेल.

पाकिस्तानच्या संसदेच्या एकूण ३४२ जागांचं सदस्यत्व आहे. या एकूण जागांपैकी ७० जागा राखीव असतात. यातील ६० जागा स्त्रियांसाठी आणि १० जागा अल्पसंख्याक समाजासाठी राखीव असतात. आता पाकिस्तानमध्ये भारताप्रमाणे फेडरल गव्हर्नमेंट सिस्टीम असून इथे ४ प्रांत आहे. पंजाब, सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान. पंजाब प्रांतातून १४१ खासदार, सिंध प्रांतातून ६१ खासदार, खैबर पख्तुनख्वा प्रांतातून ३९ खासदार, तर बलुचिस्तानातून १६ खासदार संसदेवर निवडून जातात. याशिवाय इस्लामाबाद शहरातून ३, केंद्रशासित प्रदेशातून १२ खासदार निवडून जातात.

पाकिस्तानमध्ये २०१८ च्या जुलै महिन्यात सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने ११९ जागा निवडून आणल्या होत्या, नवाझ शरीफ यांच्या पक्षाने ६४ जागा तर बिलावल भुत्तो यांच्या पक्षाने ४३ जागा निवडून आणलेल्या.

पण या निवडणुकीच्या आधी काय झालेलं ? 

तेव्हा लष्कराला नवाझ शरीफ डोईजड झाले होते. तर दुसरा पर्याय म्हणून बिलावल भुत्तोच्या पक्षाची साथ द्यावी तर लष्कराला त्यांच्या पक्षावर विश्वास वाटत नव्हता. म्हणून लष्कराने इम्रान खान याना हाताशी धरून तेहरिक-ए-इन्साफ पक्षाला ताकद दिलीआणि  निवडून आणलं.

लष्कराच्या पाठिंब्यावर इम्रान खानच्या पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकल्या, पण त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळं आघाडी सरकारची सत्ता आली. साहजिकच पंतप्रधानपद इम्रान खान यांना मिळालं. १८ ऑगस्ट २०१८ रोजी इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते.

साडे तीन वर्ष ते या पदावर होते पण २०२२ मध्ये त्यांना या पदावरून पायउतार व्हावं लागलं.

इम्रान खान पदावरुण पायउतार कसे झाले?

यासाठी २०२२ मध्ये काय घडलं हे पाहावं लागेल. इम्रान खान अडचणीत येण्याला कारणीभूत ठरलं ते तोषाखाना प्रकरण. पाकिस्तानमध्ये तोशाखान हा एक सरकारी विभाग आहे ज्यात पंतप्रधान, राष्ट्रपती आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींना परदेशी दौऱ्यात मिळालेल्या वस्तू ठेवल्या जातात. इम्रान खान यांच्यावर २०१८ ते २०२२ या काळात पंतप्रधान असताना पदाचा दुरुपयोग करून सरकारी भेट वस्तूंची खरेदी आणि विक्रीसाठी सत्तेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

इम्रान खान यांना परदेशी दौऱ्यावर असताना अनेक भेट वस्तू मिळाल्या होत्या आणि त्यांची किंमत १४० मिलियन इतकी होती. खान यांनी या भेट वस्तू कमी किंमतीत विकत घेऊन त्या चढ्या किंमतीत विकल्याचा आरोप होता. कोर्टाने इम्रान खान यांना संपत्ती लपवने आणि सरकारी भेट वस्तू विक्री प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावली.

पण त्या आधी मार्च २०२२ मध्ये इम्रान खान यांच्याविरोधात सभागृहात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. 

त्यादरम्यान पाकिस्तानमध्ये मोठं आर्थिक संकट उद्भवलं होतं. वाढत्या महागाईमुळे इम्रान खान यांच्या सरकारविरोधातला असंतोष वाढला होता. या सगळ्या परिस्थितीला पंतप्रधान इम्रान खान जबाबदार असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप होता. त्यात तोषाखाना प्रकरणावरूनही सरकारला लक्ष्य केलं जात होतं. दरम्यान पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी, विरोधकांनी इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता.

अविश्वास प्रस्तावाच्या मतदानात इम्रान खान यांचा पराभव झाला.  त्यानंतर १० एप्रिल २०२२ रोजी इम्रान खान यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी करण्यात आली.

त्यानंतर नव्या पंतप्रधान निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. तेंव्हाच लष्कर पाकिस्तानची सत्ता आपल्या ताब्यात घेणार होतं पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शाहबाज शरीफ यांची नेतेपदी निवड केली होती. मात्र शरीफ यांची देशपातळीवर ताकद नव्हती. त्यामुळं तेच पंतप्रधानपद होतील अशी शक्यता नव्हती.

अविश्वास प्रस्ताव आल्याच्या त्या १५ दिवसांच्या दरम्यान शरीफ चीनच्या दौऱ्यावर गेले होते. तेंव्हा दौऱ्यावरून परतत असतांना परिस्थिती ओळखत लष्कराने वेगळी भूमिका घेतली लागलीच ११ एप्रिल रोजी शाहबाज शरीफ यांना पुढं केलं आणि शरीफ नवे पंतप्रधान बनले.

मात्र शरीफ यांना पंतप्रधान बनवणं हे लष्करासाठी तात्पुरती सोय होती.थोडक्यात तोषाखाना प्रकरण किंव्हा पाकिस्तानमधील आर्थिक संकट हे इम्रान खान यांच्या पायउतार होण्याचं फक्त निम्मित ठरलं.

खरं तर यामागे लष्कराचा हात होता.

कधीकाळी लष्कराच्या ताकदीमुळं सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांना सत्तेवरून खाली खेचण्याचं काम हे लष्करानेच केलं होतं. म्हणजेच शरीफ यांना पंतप्रधान बनवलं लष्करानेच आणि इम्रान खान यांना घालवलं लष्करानेच..यामागं कारण काय तर ज्या लष्करामुळे सत्तेवर आले त्याच लष्करात इम्रान खान यांचा हस्तक्षेप वाढला होता. लष्करप्रमुख असेल किंव्हा मग आयएसआय प्रमुख माझ्या मतानुसार पाहिजे असे निर्णय इम्रान खान स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत होते. तोच हस्तक्षेप इम्रान खान यांना अडचणीचा ठरत गेला.

याचमुळं इम्रान खान आणि लष्कराचे पटेनासं झालेलं. यातूनच मागच्या वर्षी त्यांना पायउतार व्हावं लागलं.२०१८ ते २०२२ या काळात काय झालं हे आपण पाहिलं.

आत्ता पाकिस्तानमध्ये काय होतंय ? 

तर आत्ता पाकिस्तानची सत्ता लष्कराकडे जाण्याची शक्यता निर्माण झालीय अशी चर्चा सुरु झालीय  अशी चर्चा का सुरु आहे? तर येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार अशी शक्यता होती मात्र परिस्थिती वेगळी दिसतेय. संसदेच्या विसर्जनाच्या एक दिवस आधी ८ ऑगस्ट रोजी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारातील गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री यांनी सार्वत्रिक निवडणुका कदाचित पुढे ढकलाव्या लागतील,२०२३ मध्ये निवडणूका होण्याची शक्यता कमीच आहे असं सूचक स्टेटमेंट केलं.

पाकिस्तानच्या संसदेची मुदत येत्या १२ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्याआधीच संसद बरखास्त केली. २ दिवसांनी असा काय फरक पडणार होता असाही प्रश्न निर्माण होत होता. इथे हे लक्षात घ्या कि, पाकिस्तानच्या घटनेनुसार राष्ट्रीय संसद आणि विधानसभा जर मुदतीच्या आधी विसर्जित केल्या तर तेथे निवडणुका ९० दिवसांच्या आत घ्याव्या लागतात.

जर राष्ट्रीय संसद आणि विधानसभा मुदतीमध्ये म्हणजेच वेळापत्रकानुसार विसर्जित झाली तर मात्र निवडणुका ६० दिवसांच्या आत घ्याव्या लागतील. मात्र जी परिस्थिती आहे त्यावरून पाकिस्तानात २०२३ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार नाहीत असच दिसून येतंय कारण नियमाप्रमाणे मुदतीपूर्व संसद बरखास्तीमुळे निवडणुका व्हायला ३ महिने बाकी आहेत. म्हणजेच २ महिन्याऐवजी १ महिना जास्तीचा मिळालेला आहे.  ६० दिवस सत्ता राहीली असती ती वाढून आता ९० दिवसांची सत्ता मिळाली आहे.

यात हेतू असा सांगितला जातोय कि, हंगामी पंतप्रधान शरीफ यांना आणि लष्करालासुद्धा निवडणुका न होता आपल्या हाती पाकिस्तानची सत्ता राहिली पाहिजे. 

पण कशासाठी ?

तर कुठल्याही देशामध्ये लष्कराला देशावर स्वतःची सत्ता हवीच असते.  लष्कराला असं वाटतं कि या देशाला शिस्त आम्हीच देऊ शकतो. पाकिस्तानसमोर असंख्य गुंतागुंतीच्या समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत आणि या समस्या लष्करच पटकन सोडवू शकतो.

कोणत्याही लष्करशहाला असं वाटत कि, राजकीय नेते हे भ्रष्ट आहे आणि त्यांना देशातील गोष्टी कंट्रोल मध्ये ठेवता येत नाहीत. आणखी एक कारण असंही सांगितलं जातं कि, आपली कृत्ये जगासमोर येऊ नयेत यासाठी हट्ट सत्ता हवी असते.

म्हणून मागच्या वर्षी लष्करप्रमुख झालेले जनरल असीम मुनीर यांना पाकिस्तान आपल्या ताब्यात हवा होता. त्यांना शरीफ यांच्यासारख्या नेत्याला पुढे करून कारभार करण्यापेक्षा स्वतः कारभार करायचा होता.

म्हणूनच तोषाखाना सारखी प्रकरणं समोर करून आधी इम्रान खानला घालवलं आणि आता मुदतपूर्व संसद बरखास्त करून अप्रत्यक्षपणे लष्कराने सत्ता आपल्या घेतली असं म्हणण्यास अतिशियोक्ती वाटायला नको.

कारण पाकिस्तानचा अलीकडच्या काळात नवाझ शरीफ, इम्रान खान अशी काही उदाहरणं ज्यांचं कुणाचं लष्कराशी पटलेलं नाहीये त्यांना त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. कारण पाकिस्तानात लष्कराच्या मदतीशिवाय काहीही चालत नाही हे वास्तव आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.