डोळे आलेत पण आता करायचं काय? डॉक्टरांचं म्हणणं एकदा बघा

हल्ली कोणाचे डोळे थोडे जरी लाल दिसले तरी आपला पहिला प्रश्न असतो, तुला डोळे आले आहेत का? कारण गेला महिनाभर डोळ्यांची साथ संपूर्ण भारत भर पसरली आहे याचं प्रमाण एवढं आहे की, दिवसाला ७०-८० हजार eye drops विकले जातायत आणि आता eye drops चा तुटवडा सुद्धा होतोय.

डोळे येतात म्हणजे नेमकं काय होतं, तर डोळ्यांमधले कॉनजेक्टिवा सुजतात. कॉनजेक्टिवा म्हणजे डोळ्यातल्या पांढऱ्या भागापासून आणि पापण्यांच्या खालच्या भागापर्यंत असलेली एक पातळ लेयर.

ही लेयर सुजते आणि लाल किंवा गुलाबी होते त्यामुळे डोळे येण्याला इंग्लिशमध्ये पिंक आय असं म्हणतात. आता सध्या या संसर्गाचं कारण म्हणजे पावसाळा. पावसाळ्याचा ऋतू असला तरी सतत पाऊस काही पडत नाही. कधी जोरदार पडतो, कधी श्रावणसरी पडतात आणि कधी कधी तर आठवडा भर पाऊस फिरकत सुद्धा नाही. अशा वेळी होतं काय तर? पावसामुळे थंडावा निर्माण होतो आणि पाऊस थांबला की, वातावरण उष्ण होऊन वातावरणात आपसूक दमटपणा आणि आद्रता निर्माण होते. हे वातावरण वेगवेगळ्या जंतूसाठी आणि विषाणूसाठी पूरक असतं. अशावेळी ताप, सर्दी-खोकला आणि पोटाचे आजार पसरतात पण अशा दिवसात डोळे येण्याची साथ सुद्धा पसरते.

आता आपण थोडंसं डॉक्टरी भाषेत बोलूया,

डोळ्यांची साथ आली किंवा डोळा जरा खुपायला जरी लागला तरी माझ्या आईचा उपाय एकंच असायचा, लसणाच्या मोठ्या पाकळीमधलं कोंब काजळ लावतो तसं डोळ्यांवर फिरवायचं. त्याने डोळे झोंबून डोळ्यातनं पाणी यायला लागतं आणि त्याबरोबर डोळ्यात जर काही विषाणू गेला असेल तर तो बाहेर पडतो. असे वेगवेगळे उपाय तुमच्या घरात पण करत असतील. पण समजा डोळ्यांची सूज जास्त दिवस राहिली तर थेट डोळ्यांच्या डॉक्टर कडे जायचं.

आता याला आपण डोळा येणं असं म्हणतो पण डॉक्टरी भाषेत याला किरॅटोकंजायटिव्हिटिस किंवा कंजेक्टीव्हायटीस असं म्हणतात.

आपण अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे फक्त डोळ्यांची साथ असल्यावरच डोळे येतात असं नाही. कधी कधी पुलाच्या पाण्यात जे क्लोरीन असतं, त्या क्लोरीन किंवा इतर विषारी रसायनांमुळे, धुळीतले जीवाणू, प्राण्यांचे केस किंवा पक्षांची पिसं याने सुद्धा कंजेक्टीव्हायटीसचं संक्रमण होऊ शकतं. त्याचबरोबर तुम्ही खूप दिवस एकंच contact लेन्स वापरत असाल तर तेही धोक्याचं ठरू शकतं. अशा कारणांमुळे जर तुम्हाला डोळे आले असतील तर त्याचा संसर्ग पसरत नाही. अशावेळी सुद्धा डॉक्टरकडे जाणंच योग्य.

डॉक्टरांचा सल्ला,

याविषयी आय स्पेशालीस्ट डॉ. शरद घरत यांच्याशी आम्ही बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं की, सुरवतीला डोळे लाल झालेत, चूरचूरतायत, डोळ्यातनं पाणी येतंय असं काही झालं तर एकवेळ घरातले आजीच्या बटव्यातले उपाय केलेत तरी चालेल. कारण डोळे येणं असे आजार पूर्वी पासूनचे आहेत. पण डोळ्यात कोणताही रस घालणं वगैरे टाळाच आणि केमिस्टने दिलेली औषधं तर त्याहून नाहीच.

डोळे लाल होणं, डोळ्यातून पाणी येणं म्हणजे नेहमी डोळे येणंच असतं असं नाहीये. त्यामुळे जेव्हा यापैकी लक्षणं तुम्हाला दिसली तर जास्तीत जास्त दोन दिवस थांबा आणि बरं वाटलं नाहीच तर डॉक्टरकडे जा.

डॉक्टर सुरुवातीला तुमची कोणती मेडिकल हिस्ट्री आहे का? तुम्हाला कोणती अ‍ॅलर्जी आहे का? डोळे आल्यावर कोणता त्रास होतोय? यावर भर देतात. त्यानंतर डोळ्याला तपासून त्यावर औषधं देतात. हा आजार साधारणपणे आठवडाभर राहतो आणि जास्तीत जास्त ३-४ आठवडे राहतो. पण तरी तुम्हाला आराम मिळत नसेल तेव्हा मात्र डोळ्यांची स्वॉब टेस्ट केली जाते.

Staphylococcus, chlamydia, gonococcus या विषाणूंच्या संक्रमणामुळे शक्यतो ही लागण होते

जर या जीवाणूंच्या संक्रमणामुळे जर डोळे आले असतील तर डॉक्टर anti-biotic देतात पण जर हे व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्याला औषध लागत नाही. डोळ्याची आगआग कमी होण्यासाठी फक्त डॉक्टर Drops देतात. पण व्हायरल इन्फेक्शन हे आपणहून बरं होतं.

डोळ्यांची आग होते म्हणून डोळे थंड पाण्याने धुण्याचा सल्ला बरेच जण देतात पण थंड पाणी डायरेक्ट डोळ्यावर नाही मारायचं. कारण जीवाणूंचं संक्रमण झाल्यामुळे आपले डोळे आधीच दमलेले असतात, त्रासलेले असतात ते थंड पाणी डायरेक्ट डोळ्यांवर सहन करू शकत नाहीत आणि पाण्यातून अजून जीवाणू डोळ्यात जाण्याची शक्यता असते. त्यापेक्षा थंड पाण्याच्या स्वच्छ पट्टीने डोळ्यांना हळू हळू शेक द्या. समजा डोळे अ‍ॅलर्जीमुळे आले असतील तर डॉक्टर antihistamine eye drops देतात किंवा decongestants, steroids and anti-inflammatory drops सुद्धा डॉक्टरांकडून दिले जातात.

डोळे येणं जास्त धोकादायक नसतं याने पण डोळ्यात पस सुद्धा होतो, त्यामुळे जास्त दुर्लक्ष केलंत आणि पस जास्त वाढला तर दृष्टी जाऊ सुद्धा शकते.

डॉक्टरांचा अजून एक सल्ला असा आहे की, डॉक्टरांनी drops दिलेत, औषधं दिलीत. पण संसर्ग जास्त पसरतो तो आपल्या हातांनी त्यामुळे डोळ्यात drops घालताना नेहमी हात स्वच्छ धुणं किंवा Sanitizerने हात स्वच्छ करणं सुद्धा जास्त गरजेचं आहे.

तसचं डॉक्टर सांगतात की, तुम्हाला डॉक्टरकडे सुरुवातीला जायचं नसेल आणि डोळे येण्याची सुरुवातीची वेळ असेल, तर एरंडेल तेल काजळासारखं डोळ्याला लावायचं. याने बऱ्याचदा डोळे येणार असतील तर त्याची intensity कमी होते आणि डोळे आले असतील तर त्याचा त्रास सुद्धा कमी होतो किंवा केमिस्ट मध्ये जाऊन Artificial tears eye drops मागायचे. ते थोडे माईल्ड असतात. पण शक्यतो डॉक्टरांशी बोलाच.

हा सल्ला आम्ही डॉक्टरांकडून घेतला आहे पण तुम्ही सुद्धा तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करूनच डोळे आल्यावर उपचार करा. शेवटी डोळ्यांचा प्रश्न आहे. त्यात हयगय करून नाही चालायचं.

हे ही पहा,

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.