पीडितीच्या त्या नग्न व्हिडिओनंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर हिंसाचारवर बोलले

मणिपूरमध्ये २०२३ च्या मे महिन्यापासून हिंसाचार सुरु आहे. मात्र हिंसाचाराच्या अनेक घटनांची फुटेज बाहेर येत असताना देखील सरकारकढून या संदर्भात महत्वाची पावलं उचलली जात नव्हती आणि हिंसाचार चालूच राहिला.

आता या हिंसाचारचा माणुसकीला काळीमा फासणारा एक व्हिडिओ मणिपूरमधून व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडिओत दोन महिलांना नग्न करुन त्यांची धींड काढण्यात आल्याचं दिसतंय. त्यानंतर त्या दोन महिलांवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे. 

मणिपूरमधल्या समाजकंटकांच्या या कृत्यानंतर देशभरातून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनीदेखील या घटनेवर संताप व्यक्त करत दुःख व्यक्त केलंय.

महत्वाचं म्हणजे या संपूर्ण मणिपूर हिंसाचार प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुप्पी साधली होती.

मणिपूरमध्ये हिंसाचार होत असताना मोदींनी या यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र या व्हिडिओनंतर आता मोदींना देखील प्रतिक्रिया देणं भाग पडलं आहे. मोदींनी या संपूर्ण प्रकारनावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 ‘माझं मनात दुःख आणि राग दोन्ही आहे. मणिपूरची घटना सभ्य समाजासाठी लज्जास्पद आहे. हे पाप करणारे, गुन्हा करणारे कोण आहेत हे बाजूला ठेवा. मात्र, या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालावी लागली. १४० कोटी देशवासियांना आज खाली पहावं लागलं. मी सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह करतो की त्यांनी आपल्या राज्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत करावी. आपल्या आई-बहिणींच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर पावलं उचलावी. मी देशवासियांना विश्वास देतो कि कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही. मणिपूरच्या मुलींसोबत जे झालं ते कधीही माफ होऊ शकत नाही’.

मात्र आता मोदींच्या या प्रतिक्रियेनंतर लवकरात लवकर पावलं उचलून मणिपूरीरमधील हिंसाचार थांबवण्यात यावा ही मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी विरोधकांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हे सगळं प्रकरण काय आहे ? आरोपींवर आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली ? केंद्र सरकारने या व्हिडिओची दखल घेतलीये का ? ते आपण समजून घेणार आहोत. 

कुकी समाजाच्या दोन महिलांना नग्न करुन त्यांची धींड काढल्याची घटना मणिपूरच्या थौबाल जिल्ह्यात घडली होती.

हि घटना ४ मे रोजी घडली होती. घटनेचा व्हिडिओ काल १९ जुलैला व्हायरल झाला. दरम्यान, ४ मे रोजी घटना घडल्यानंतर या प्रकरणी पीडितांकडून एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पोलीसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामुहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत एकाही आरोपीला अटक केली नाही. व्हायरल व्हिडिओत महिलांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या समाजकंटकांचा एक समुह दिसतोय. महिलांच्या गुप्तांगाला अनैसर्गिकपणे स्पर्श करण्यात आल्याचं व्हिडिओतून दिसतंय. या व्हिडिओमुळे मणिपूरमध्ये आता पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झालीये. कुकी आणि मैतेई या दोन समाजांमध्ये आरक्षणावरुन वाद पेटलाय.

मैतेई समाजाला अनुसुचित जमातीचा दर्जा देण्यावरुन मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली होती. आता थौबालचे पोलीस अधिक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक निवेदन जारी केलं आहे. त्या निवेदनात म्हटलंय कि ‘मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्नावस्थेत धींड काढण्यात आली. हि घटना ४ मे २०२३ ची आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल. आरोपींचा शोध सुरु आहे’

तिकडे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे या प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. 

त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करत आरोपींना फाशीची शिक्षा कशी देता येईल याचा विचार केला जाईल, असं आश्वासन दिलंय. त्यातच एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. आज संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतंय. संसदेत विरोधक या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला धारेवर धरणारेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया देताना, हि घटना लज्जास्पद असून या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावली. १४० कोटी देशवासियांना आज खाली पाहावं लागतंय. कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही, असं म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्हायरल व्हिडिओवर दुःख व्यक्त केलंय.

 हिंसाचारावेळी महिलांचा साधन म्हणून वापर करणं हे किळसवाणं आहे. या घटनेमुळे डिपली डिस्टर्ब झालोय. या प्रकरणी जर सरकारनं कारवाई केली नाही, तर आम्ही कारवाई करु,

अशी प्रतिक्रीया सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूर हिंसाचारावर मौन सोडल्याचं म्हटलं. आता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी चिदंबरम यांनी केली आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही या प्रकरणावर दुःख व्यक्त करत भाजपवर टीका केली आहे. दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर काँग्रेसकडून बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आलंय.

आता पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली आहे?

मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करुन त्यांची धींड काढण्यात आली. त्यानंतर त्या महिलांवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर आता पोलीस एक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जातोय. या प्रकरणी आज एका आरोपीला अटक करण्यात आलीये.

हेरम हेरा दास असं आरोपीचं नाव आहे. 

त्याच्यावर बलात्कार व हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. मणिपूरमध्ये या प्रकरणानंतर पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये परिस्थिती सामान्य होत होती. त्यामुळे ५ जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आलेली जमावबंदी शिथील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पाचही जिल्ह्यांमध्ये जमावबंदीसह कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. पण पहिल्याचं दिवशी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन संसदेत गदारोळ झाला आहे. संसदेचं कामकाजही पहिल्या दिवशी तहकुब करुन पुढे ढकलण्यात आलंय.

हे ही वाच भिडू :

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.